युतीसाठी शिवसेनेलाच भाजपचे प्राधान्य असल्याचे संकेत

0
68

महाराष्ट्रात सरकार दिवाळी नंतरच
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात सहकारी पक्ष म्हणून भाजपचे शिवसेनेलाच प्रथम प्राधान्य असल्याचे संकेत काल भाजप नेत्यांकडून मिळाले. महाराष्ट्राचे भाजप प्रभारी ओम माथूर तसेच भाजपचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी तशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र आता सरकार स्थापनेची प्रक्रिया दिवाळीनंतरच पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.ओस माथूर म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी आम्हाला जनादेश मिळाला असल्याने महाराष्ट्रात भाजपने आता नवा मोठा भाऊ म्हणून स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे आता कोणी व्यक्ती किंवा पक्ष त्यासाठी दावा करू शकत नाही. याचबरोबर त्यांनी असेही स्पष्ट केले की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपद किंवा महत्त्वाची खाती मिळावी यासाठी मागणी वगैरे केलेली नाही. या सर्व प्रसार माध्यमांच्या कल्पना असल्याची टिका माथूर यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा व आपल्यालाही फोन केला. मात्र निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठीचा तो फोन होता, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरेंनी युतीसाठी मागण्या केल्याच्या बातम्या तथ्यहीन व खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेशी भाजपची अनेक वर्षांची युती होती. त्यामुळे शिवसेनेसारख्या नैसर्गिक सहकार्‍याशी युती झाल्यास आनंद आहे, असे माथूर म्हणाले.
केंद्रीय मंत्री जेटली म्हणाले की, शिवसेनेशी भाजपची केंद्रीय मंत्रिमंडळ पातळीवर तसेच महापालिका पातळीवर युती अजूनही आहे. आम्ही परस्परांचे अभिनंदन केले असल्यानेही चांगला संदेश गेला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी सर्व पर्याय खुले असल्याचेही ते म्हणाले.