‘आहार’ रोगांचे कारण?…
मग चला नैसर्गिक, ऑरगॅनिककडे…

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

एकूणच खराब झालेल्या जमिनीला पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे, हजारो एकर पडीक जमीन पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे व माणसांना शेतीप्रवण करणे हे प्रथम कर्तव्य! त्यानंतर प्रत्येकाने अनैसर्गिक अन्नाचाच नव्हे तर दुसर्‍या कुठल्याही अनैसर्गिक वस्तूंचा (उदा- सौंदर्यप्रसाधने) अजिबात वापर करणार नाही… असा निश्‍चय करावा.

‘आहार आणि रोगांचे कारण…?’ हे शीर्षक वाचून जरा आश्‍चर्यच वाटले असेल. पण गेल्या ५० वर्षांत औषधी शास्त्रावर खूपच वाढते संशोधन होत आहे. नवनवीन औषधे बाजारात येऊ लागली आहेत. तसेच नवनवीन रोगही उत्पन्न होत आहेत. याचे मूळ कारण आहे आपली बदललेली सर्वांची आहार पद्धती! आपली नैसर्गिक लागणारी भूक सुद्धा आपल्याला औषधांच्या उपयोगाने वाढवावी लागते. रात्र झाली की सहज निद्रावस्था प्राप्त व्हायची. ती आता झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून आहे. मातृत्वासाठी नैसर्गिक दैवी देणगी, आता औषधांनी विकत घ्यावी लागत आहे. स्त्री-पुरुषांचे शारीरिक व मानसिक खच्चीकरण एवढे झालेले आहे की पुरुषांना त्यांचे पौरुषत्व जपण्यासाठी औषधांचा आधार घ्यावा लागतो आहे व स्त्रियांचा मानाचा तुरा असलेले गर्भाशय काढून टाकले जात आहे. याला काय म्हणावे!! कलियुगाचा प्रभाव की आपल्या अनैसर्गिक आहाराचा प्रभाव?
आजकाल कोणत्याही किंवा सगळ्या ऋतूंत सगळ्या प्रकारची फळे मिळतात आणि तशीच ती कोणत्याही ऋतूंत खाल्लीही जात आहे. बरे एवढेच नव्हे सगळ्या प्रकारच्या फळांचे आकारमानही बर्‍यापैकी वाढलेले आहे. उदा. बोराचे घ्या. त्याचा आकार केवढा आणि आता बाजारात मिळणारे बोर पहा, बोर की हिरवा सफरचंद? बरे रंगातही फळांच्या काय बदल झाला पहा! सफरचंद लाल असते हे आपल्याला माहीत, आपण लहानपणी चित्र जरी काढले तरी सफरचंदाच्या चित्राला लालच रंग द्यायचो. आता लाल द्यावा का हिरवा? आपल्या देशात न उगवणारी, ज्यांची नावे सुद्धा आपल्याला माहीत नाही, तीसुद्धा फळे आपण आवडीने खाऊ लागलो. तसेच ‘सीडलेस’ फळे हाही प्रकार बराच फोफावत आहे. जरा विचार करा… असे हे सर्व ऋतूकात न बघता प्लास्टिकच्या घरात उगवलेली फळे, अन्न, भाजीपाला असे अनैसर्गिक पदार्थ खाऊन आपल्याला पोषक अंश मिळतात? की रोगराईला आमंत्रण?
लोकांची, थोरा-मोठ्यापासून लहानग्यापर्यंत खाण्यातली अभिरुची एवढी बदलली आहे की गरम-गरम जेवण; तव्यावरच्या गरमागरम चपात्या-भाकरींपेक्षा रेडी-टू-युज, फास्ट फूड, फ्रीजमधलं जेवण ओव्हनमध्ये गरम करून खाण्यात धन्यता वाटू लागली आहे. घरात तयार केलेल्या मसाल्यांपेक्षा बाजारातील तयार मसाले जास्त स्वादिष्ट वाटू लागले आहेत. छान फोडणी देऊन, मीठ-मसाला टाकून केलेल्या भाजीपेक्षा उरल्या-सुरल्या भाज्यांचे मिश्रण एकत्र करून बनवलेले कटलेट जास्त आवडू लागले आहे. दुधात मस्त हळदपूड शिजवून दूध देणारी आजी आता राहिली नाही. आजीची जागा मम्मीनी व हळदपूडची जागा आता ‘बॉर्नव्हिटा’, ‘कॉम्प्लान’ने घेतली आहे. म्हणजे नुसते साखरयुक्त दूध. शाकाहाराची जागा मांसाहाराने घेतली. मुलांना मांसाहार प्रिय वाटू लागलाय. त्यातही चांगले घरात शिजलेले मांस सोडून तंदूरमध्ये भाजलेले मांस तर सगळ्यांनाच प्रिय वाटू लागले आहे. अशा प्रकारे शिजवून खाल्लेले अन्न मनुष्यप्राणी आपल्या शरीरात पचवू शकतो का??
