ड्रॅगन आणि हत्ती

0
79

एकीकडे पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिक भारतीय सैनिकांची सातत्याने कुरापत काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तीन दिवसांच्या भारतभेटीवर सपत्निक आले आहेत. चीन भारताशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्याचे पुरेपूर व्यापारी फायदे उठवू पाहात असला, तरी त्याची एकंदर नीती पाकिस्तानप्रमाणेच सदैव संशयास्पद राहिली आहे. तिबेटमधील चीनचा वाढता वावर, रस्ते आणि रेल्वेद्वारे सीमावर्ती भागांमध्ये सैन्य दळणवळण अधिक गतिमान करण्याचा सततचा प्रयत्न, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून भारतीय हद्दीत सातत्याने होणारी अतिक्रमणे या सार्‍या गोष्टींमुळे चीनची विश्वासार्हता केव्हाच निकाली निघाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात चीनचे पंतप्रधान ली केकियांग भारतभेटीवर आले होते, तेव्हाही दौलत बेग ओल्डीमध्ये चिनी सेना तब्बल १९ किलोमीटर आत आलेली होती आणि तीन ध्वजबैठकांमधूनही तो विवाद सुटू शकला नव्हता. यावेळी चिनी राष्ट्राध्यक्षांच्या भारतभेटीच्या आधी पूर्व लडाखमधील डेमचोकमध्ये पुन्हा घुसखोरी झाली आहे. एकीकडे सीमेवरील आक्रमकता दाखवत राहायचे आणि दुसरीकडे भारतीय बाजारपेठेतील उभरत्या संधींवर डोळा ठेवून मैत्रीचे उमाळे आणत गळाभेटी घ्यायच्या हा दुटप्पीपणा चीन सतत करीत आलेला आहे. चीन आणि भारत या आशियातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असल्याने त्यांचे परस्पर – सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते हे खरे असले, तरीही हे व्यापारी संबंध एकतर्फी राहता कामा नयेत. सध्या चीन आणि भारत यांच्यातील व्यापाराची स्थिती पाहिली, तर ती पूर्णतः एकतर्फी आहे. भारतातून चीनमध्ये निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाणच प्रचंड आहे. गेल्या दहा बारा वर्षांत दिवसेंदिवस निर्यात कमी होत गेली आहे. म्हणजेच भारताशी मैत्रीचा पुरेपूर फायदा चीननेच अधिक प्रमाणात उठवला आहे. सन २०१५ पर्यंत चीनशी व्यापार शंभर अब्ज डॉलरचा होईल असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले होते, परंतु किती भारतीय उत्पादनांची निर्यात चीनमध्ये होते? चीनची भारतातील गुंतवणूक प्रामुख्याने गुजरातमध्ये राहिली आहे आणि आताही शी जिनपिंग यांनी आपल्या भारतभेटीच्या प्रारंभीच गुजरातला भेट देण्यामागेही तेच कारण आहे. काल उभयपक्षी काही नवे करारही झाले. खरे तर चीन आणि भारत या दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याने काम करण्यास अनेकपदरी वाव आहे. सांस्कृतिक आदानप्रदानापासून औद्योगिक उत्पादनापर्यंतचे अनेक करार भारत आणि चीनदरम्यान या दोन दिवसांत होतील अशी अपेक्षा आहे. भारतातील औद्योगिक वसाहतींमध्ये चीनची गुंतवणूक, भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात योगदान, इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईलसारख्या बाजारपेठेचा विस्तार अशा अनेक बाबींना शी जिनपिंग यांच्या या भारतभेटीत चालना मिळेल. चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा त्यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू’ दैनिकात काल एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये उभय देशांच्या मैत्रीचे गान त्यांनी गायिलेले आहे. चीनची ऊर्जा आणि भारताचे ज्ञान यांच्याद्वारे उभयपक्षी प्रगती करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविलेला आहे. पण एकीकडे भारताशी हातमिळवणी करणारा चीन दुसरीकडे पाकिस्तानलाही डोळा मिचकावत असतो. त्याच्या महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. व्हिएतनामपासून जपानपर्यंत सर्वांशी विवाद निर्माण झालेले आहेत. ‘ब्रिक्स’ बँकेची स्थापना, बांगलादेश – चीन – भारत – म्यानमार आर्थिक कॉरिडॉरची प्रस्तावित निर्मिती, सागरी सिल्क रूटचा विकास अशा अनेक बाबतींत मोदी म्हणतात तसे ‘इंच’ (इंडिया – चायना) टू ‘माईल’ (मिलेनियम ऑफ एक्सेप्शनल सिनर्जी) संबंध प्रस्थापित करण्याचे स्वप्न पाहत असताना चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती यांनी परस्पर सहकार्याने काम करण्याची भाषा जिनपिंग यांनी केलेली असली, तरी लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हा चिनी ड्रॅगन भारतीय हत्तीला खायला उठतो, त्याचे काय? भारताशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करायचे असतील, तर चीनने आपली विदेश नीती अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करणे आवश्यक आहे. केवळ चिनी गुंतवणुकीच्या आशेने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेकडे कानाडोळा करण्याचे पातक मोदी सरकारने तरी करू नये.