अधिवेशनासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार : सभापती

0
273

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर गोवा विधानसभेच्या येत्या २७ जुलैपासून सुरू होणार्‍या दहा दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी खास मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी केली जाणार आहे. विधानसभेच्या या अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या पावसाळी अधिवेशनात सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर्स आदी सूचनांचे पालनासाठी खास मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे. सभागृहात सदस्यांच्या बसण्याच्या जागांमध्ये आवश्यक अंतर आहे. अधिवेशनाचे कामकाजाचे वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांसाठी गरज भासल्यास आणखी जागा उपलब्ध केली जाणार आहे. अधिवेशनासाठी येणारे सरकारी अधिकार्‍यांसाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे, असेही सभापती पाटणेकर यांनी सांगितले.

पावसाळी अधिवेशनासाठी आमदारांचे प्रश्‍न स्वीकारण्याची प्रक्रिया २ जुलैपासून सुरू होणार आहे. आमदार ऑनलाइन पद्धतीने प्रश्‍न पाठवू शकतात, असेही सभापती पाटणेकर यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाची आमदार अपात्रता प्रकरणी नोटीस प्राप्त झाली असून या नोटीसला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या याचिकेत सभापतींना प्रतिवादी करण्यात आले आहे. सभापतींच्यावतीने नोटीसला न्यायालयात उत्तर सादर केले जाणार आहे, असेही सभापतींनी सांगितले.