नैसर्गिक – सात्विक अन्नाशिवाय आरोग्यदायी जगण्याला पर्याय नाही… हे आता मनुष्याच्या लक्षात यायला लागलेले आहे, म्हणून तरी नैसर्गिक अन्न मिळविण्याच्या शोधात आहे. पण आज नैसर्गिक अन्न हे नैसर्गिक पद्धतीने मुळी उगवलेच जात नाही. रासायनिक खते, कीटकनाशकांचा भरपूर उपयोग, संकरित तसेच गुणसूत्र बदलून केलेल्या प्रयोगांनी पीक वाढते पण पोषकतत्वे घटतात. गायी-म्हशींचीही तीच तर्‍हा! गायी-म्हशी व दूध व दुधाचे पदार्थ या बाबतीत पण संकरित वाण आणि जनावरांना दिलेले अनैसर्गिक खाद्य व हार्मोन व इतर औषधे यामुळे मनुष्यमात्रांना नवीन नवीन रोगांना कसे तोंड द्यावे लागत आहे हेही दिसून येत आहे. अनैसर्गिकरीत्या अन्न व औषधे देऊन वाढवलेल्या प्राण्याचे मांस खाऊन किती भयंकर मोठी आपत्ती ओढवली हे ‘बर्ड फ्लू’सारख्या आजारांनी स्पष्ट होते.
कमी श्रमांनी खूप उत्पन्न मिळण्यासाठी रासायनिक शेती करून गहू-तांदूळ यांच्यासारखेच दिसणारे पण संपूर्ण वेगळ्या गुणधर्माचे सर्व अन्नधान्य, भाजी, फळफळावळ देणारे वाण तयार झाले, ज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे गेल्या काही वर्षांत संपूर्ण मानवजातीचे आरोग्य पूर्ण ढासळत चालले आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांनी जमीन पूर्ण जळून-होरपळून गेली आहे. आणि अशा संकरामुळे वांझ झालेल्या जमिनीतून काहीही उगवणे शक्य राहिले नाही. अशा प्रतीचे अन्न खाल्ल्यामुळे, अन्नातील झालेल्या गुणसूत्रातील बदलांमुळे मनुष्याच्या गुणसूत्रातही बदल होतात. मग असे निकृष्ट अन्न आपले शरीर सुदृढ करू शकते का?
हे सगळं आज अचानक घडलेलं नाही. मनुष्य मोहपाशात अडकून निसर्गाविरुद्ध वागू लागला, तेव्हापासूनच याची सुरुवात झाली. जगाच्या उत्पत्तीच्या मुळाशी वनस्पतीजन्य अन्न हेच कारण असते व त्यामुळे जसे अन्न खावे तशी प्रकृती, तसा स्वभाव व तशी माणसे तयार होतात. प्रत्येक वस्तूचा एक स्वभाव असतो. आयुर्वेदात अन्नधान्य, भाजीपाला, पाणी, फळफळावळ वगैरे सर्व द्रव्यांचा अभ्यास करून त्याचा स्वभाव, गुणदोष लिहून ठेवलेले आहेत. स्वभाव म्हणजे त्या वस्तूंचे जडत्व, उष्ण-शीतत्व, खारट-गोड आदी चवी, शरीरावर त्याचा होणारा परिणाम व त्याचे होणारे कर्म. कुठल्या झाडाला किती पाणी लागतं; किती सूर्यप्रकाश लागतो; कुठल्या प्रकारच्या मातीची आवश्यकता आहे; कुठला ऋतू अनुकूल असतो…. हे सर्व ठरलेलं असतं. वातावरणात बदल करून चुकीच्या जमिनीत रासायनिक खते वापरून तयार केलेले अन्न हा वेगळा प्रकारच म्हणावा व हे अनैसर्गिक होय. त्यातून दोन विजातीय संयोगातून तयार केलेली वनस्पती म्हणजे संकरीत व गुणसूत्रं बदललेली वनस्पती… मूळ स्वभावाशी इमानदार कशी राहणार?…
उत्पादन वाढावं, आकार वाढावा व सुंदरही दिसावे अशी अपेक्षा ठेवली म्हणजे गुणसूत्रात बदल व पर्यायाने मूळ स्वभावात बदल व त्याच्यापासून मिळणारे अन्नपण अनैसर्गिक. प्रत्येक वनस्पतीचा जसा एक स्वभाव असतो, तशी त्याची रोगप्रतिकारशक्तीही ठरलेली असते. वनस्पतींवर पडणारी कीड किंवा रोगराईचे निवारण करण्यासाठी अत्यंत जहरी कीटकनाशके वापरली जातात. परिणामतः हेच कीटननाशकांचे विष वनस्पतींमध्ये भिनते व रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
