महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू

0
97

विदर्भातील ३९ आमदारांकडून गडकरींचा गजर
दिवाळी सणाच्या दिवशीही महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार निवडीसंदर्भातील हालचाली जोरात सुरू होत्या. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून घेतले जात असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा गजर मुख्यमंत्रीपदासाठी सुरू झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम गडकरींना या पदासाठी जाहीर पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी गडकरींसाठी आपली जागा खाली करण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आता स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र आहे.विदर्भातील ३९ आमदारांनीही गडकरी यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड व्हावी अशी मागणी केली आहे. दुसर्‍यांदा आमदार बनलेल्या खोपडे यांनी गडकरींसाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास आपण तयार असल्याचे पत्रकारांना सांगितले. मात्र या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘नो कॉमेंटस्’ असे उत्तर दिले. विशेष म्हणजे गडकरींप्रमाणेच फडणवीस हेही नागपूरचेच आहेत.
या पार्श्‍वभूमीवर गडकरी यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला यायचे नाही ही आपली भूमिका आपण स्पष्ट केली आहे. त्यामुळे यावर काय तो निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घ्यायचा आहे. मात्र नेतृत्वाकडून दिलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची आपली तयारी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मंगळवारी विदर्भातील ३९ आमदारांनी थेट गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली. विदर्भातील नवनिर्वाचित आमदारांना चार्टर विमानाने बैठकीसाठी मुंबईला नेण्यात आले होते. मात्र बैठक पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्या सर्वांनी नागपूरमधील गडकरींचे निवासस्थान गाठले. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या गाभा समितीचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावे असे म्हटले आहे. राज्याच्या अन्य काही नेत्यांनीही असाच सूर लावला आहे.