शंभरी भरली!

0
129

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे

आठवतोय… महाभारतातील तो राजदरबार… राजाने भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून मानाने त्याला स्थान दिले होते. त्याची पाद्यपूजा पण केली होती. इतक्यात शिशुपाल दरबारात प्रवेश करता झाला. त्याने गवळ्याचा पोर म्हणत श्रीकृष्णाची अवहेलना केली होती. शिशुपालची शिवीगाळ चालूच होती. श्रीकृष्ण त्याचे अपराध मोजत राहिले. शंभर अपराध भरताचक्षणी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याची शंभरी भरली होती. हा वाक्यप्रचार तेव्हापासून प्रचलित झाला असावा.
भारतात शंभर वर्षे जगणारे कित्येक आहेत. ते गेल्यानंतर त्यांच्या गाथा आपल्याला ऐकायला मिळतात. एक १०० वर्षे जगलेली आजीबाई आपल्या मुलाखतीत म्हणाली होती, ‘‘इतकी वर्ष जगण्याचं माझं रहस्य काय असेल तर मी पोटभर कधीच जेवले नाही. जास्ती पाणीच पिऊन जन्म घालवला.’’ ती दिवसा पाच-दहा वेळा ग्रिन टी पीत होती. तेव्हापासून प्रत्येकजण दुकानात जाऊन फक्त ‘ग्रिन टी’ ची मागणी करू लागला. जगण्याची इच्छा, आशा वाढल्यात ना! नेहमीच्या ६०-७० च्या आयुष्यात सगळे काही मिळत नाही.
सकाळीच घरी पेशंट आला होता, रक्तातील साखर तपासायला. हल्ली त्याची साखर फार वाढत होती. साखर वाढलेली होती. त्याने दिलेली बातमी तोंड कडू करून गेली. सकाळी सकाळी तोंड कडू कारले खाल्ल्यागत झाले. साखर वाढली त्याची… आपण कारले खाण्याऐवजी तो मलाच कारले देत होता. किती ही विसंगती, तीही भल्या सकाळी. आज गुरुवार होता. सौ.नीही कारल्यागत बेत केला होता. म्हणजे सकाळी कारले व दुपारीही कारलेच. तर ती बातमी कोणती!
चांगली बातमी पसरविण्यास वेळ लागतो. वाईट बातमी कधी दुसर्‍यांना सांगाविशी वाटत राहते. त्याचे काय झाले, ‘अमुक अमुक वारला हो, गरीब बिचारा!’ तो व्यक्ती काही रोगी नव्हता… त्याच्या संसर्गाने कुण्या माणसाला रोग झाला नव्हता. तो पूर्णपणे निरोगी होता. तरीही जग सोडून गेला.
बातमी अगदी कोरी होती. त्या देवळाजवळ तो व्यक्ती विजेच्या शॉकने मरण पावला. मला विजेचा जबरदस्त शॉक बसला. कालच संध्याकाळी तो आमच्याबरोबर देवळाच्या पायर्‍यांवर बसून बोलत होता. त्याचे काय झाले – श्रावणात दत्ताच्या देवळात वार्षिक वरद शंकर आम्ही पूजतो. देवालयात सोमवारी आरती संध्याकाळी सहाला असते. मग सर्व उरकून ७ पर्यंत घरी पोहोचतो. तो व्यक्ती आमच्याबरोबरच बसला होता. तो तिथलाच नोकरदार. देवळात काम करायचा. थोड्या पगारावर होता. प्राकारातच एका खोलीत राहायचा. बोलता बोलता माझा चुलतभाऊ त्याला विचारता झाला, ‘‘तुझे वय काय?’’ तो उत्तरला – शंभर! देवासमोर त्याच्या तोंडून हे शब्द निघाले. देवळाची घंटा वाजली. वार्तालाप तिथेच संपला. तो व्यक्ती आरतीला हजर राहिला नाही. तो निघून गेला होता.
रात्री भजनानंतर सगळीकडे काळोख पसरला. ९.३०-१०च्या दरम्यान हातात जेवणाचे ताट घेऊन काळोखात तो निघाला. त्याच्या ओळखीच्या रस्त्यावरून अदमासे तो जात होता. त्या रस्त्यावरच त्याचा मृत्यू बसलेला त्याला दिसला नाही. रस्त्यावर विजेची तार तुटून खाली पडली होती. कितीतरी दिवसांपासून त्या विजेच्या खांबावरचा पथदीप पेटत नव्हता. त्यानेच कित्येक वेळा ऑफिसात कळवले होते. त्या तुटलेल्या वीजतारांत प्रवाह चालूच होता. सगळे विधीलिखितच घडत होते. त्या तारेवर त्याचा अनवाणी पाय पडला. हातातले जेवणाचे ताट निसटून गेले. त्याचा प्राणही त्याच्या शरीरातून निसटून गेला होता. त्याची शंभरी भरली होती!
कुणालाही शासन करायचे असेल तर शंभरी भरली म्हणायचे. पण – ज्याने केव्हा कुणाचे वाईट केले नाही त्याचे असे व्हावे? लहानपणापासून तो देवालयाच्या प्राकारात वाढला. देवाच्या सहवासात राहिला. पंधरा दिवसांअगोदर तो माझ्याकडे आला होता. तसा वरचेवर तो हक्काने यायचा. त्याने उच्चारलेले ते शेवटचे वाक्य डोक्यात सैरावैरा धावत होते. ‘‘माझं वय शंभर!’’ त्याची आजच शंभरी भरली होती याची जाणिव त्याच्या सुप्त मनाला झाली होती का? वाढत्या वयाची तमा न बाळगणारे, वाढत्या वयात उत्साहाने काम करणारे महाभाग आजही हिरहिरीने वागताना आढळतात. गरीब बिचारा ‘शहाणा’ माणूस निघून गेला होता – राहता राहिले अतिशहाणे!
त्याची तशी शंभरी भरलीच नव्हती. श्रावण महिन्यात त्या रस्त्याने देवळाकडे येणार्‍या जाणार्‍यांची वर्दळ वाढली होती. देवालय बंद झाल्यावर काल त्या दिशेने जाणारी माणसे कमीच होती. त्या वाटेचा वापर करणारी व ज्यांची शंभरी पुरेपूर भरलेली होती, ती माणसे वाचली होती. का, ते दत्तमहाराजांनाच माहित! उगाचच आपली शंभरी भरली आहे अशी वल्गना करणारा नकळत निघून गेला होता. त्याने ऍक्झीट घेतली होती.
माझा एक पेशंट पैलतिरावरचा. वय वर्षे ८६. आपण परवाच शंभरी ओलांडल्याचे सांगत होता. मी त्यांना सांगत होतो, ‘‘अहो राव, तुमची शंभरी अजून भरलेली नाही. १५ वर्षे अजून बाकी आहेत. कालच ते आजारी असल्याने त्यांना तपासायला गेलो होतो. ते थोडेफार थकले होते. तापामुळे शरीराला थोडी मरगळ आली होती. चार दिवस नेहमीचे जेवण पण केले नव्हते.
उगाचच डोक्यात पाल चुकचुकत होती… त्यांची शंभरी तर भरली नसेल…!
……..