सध्या अन्न, औषध किंवा इतर वस्तू या वनस्पतीजन्य (हर्बल) या लेबलखाली ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. खरे पाहता नुसते वनस्पतीजन्य म्हणणेच पुरेसे नाही. वनस्पतीजन्य म्हणण्याबरोबर ते सेंद्रिय किंवा नैसर्गिक उत्पादन असायला हवे. सेंद्रिय किंवा नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक बियाणांपासून व नैसर्गिक खतं वापरून उगवलेले अन्न ते सेंद्रिय अन्न. वाढत्या रोगांचा विचार करून सध्या बायोफूड, ऑरगॅनिक फूड, सेंद्रिय अन्न, सेंद्रिय शेती या संकल्पनांना खूप महत्त्व आले आहे. सध्या ज्याला ऑरगॅनिक किंवा सेन्द्रिय म्हटले जाते त्यालाच आयुर्वेदाने ‘नैसर्गिक सात्विक अन्न’ म्हटले आहे.
‘सर्व अन्ने प्रतिष्ठितम्‌|’ या सूत्रानुसार आयुर्वेदाने सगळं काही अन्नाच्या अधीन आहे, असे म्हटले आहे. म्हणून आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी उत्कृष्ट अन्नाचीच गरज आहे. बाकी सर्व शून्य. असे हे जीवनास अत्यावश्यक असलेले अन्न अधिकाधिक जीवनोपयोगी कसे बनवता येईल, यासाठी आयुर्वेद शास्त्रात अनेक मार्ग सुचवले आहेत. ‘अग्निसंस्कार’, ‘कालसंस्कार’ एवढेच नाही तर अन्न कधी खावे?… कसे खावे?… कशाबरोबर खावे?… अशा लहानातल्या लहान पण अत्यंत मोलाच्या सूचनाही केलेल्या आहेत. अन्न या संकल्पनेचा पूर्ण विकास करून मनुष्याची व अन्नाची प्रकृती यांचा अभ्यास करून काय खाल्ल्याने कल्याण होईल याचे मोठे शास्त्र विकसित केले. सर्व सृष्टीच्या उत्पत्तीत प्राणिमात्र व मनुष्य उत्पन्न होण्यापूर्वी प्रथम तयार झाली वनस्पतीसृष्टी! म्हणजे मनुष्यापुरती अन्न निसर्गाने आधीच तयार केलेले आहे.
सात्विक, नैसर्गिक अन्न सर्व शरीराला म्हणजेच पर्यायाने सर्व इंद्रियांना शक्ती देणारे असते व ते कार्बन, हायड्रोजन व ऑक्सीजन या नैसर्गिक मूलद्रव्यांच्या सहयोगाने तयार झालेले असते म्हणून सेंद्रिय. अनैसर्गिक वस्तू खाऊन नंतर औषधपाण्यावर खर्च करत बसण्यापेक्षा अन्नालाच(सेंद्रिय) महत्त्व व किंमत द्या.
एकूणच खराब झालेल्या जमिनीला पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे, हजारो एकर पडीक जमीन पुन्हा शेतीसाठी उपयुक्त करणे व माणसांना शेतीप्रवण करणे हे प्रथम कर्तव्य! त्यानंतर प्रत्येकाने अनैसर्गिक अन्नाचाच नव्हे तर दुसर्‍या कुठल्याही अनैसर्गिक वस्तूंचा (उदा- सौंदर्यप्रसाधने) अजिबात वापर करणार नाही… असा निश्‍चय करावा. शेतीतील वस्तू शेतीतच वापरून निसर्गचक्राचे संतुलन ठेवावे.
‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ याच निष्ठेने फक्त सेंद्रिय अन्नच खाण्याचा निर्धार करावा व सेंद्रिय पद्धतीचे सात्विक अन्न सेवन करून शरीर मन व आत्मा यांचे पूर्ण आरोग्य अनुभवता येईल.