राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीत

0
254
Rafael Nadal of Spain returns the ball to Alexandr Dolgopolov of the Ukraine during their Round 4, US Open 2017, Men's Singles match at the USTA Billie Jean King National Tennis Center on September 4, 2017, in New York. / AFP PHOTO / TIMOTHY A. CLARY

स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदाल याने काल सोमवारी युक्रेनच्या आलेक्झांडर दोल्गोपोलोव याचा ६-२, ६-४, ६-१ असा १०१ मिनिटांत पराभव करत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
तेराव्या मानांकित पेट्रा क्विटोवाने सनसनाटी निकाल नोंदविताना चौथ्या फेरीत तिसर्‍या मानांकित गार्बिन मुगुरुझा हिला ७-६, ६-३ असे सरळ दोन सेटमध्ये बाद केले. हा सामना १ तास ४६ मिनिटे चालला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना नवव्या मानांकित व्हीनस विल्यम्सशी होणार आहे.
सानिया-पेंग उपांत्यपूर्व फेरीत
महिला दुहेरीच्या तिसर्‍या फेरीत सानिया मिर्झा व तिची चीनी साथीदार शुई पेंग या चौथ्या मानांकित जोडीने रोमानियाच्या सोराना सर्स्टिया व स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्नो यांना ६-२. ३-६, ७-६ असे हरवून चौथी फेरी गाठली. या फेरीत या द्वयीला टिमिया बाबोस (हंगेरी) व अँड्रिया लावाकोवा (झेक प्रजासत्ताक) या पाचव्या मानांकित जोडीशी किंवा सू वेई से (तैवान) व मोनिका निकुलेस्कू (रोमानिया) या १२व्या मानांकित जोडीशी सामना करावा लागणार आहे. पुरुष दुहेरीत मात्र लिएंडर पेस व पूरव राजा यांना दुसर्‍या फेरीत हार पत्करावी लागली. कॅरेन खाचानोव व आंद्रे रुबलेव या रशियन जोडीने भारतीयांचा ६-४, ७-६ असा पाडाव केला.
बोपण्णा- दाब्रोवस्की अंतिम आठांत
रोहन बोपण्णा व गेब्रिएला दाब्रोवस्की या इंडो-कॅनडियन जोडीने दुसर्‍या फेरीचा अडतला पार करत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सातव्या मानांकित या जोडीने दुसर्‍या फेरीत मारिया जुझे मार्टिनेझ सांचेझ (स्पेन) व निकोलस मन्रो (अमेरिका) यांना ६-३, ६-४ असे नमविले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना तिसर्‍या मानांकित हाओ चिंग चान (तैवान) व मायकल व्हीनस (न्यूझीलंड) या जोडीशी होणार आहे.
दिवस सातवा ः निकाल ः पुरुष एकेरी ः चौथी फेरी ः पाब्लो कारेनो बुस्टा (१२) वि. वि. डॅनिस शापोवालोव ७-६, ७-६, ७-६, सॅम क्वेरी (१७) वि. वि. मिश्‍चा झ्वेरेव (२३) ६-२, ६-२, ६-१, केव्हिन अँडरसन (२८) वि. वि. पावलो लॉरेन्झी ६-४, ६-३, ७-६, ६-४, महिला एकेरी ः चौथी फेरी ः अनास्तासिया सेवास्तोवा (१६) वि. वि. मारिया शारापोवा ५-७, ६-४, ६-२, व्हीनस विल्यम्स (९) वि. वि. कार्ला सुआरेझ नवारो ६-३, ३-६, ६-१, ज्युलिया जॉर्जेस (३०) पराभूत वि. स्लोन स्टीफन्स ६-३, ३- ६, ६-१