अनुवाद व्हायला हवेत, पण…

0
251

– रिदम ठाकूर, वेळगे- पाळी
कोणत्याही वाचकाला सगळ्या भाषा येत नाहीत. सर्वसाधारण गोमंतकीय वाचकाला मराठी, कोकणी, इंग्रजी, हिंदी, पोर्तुगीज या भाषा येतात. येथे स्थायिक झालेल्यांना आपापल्या मातृभाषा येतात. वाचकाला इतर भाषांतले साहित्य वाचावयास मिळावे व प्रकाशकाला व्यवसाय मिळावा यासाठी पुस्तकांचे अनुवाद होऊ लागले. तसे अनुवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. सगळ्या भाषांमध्ये सातत्याने अनुवाद होत असतात. मराठीमध्ये तर इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाल्यावर अवघ्या तीन महिन्यांच्या काळांत ते अनुवादित होते. त्याला वाचकवर्गही मिळतो. साहित्यक्षेत्र श्रीमंत व्हायला हवे असल्यास अनुवाद हे व्हायलाच हवेत.
अलीकडेच कोकणी साहित्यिक एन. शिवदास यांचे विचार वाचनात आले. कोकणी इतर भाषक वाचकांपर्यंत पोहोचावयास हवी असेल, तर कोकणी साहित्याचा अनुवाद व्हायला हवा. जास्तीत जास्त साहित्य कोकणींत यायला हवे आणि कोकणी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित व्हायला हवे असे ते म्हणाले.
मराठीच्या तुलनेने कोकणी मागे आहे, याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या. मराठीच्या मागे साधारण १२ कोटी लोक आहेत, तर कोकणीमागे मंगळुरी वगैरे मिळून साधारण ५० लाख. त्यात कोकणी साहित्यिकांपुढे लिप्यांचा अडथळा आहे. अनेक लिप्या, त्यांचे साहित्यिक, वाचकही वेगळे. त्यामुळे असेल कदाचित, कोकणी साहित्याचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. तसे ते साहित्य इतर भाषांच्या तुलनेने सकस आहे. मात्र ज्या गतीने मराठी किंवा हिंदी साहित्य विकसित होते तसे कोकणी साहित्य विकसित होत नाही, हे कटू सत्य स्वीकारावेच लागेल. त्यामुळे कोकणी साहित्यिकांवर इतर साहित्यिकांपेक्षा जास्त जबाबदारी आहे.
इतर भाषांतील साहित्य कोकणीत यायला काही हरकत नाही. मात्र ते साहित्य मराठीतील नसावे, कारण सगळ्या देवनागरी कोकणी वाचक, साहित्यिकांना मराठी वाचावयास येते. त्याने ती वाचलेली आहेत व याच्यापुढेही तो ती वाचत राहील. जर मराठी पुस्तक अनुवादित करायचेच असेल तर ते कोकणीच्या रोमी वा कन्नड लिपीत करावे, कारण त्या लिपीच्या वाचकांचा मराठीशी ङ्गारसा संबंध आलेला नाही.
आदरणीय सुरेश आमोणकर सरांनी ज्ञानेश्‍वरीचा कोकणीत अनुवाद केला, मात्र तो कोणी वाचत असेल असे वाटत नाही. बहुतेक गोमंतकीय व्यक्ती मराठी वाचतात. ते मूळ मराठी ज्ञानेश्‍वरी वाचतील, कोकणी ज्ञानेश्‍वरी कशाला वाचावयास जातील? रमेश वेळुस्कर यांनी तुकारामाची गाथा कोकणीत अनुवादित केली आहे, तेथेही हाच प्रकार होईल. मात्र याचा अर्थ वरील दोघांचेही काम क्षुल्लक आहे असे म्हणावयाचे नाही. पुस्तक हे वाचकासाठी लिहायचे असते. त्या अर्थाने पाहावयास गेल्यास वरील दोन्ही पुस्तकांना ङ्गारसे वाचक मिळणार नाहीत. मात्र ही दोन्ही पुस्तके कन्नड लिपीमध्ये कोकणीत अनुवादित झाली असती तर देवनागरीपेक्षा त्यांना जास्त वाचकवर्ग मिळाला असता. तेव्हा कोकणीत अनुवाद करावयाचाच असल्यास तो पोर्तुगीज, कन्नड, इंग्रजी, हिंदी पुस्तकांचा करावा. मराठी नव्हे!
