गोपाळराव मयेकर यांना‘गोमंत शारदा’ पुरस्कार

0
228
कला व सांस्कृतिक मंत्री तसेच कला अकादमीचे अध्यक्ष दयानंद मांद्रेकर यांनी गणेशपुरी-म्हापसा येथील मयेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गोमंत शारदा पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर, कार्यक्रम व विकास अधिकारी डॉ. दत्तगुरू आमोणकर, कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर छायाचित्रात दिसत आहेत.

कला अकादमीकडून निवड
गोवा कला अकादमीतर्फे देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या अशा ‘गोमंत शारदा’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत व ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक प्रा. गोपाळराव मयेकर यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन गोव्याच्या संस्कृतीत मोलाची भर घालणार्‍या गोमंतकीय साहित्यिकांसाठी सर्वश्रेष्ठ असा हा पुरस्कार कला अकादमीच्यावतीने दर दोन वर्षांनी देण्यात येतो. रुपये दोन लाख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. एका विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कला व संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष दयानंद मांद्रेकर यांनी गणेशपुरी म्हापसा येथील प्रा. मयेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सदर निवडीची माहिती देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्यासोबत कला अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर, कार्यक्रम व विकास अधिकारी डॉ. दत्तगुरू आमोणकर, कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर उपस्थित होते.
घरच्या पुरस्कारामुळे परमानंद : प्राचार्य मयेकर
कला अकादमीने ‘गोमंत शारदा’ पुरस्कार देऊन केलेला सन्मान हा घरचा सर्वांत मोठा सन्मान असल्याने आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या गोमंतकीय जनतेचे प्रतिनिधित्व करणारा हा सन्मान असल्याने त्याचा परमानंद झालेला आहे, अशी प्रतिक्रिया यंदाच्या ‘गोमंत शारदा’ पुरस्काराचे मानकरी व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी काल ‘नवप्रभा’ पाशी व्यक्त केली. या पुरस्कारापासून स्फूर्ती घेऊन आपण आणखी लिहू लागू असे ते म्हणाले.
सध्या आपण आपल्या ऐंशी वर्षांच्या जीवनाचे छायाचित्रात्मक आत्मचरित्र निर्मिण्याच्या प्रक्रियेत असून हा केवळ आपल्या वैयक्तिक जीवनाचा नव्हे, तर गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनाचा दृश्यात्मक इतिहास आहे, असे प्राचार्य मयेकर म्हणाले. अनेक जुन्या जाणत्या व्यक्तींचे दर्शन आपल्या या छायाचित्रात्मक पुस्तकातून गोमंतकीयांना घडेल. आज दिवंगत असलेली गोव्यातील मोठमोठी माणसे कशी होती, ते पाहायला मिळेल. केशव अनंत नायक, काशिनाथ दामोदर नायक, दामोदर अच्युत कारे अशा मोठमोठ्या व्यक्तींची दुर्मिळ छायाचित्रे या पुस्तकातून अभ्यासकांपुढे येतील असे प्राचार्य मयेकर म्हणाले. मराठी चळवळीचा आणि गोव्याच्या सांस्कृतिक जीवनाचा हा इतिहास ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्राचार्य मयेकरांचा परिचय
गोपाळराव मयेकर हे एक व्यासंगी विचारवंत, प्रसिध्द साहित्यिक व उत्कृष्ट वक्ते म्हणून सर्वांना परिचित असून साहित्य क्षेत्राबरोबरच संस्कृती, शिक्षण, समाजकारण व राजकारण अशा विविध क्षेत्रामध्येही त्यांचा नावलौकिक आहे. प्राचार्य मयेकरांचा परिचय
ङ्गस्वप्नमेघङ्घ, ङ्गज्ञानेश्‍वर माऊलींच्या पसायदानाची अपूर्वाईफ, ङ्गअनाहत ध्वनिपत्रसंग्रहफ, ङ्गज्ञानदेवांचे अध्यात्मचिंतन आणि आधुनिक विज्ञानफ, ङ्गश्री ज्ञानदेव संकीर्तनफ तसेच ङ्गमज दान कसे हे पडलेफ अशा विविध साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत. पणजी येथील धेंपे कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाचे अध्यापक व विभागप्रमुख तसेच म्हापसा येथील व्ही. एन. एस. बांदेकर कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. एप्रिल १९६७ ते जून १९७० गोव्याच्या दुसर्‍या मंत्रिमंडळात शिक्षण, आरोग्य, बांधकाम माहिती आणि पर्यटन या पाच खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद त्यांनी भूषविले आहे. नोव्हेंबर १९८९ ते १९९१ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पदाभार सांभाळलेला आहे. प्रा. मयेकर यांना यापूर्वी कला अकादमी तसेच गोमंत मराठी अकादमीचा साहित्य पुरस्कार, आचार्य द. वा. वाघ आदर्श शिक्षक पुरस्कार, संत साहित्य सेवा पुरस्कार, कोंकण मराठी परिषदेचा कालिदास पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.