कदंब शटल प्रवास महागला

0
81

शटल तिकीट दरात ३३ टक्के वाढ
कदंब महामंडळाने आपल्या सर्व शटल बससेवेच्या तिकिट दरात ३३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय काल घेतला. त्यामुळे रोज तिकिट काढून प्रवास करणार्‍या प्रवाशांबरोबरच मासिक पासचा लाभ घेऊन प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही आता आपल्या प्रवासासाठी ३३ टक्के जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.पणजी-मडगाव शटल सेवेसाठी पूर्वी ३० रु. एवढे तिकीट दर होते. ते आता ४० रु. एवढे झाले आहेत. याच प्रवासासाठी मासिक पास घेणार्‍यांना ५५० रु. मोजावे लागत असत. आता त्यांना या प्रवासासाठी २८० रु. जास्त फेडावे लागणार आहेत. मासिक पासची किंमत आता ७३० रु. एवढी असेल. मडगाव-वास्को प्रवासासाठी पूर्वी २६ रु. एवढे तिकिट दर होते. ते आता ३४ रु. एवढे झाले आहेत. मडगाव-वास्को मासिक पासाची किंमत पूर्वी ४८० रु. एवढी होती. ती आता वाढून ६९० रु. एवढी झाली असल्याचे कदंबचे माहिती अधिकारी एस. एल. घाटे यांनी सांगितले.
पणजी-साखळी शटल सेवेचे तिकिट दर २८ वरून ३६ रु., म्हापसा-पणजी १४ वरून १५ रु., मडगाव-सावर्डे १८ वरून २४ रु., फोंडा-पणजी २८ वरून ३७ रु. असे हे दर वाढले आहेत. २०११ पासून कदंब शटल बससेवेच्या तिकिट दरात वाढ करण्यात आली नव्हती. २०१३ साली कदंबच्या अन्य बसेसच्या तिकिटदरात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे त्या बसेसचे तिकिटदर व केवळ एक-दोन थांबे घेऊन प्रवास करणार्‍या शटल बससेवेचे दर यात मोठासा फरक राहिला नव्हता. परिणामी शटल बससेवेसाठी एका बाजूने झुंबड उडत असतानाच अन्य बसेस मात्र रिकाम्याच सोडाव्या लागत होत्या. या पार्श्‍वभूमीवर शटल बससेवेच्या तिकिटात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले.
कदंब शटलचे नवे दर
पणजी – मडगाव – ४० रु.
मडगाव – वास्को – ३४ रु.
पणजी – साखळी – ३६ रु.
म्हापसा – पणजी – १५ रु.
मडगाव – सावर्डे – २४ रु.
फोंडा – पणजी – ३७ रु.