अहंकार सोडला तरच भरभराट : मुख्यमंत्री

0
316

>> ‘दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार २०१५-१६’ पी. आनंदला प्रदान

विविध खेळाशी संबंधित असलेल्या राज्य संघटनांनी स्वतःचा अहंकार, स्वार्थ बाजूला ठेवला तरच गोव्यात उच्च दर्जाचे खेळाडू घडतील. संघटनांना अंतर्गत कलहातून वेळ मिळत नसल्यानेच गोवा दर्जेदार खेळाडू घडविण्यात मागे पडत असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी केले.

दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडामंत्री बाबू आजगावकर, राजदीप सरदेसाई व क्रीडा संचालक व्ही.एम. प्रभुदेसाई उपस्थित होते. दिलीप सरदेसाई यांच्यानंतर गोवा देशाला दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देऊ शकला नाही तसेच अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील संघात एकही गोमंतकीय नाही, अशी खोचक टीका राजदीप सरदेसाई यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपरोल्लेखित वक्तव्य केले.

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. प्रत्येक वर्षी पाच खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च उचलण्याची सरकारची तयारी असून क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांना विश्‍वासात घेऊन आगामी काळात याप्रकारची विशेष योजना सरकार तयार करेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तायक्वांदोपटू पी. आनंद याचा यावेळी यंदाच्या दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ध्येयपूर्तीसाठी झटल्यानेच यश प्राप्त होत असल्याचे यावेळी आनंद याने सांगितले. गोवा तायक्वांदो असोसिएशनचा आदर्श घेऊन राज्यातील इतर संघटनांनी खेळासाठी कायम झटत राहावे. उत्तमोत्तम खेळाडू घडविण्यासाठी निधीची कमतरता कधी भासणार नाही याची दक्षता सरकार घेईल, असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.