हा तर चोंबडेपणा

    0
    149

    ज्येष्ठ हिंदी पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी आपल्या पाकिस्तान दौर्‍यात जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याची भेट घेतल्यावरून सत्ताधारी भाजपाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल त्याचे पडसाद उमटले. दुसरीकडे, वैदिक यांनी आपली ही भेट पत्रकार या नात्याने असल्याने कशी योग्य होती त्याचे जोरदार समर्थन चालवलेले आहे. मुळात या सार्‍या वादाला वेगवेगळ्या बाजू आहेत. वैदिक यांनी जे केले ते योग्य होते का हा एक भाग, वैदिक यांची सईद याच्याशी ही भेट घडवण्यात भारत सरकारचा काही हात होता का किंवा भारत सरकारचे अनौपचारिक दूत म्हणून ते त्याला भेटण्यास गेले होते का हा दुसरा भाग आणि काश्मीर किंवा सईदसंबंधीची वैदिक यांची मते हा तिसरा भाग. मात्र, या तिन्ही गोष्टींची गल्लत करून सध्या गदारोळ माजवला जात आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे झाले तर वैदिक हे सध्या एक स्तंभलेखक आहेत. पूर्वी ते नवभारत टाइम्स या हिंदी दैनिकाचे संपादक होते. पीटीआय भाषा या हिंदी वृत्तसंस्थेवरही ते होते. सध्या विविध हिंदी तसेच काही मराठी वर्तमानपत्रांमध्ये ते स्तंभलेखन करतात. पत्रकारितेमध्ये आपण गेली पाच दशके आहोत आणि नेपाळच्या माओवाद्यांपासून अफगाणिस्तानमधील तालिबान्यांपर्यंत अनेकांना भेटत आलो आहोत. त्यामुळे जेव्हा आपल्या पाकिस्तान भेटीत एका स्थानिक पत्रकारामुळे हाफिज सईदला भेटण्याची संधी चालून आली तेव्हा आपण ती घेतली असा त्यांचा एकंदर युक्तिवाद आहे. पत्रकार या नात्याने अशी भेट घेण्यात गैर काही नाही. बातमीच्या शोधात पत्रकार भिंद्रनवालेंपासून वीरप्पनपर्यंत अनेकांच्या भेटीला यापूर्वीही गेले आहेत आणि त्यांनी खळबळ माजवून दिलेली आहे. आता वैदिक – सईद भेट घडवण्यात भारत सरकारचा काही हात होता का किंवा नरेंद्र मोदींचे दूत म्हणून ते गेले होते का या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेल्यास तसा कोणताही दुवा मिळत नाही. सरकारने तर हाफिज सईद हा दहशतवादी आहे असे ठणकावत वैदिक यांच्यापासून हात झटकले आहेत. वैदिक हे बाबा रामदेव यांचे सहकारी. त्यामुळे वैदिक आणि मोदी सरकार व्हाया रामदेव असे नाते जुळवण्याच्या खटपटीत सध्या कॉंग्रेस पक्ष आहे, परंतु वैदिक ज्या शिष्टमंडळातून पाक दौर्‍यावर गेले, त्यात कॉंग्रेसचे मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शीदही होते. त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय भांडवल उपटण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न फोल ठरतो. तिसरा मुद्दा आहे तो वैदिक यांनी हाफिज सईदचे जे वकीलपत्र घेतले आहे किंवा काश्मीर संदर्भात जी भूमिका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली आहे त्याचा. खरा आक्षेप याला असायला हवा. ज्या हाफिज सईदने मुंबईमध्ये रक्ताचे सडे शिंपडले, त्याला निर्दोष, निरपराध रूपात प्रस्तुत करण्याचा सूर वैदिक यांच्या एकंदर प्रतिपादनाला येतो, जो निषेधार्ह आहे. वैदिक सांगतात की हाफीज म्हणतो की त्याचा कोणत्याही दहशतवादी कारवाईत हात नाही. केवळ भारतीय दबावामुळे अमेरिकेने जमात उद दावावर बंदी घातली. भारतामध्ये आपली जाहीर सभा आयोजित करा, आपण तेथे येऊन बोलतो असेही हाफिजने या वैदिक महाशयांना सुचवल्याचे ते सांगतात. या देशाविरुद्ध जिहाद पुकारणार्‍या, वेळोवेळी अत्यंत चिथावणीखोर गरळ ओकणार्‍या त्या दहशतवाद्यासाठी हे वैदिक महाशय येथे पायघड्या अंथरणार आहेत की काय? मोदी पाकिस्तानात आले तर चालेल का, अशी परवानगीही त्यांनी सईदला विचारली. जणू काही आपण भारताच्या वतीने आपल्या भेटीला आलो आहोत अशा थाटात वैदिक यांनी सईदशी संभाषण केले आहे. हा चोंबडेपणा करायला त्यांना सांगितले कोणी? पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर आणि भारतीय ताब्यातील काश्मीर जोडून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची अजब कल्पनाही वैदिक यांनी तेथील वृत्तवाहिनीपुढे मांडली. ही भूमिका तर सरळसरळ देशद्रोहीपणाची आहे. आपण जिवाची बाजी लावून सईदला भेटल्याचा आव वैदिक आणत असले, तरी प्रत्यक्षात हाफिज सईदनेच वैदिक यांना मुलाखत देऊन भारतात स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी वापरून घेतले आहे. स्वतःच्या पत्रकारितेचा बडेजाव सांगणार्‍या वैदिक यांच्या हे अजूनही लक्षात येत नाही हे दुर्दैव!