कोकणी साहित्याचा अनुवाद व्हायला हवा हे विचार पटले. गोमंतकीय आणि दक्षिणेकडच्या कोकणी साहित्याचा मराठीत अनुवाद व्हायला हवा. बहुतेकांना मराठी लिहायला येते. त्यामुळे हे काम तसे अवघड नव्हे. नियोजीत ‘गोवा मराठी अकादमी’ने हे कार्य हाती घ्यावे. कोकणी अकादमीही यावर विचार करू शकते. नॅशनल बुक ट्रस्टने अनेक मराठी, हिंदी पुस्तकांचे कोकणीत अनुवाद केले आहेत. कोकणी पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले आहेत की नाही हे माहीत नाही.
इतर भाषांतील पुस्तकांचा कोकणीत अनुवाद व्हावाच, पण कोकणी साहित्याचे काय? कन्नड वा रोमी लिप्यांमधले असे कितीसे साहित्य देवनागरी कोकणीत आले आहे? गोव्यातील कितीसे देवनागरी कोकणी साहित्य कन्नड, रोमी लिपीत गेले आहे? गोव्यात देवनागरी आणि रोमी, कर्नाटकात कन्नड हे तीन प्रवाह समांतर वाहत आहेत. ते एकत्र यावेत यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. नुसते अनुवाद व्हायला हवेत, म्हणून काय ङ्गायदा?
कोकणीत जो उठतो तो कविता, कथा लिहितो. निबंधासारखे ललित साहित्य लिहिणारेही आहेत. त्यांनी इतर विषयांवरही लिहावयास हवे. विषय सुचत नसल्यास इंग्रजी, मराठी पुस्तकांवर एक नजर ङ्गिरवावी. भरपूर विषय मिळतील. अनुवादाची मोहीम सुरू करून हे करता येईल. मात्र ही सगळी उसनवारी ठरेल. त्यात अस्सल असे काही नसेल. कथा, कादंबरी, नाटक, कविता लिहिली तरच साहित्यिक असा एक समज सगळ्या भाषांमध्ये आहे. समीक्षा, संशोधनात्मक साहित्य, विज्ञान- उद्योग- तंत्रज्ञान, संगणक तसेच इतर विषयांवरील साहित्यही प्रत्येक भाषेमध्ये यावयास हवे. मराठीत ते आहे, कोकणीत?
गोमंतकीयांना पोर्तुगीज, इंग्रजी भाषा इतर भाषकांपेक्षा जास्त चांगली येते. कर्नाटकातील कोकणीभाषकांना कन्नडही येते. त्यामुळे त्या भाषांमधले साहित्य कोकणीत यायला हरकत नाही. बंगाली साहित्यही कोकणीत यायला हवे. कारण रमेश वेळुस्करसरांसारखे साहित्यिक बंगाली जाणतात.
अनुवादित साहित्य दर्जेदार असेल याची खबरदारी अनुवादकर्त्याने घ्यावयास हवी. उगाच दिसले पुस्तक, केले अनुवादित असा प्रकार होता कामा नये. कोकणीमध्ये कागदावर जे उमटेल ते छापण्याची पद्धत आहे. ती ताबडतोब बंद व्हायला हवी. नपेक्षा कोकणीचा दर्जा आणखी घसरेल. कोठल्याही पुस्तकाचा अनुवाद करावयाचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. अङ्गाट वाचन असल्याशिवाय इतर भाषांमध्ये काय चालले आहे त्याचा अंदाज येणे शक्य नाही. तेव्हा कोकणी साहित्यिकाने जमेल तेवढे वाचन करावयास हवे. नवोदीत साहित्यिकाने चार ओळी लिहिल्या तर दहा ओळी वाचावयास हव्यात. अलीकडे सगळ्याच भाषकांचे वाचन कमी झाले आहे. पुस्तक वाचत नसल्यास निदान इंटरनेटवर वाचन करावे. ढीगभर ई पुस्तक पडली आहेत. पुरस्कारांसाठी लिहिण्याचे ङ्गॅड अलीकडे आलेले पाहावयास मिळते. कोकणीही याला अपवाद नाही.
कोकणी विकसित व्हावी या हेतूने अनेकजण अनुवाद व्हायला हवेत असे बोलतात. मात्र त्यासाठी ती शालेय स्तरावर शिकली पाहिजे असे मला वाटते. लोकाश्रय मिळाल्याखेरीज भाषा विकसित होणे असंभव. इंंग्रजीचा सोस असलेले कोकणीभाषक पालक असतील तर हे शक्य नाही. दैनंदिन व्यवहारातही तिचा वापर व्हायला हवा. ङ्गक्त अनुवाद केल्यास कोकणी भाषा गोल गरगरीत होईल, मात्र ती वरवरची सूज असेल हे विसरू नये!