महाराष्ट्रात भाजप-सेना युती सरकारचे संकेत

0
84

दिल्लीतील बोलणी सकारात्मक
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी भाजप-शिवसेना यांच्यातील युती होण्याचे संकेत मंगळवारी दिल्लीतील भाजप नेत्यांशी या संदर्भात चर्चा करून आलेल्या राज्यसभा खासदार अनिल देसाई व सुभाष देसाई यांनी दिले आहेत.अनिल व सुभाष देसाई मंगळवारी दिल्लीला गेले होते. तेथून काल परतल्यानंतर सुभाष देसाई यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी चर्चेसाठी आम्ही दिल्लीत गेलो होतो. ही बोलणी सकारात्मक ठरली व आम्ही भाजपबरोबर सरकार स्थापनेसाठी युतीस तयार आहोत. या संदर्भात आणखी औपचारिक चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई व ज्येष्ठ नेते सुभाष देसाई मंगळवारी संध्याकाळी दिल्लीला गेले होते. तेथे हे नेते राजनाथ सिंह व जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार होते. तेथे महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या अनुषंगाने असलेला भाजपचा प्रस्ताव मिळाल्यानंतर उभय नेते मुंबईत येऊन त्याची माहिती उद्धव ठाकरे यांना देणार होते. मंगळवारी रात्री वरील नेत्यांदरम्यान दिल्लीत चर्चा झाल्याचे वृत्त असले तरी कोणत्या स्वरुपाची चर्चा झाली किंवा शिवसेना भाजपला पाठिंबा देणार काय याविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना नेत्यांची दिल्ली वारी निष्फळ ठरली असल्याचे वृत्त आहे. त्यांना कोणाही भाजप नेत्याची भेट मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे निवडणूक निकालानंतर भाजपकडून प्रस्ताव मिळाल्यानंतरच त्यांच्याशी बोलणी करू अशी ताठर भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र आता त्यांनी मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा आहे.