९६ टक्के विद्यार्थ्यांची आधारकार्डशी जोडणी

0
134

>> शिक्षण संचालक गजानन भट यांची माहिती

राज्यातील ९६ टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत आधारकार्डशी जोडण्यात आले असल्याचे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. उर्वरीत ४ टक्के विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आधारकार्डशी जोडण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीड-दोन महिन्यांपूर्वी ९४ टक्के विद्यार्थ्यांना आधारकार्डशी जोडण्यात आले होते. नंतरच्या काळात आणखी दोन टक्के विद्यार्थ्यांना जोडण्यात आल्याने संख्या ९६ टक्क्यांवर पोचल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करता यावे यासाठी नियोजन आणि सांख्यिकी संचालनालयाकडे शिक्षण खात्याला त्यासाठीचे ‘किट’ पुरवण्याची सूचना केली होती. पण सदर संचालनालयाला ती अद्याप पूर्ण करता आली नसल्याचे भट यांनी स्पष्ट केले. सदर संचालनालयाचे दर एका तालुक्यात केवळ एकच केंद्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधार कार्डसाठी तेथे पाठवण्यास गर्दी होत असल्याचे दिसून आल्याने आम्ही त्यांच्याकडे ‘किट’ची मागणी केली होती. त्यांनी ते पुरवल्यास आम्हीच एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांना आधार नोंदणीसाठीचे काम हाती घेऊ शकलो असतो, असे भट यांचे म्हणणे होते. आता केवळ ४ टक्के विद्यार्थ्यांनाच आधारकार्डे मिळणे बाकी आहे. काही शाळांत १० ते १५ तर काही ठिकाणी केवळ ४-५ विद्यार्थ्यांकडे आधारकार्डे नसल्याचे आढळून आले असल्याचे भट यांनी स्पष्ट केले.
विविध लाभ थेट
विद्यार्थ्यांच्या खात्यात
एकदा विद्यार्थ्यांना आधारकार्डशी जोडण्यात आले की त्यांना शिष्यवृत्तीद्वारे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे आर्थिक लाभ मिळाला तर पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा करणे शक्य होणार असल्याचे भट यांनी नमूद केले. तसेच एकाच विद्यार्थ्याला अनेक शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करता येत नाही. काही विद्यार्थी एकापेक्षा जास्त शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करून दुप्पट लाभ घेत असतात. एकदा विद्यार्थ्यांना आधारकार्डशी जोडण्यात आले की त्यावर नियंत्रण येणार असल्याचे भट म्हणाले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्यात आल्यानंतर अनेक बाबतीत सुसूत्रता येणार असल्याचे भट यांनी सांगितले.