दिल्लीत चर्चा…लडाखला अतिक्रमण!

0
134

हजारभर लाल सैनिक भारताच्या हद्दीत
एकीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत भेटीवर असतानाच लडाखच्या छूमर भागात हजारभर चीनी सैनिकांनी अतिक्रमण केले. हे सैनिक प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून भारताच्या हद्दीत आले व माघारी जायला त्यांनी नकार दिला. लेहपासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या छुमर भागातील घटनेची माहिती मिळताच भारताने तात्काळ तीन बटालीयन रवाना केले. दरम्यान, याआधीही याभागात चीनने अनेकदा अतिक्रमण केले आहे. बुधवारी ३०० चीनी सैनिक भारतीय हद्दीत दाखल झाले होते. त्यानंतर वाद मिटविण्यासाठी भारत-चीनच्या ध्वजाधिकार्‍यांची बैठक झाली मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. दरम्यान, गुरुवारी नव्याने झालेल्या अतिक्रमणाचा विषय मोदींनी भारत भेटीवर असलेले राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंंग यांच्याकडे उपस्थित केल्याचे परराष्ट्र खात्याकडून सांगण्यात आले. त्यावर सीमावादावर लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यास चिनी राष्ट्राध्यक्षांनी सहमती दर्शविल्याचेही पुढ म्हटले आहे.
चीन २० अब्ज डॉलर्स भारतात गुंतवणार
भारत – चीनने नव्या नात्याची सुरुवात करण्यास सहमती दर्शवत काल १२ करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. येत्या पाच वर्षांत आर्थिक संबंध दृढ करण्याकरिता भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी चीनने दर्शविली.
दीर्घकाळ चर्चेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कराराव स्वाक्षरी केली. दरम्यान, चर्चेवेळी व्हिसा तसेच सीमाप्रश्‍न चर्चेला आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, प्रसिद्ध कैलाश मानसरोवर यात्रा सिक्कीमहून नथूला खिंडीतून जाण्यासाठी परवानगी देणार्‍या करारावरही चीनच्याबाजूने स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ही यात्रा आता कमी अडथळ्यांची होणार आहे. भारताचे रेल्वेजाळे अधिक सक्षम करण्यासाठी मदतीचा हात देण्यासही चीनने मान्यता दिली. रेल्वेचा वेग वाढविणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चीन सहकार्य करणार आहे. चित्रपट सहनिर्मितीचा करारही झाला. जकात प्रशासन व आंतरदेशीय आर्थिक गुन्ह्यांत एकमेकांना सहकार्याचा करारही झाला. अंतराळ संशोधनात सहकार्याचेही ठरले. दरम्यान, मुंबई व शांघाय दमम्यान, आंतर शहर देवाण घेवाणीचाही करार झाला. २०१६च्या दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळ्यात चीन पाहुणा देश म्हणूनही सहभागी होणार आहे.