खाण अवलंबितांना साडेबारा कोटी वितरीत

0
86

१४३६ कामगार, ७ हजार ट्रक मालकांना लाभ
राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगार बनलेल्या खाण कामगारांपैकी १४३६ कामगार व ७ हजार ट्रक मालक यांना दिवाळीची भेट देताना काल गोवा सरकारने त्यांना १२.५ कोटी रु. वितरीत केले.कामगारांना जानेवारी ते जून या सहा महिन्यांसाठीचे वेतन वितरित करण्यात आले. तर ट्रक मालकांना जानेवारी २०१४ पर्यंतचे पैसे वितरित करण्यात आल्याचे खाण खात्यातील सूत्रांनी सांगितले. या पॅकेजद्वारे सरकारला कामगारांचे वेतन फेडण्यासाठी महिन्याला सुमारे ६२ लाख रु. तर ७ हजार ट्रक मालकांना पैसे देण्यासाठी महिन्याला ६ कोटी ४० लाख रु. मोजावे लागत. मात्र, गेले बरेच महिने त्यांना हे पैसे देणे सरकारला शक्य झाले नव्हते. आता ट्रक मालकांना जानेवारी २०१४ तर कामगारांना जून २०१४ पर्यंतचे पैसे फेडण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सरकार दरबारी नोंदणी केलेल्यांनाच वरील पॅकेजखाली पैसे वितरीत करण्यात येत असतात असे सूत्रांनी सांगितले.
१३ खाण लिजांचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू
राज्यातील स्टँप ड्युटी भरलेल्या २७ खाण लिजांपैकी १३ लिजांचे नुतनीकरण करण्यासाठीची प्रक्रिया खाण खात्याने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात या १३ लिजांचे नुतनीकरण करण्यता येणार आहे. सेझा गोवा या कंपनीच्या लिजापैकी एकाही लिजाचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.
सुप्रीम कोर्टाने खाणीवरील बंदी उठवलल्यास आता सहा महिन्यांचा अवधी झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने खाणी सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला काही अटीही घातलेल्या आहेत. वर्षाला किती खनिज काढता येईल त्याची मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. शिवाय त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समितीही स्थापन केलेली आहे. त्याशिवाय जेटींवरील खनिजाचा ई लिलाव करण्याचा आदेश दिलेला असून त्यानुसार हा लिलावही चालू आहे.