काळा पैसा दडवणार्‍यांची नावे जाहीर करणार

0
89

कॉंग्रेसची स्थिती विचित्र होईल : जेटली
विदेशी बँकांमधील खात्यांमध्ये ठेवलेल्या काळ्या धनासंदर्भात काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कॉंग्रेसवर टोला हाणला. एकदा विदेशी बँकांमधील अवैध खात्यांमध्ये बेहिशेबी पैसा साठविलेल्यांची यादी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसची स्थिती अडचणीची होणार असल्याची टिप्पणी जेटली यांनी केली. त्याआधी सोमवारी रात्री दिवाळीनिमित्त केंद्रीय मंत्रिमंडळासाठी आयोजित मेजवानीवेळी या संदर्भात सुतोवाच केले होते.‘‘लवकरच काळा पैसा दडवणार्‍यांची नावे जाहीर केली जातील. मात्र ती खात्रीपूर्वक सांगू शकतो की यामुळे भाजपला खाली मान घालण्यासारखी स्थिती निर्माण होणार नाही. मात्र अशा लोकांची नावे जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात कॉंग्रेसची स्थिती ओशाळवाणी बनेल.’’ अशी प्रतिक्रिया जेटली यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री आपल्या मंत्रिमंडळाला दिवाळीनिमित्त मेजवानी दिली. त्यावेळी मोदी यांनी विदेशातील बँक खात्यांमध्ये काळा पैसा दडवणार्‍यांची काही नावे दिवाळीनंतर सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार असल्याची माहिती दिली.
लोकसभा निवडणूक प्रचारात विदेशातील बँकांमध्ये दडवलेला काळा पैसा हा नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा मुख्य विषय होता. भाजप सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांच्या आत हा काळा पैसा भारतात आणून अशा खातेधारकांची नावे जाहीर करण्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले होते. मात्र आतापर्यंत त्या आश्‍वासनाची पूर्तता त्यांनी केली नव्हती. त्यातच गेल्या आठवड्यात विदेशात बँक खाती असलेल्या भारतीयांची नावे जाहीर करता येणार नाही असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. मात्र या घुमजाव धोरणाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी काळा पैसा दडविलेल्या खातेधारकांची नावे जाहीर करण्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे अशांचीच नावे जाहीर केली जातील असा निर्णय मोदींनी घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.