६० ग्रेडच्या खनिजावरील निर्यात शुल्क रद्द करावेत

0
103

>> मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची काल गुरूवारी नवी दिल्ली येथे भेट घेऊन राज्यातील खाण व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ६० ग्रेडच्या खनिजावरील निर्यात शुल्क रद्द करावेत, अशी मागणी केली.
केंद्रीय खाण मंत्री तोमर यांच्याशी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खाण क्षेत्राशी संबंधित सर्व विषयांवर चर्चा केली. ५८ ग्रेडच्या खनिजाला निर्यात शुल्क आकारले जात नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज मालाच्या दरात घसरण झाल्याने खाण उद्योजक खनिज व्यवसाय सुरू करण्यास वेळकाढूपणा करीत आहेत. गोव्यातील खनिज व्यवसायाला पुन्हा एकदा बळकटी देण्यासाठी ६० ग्रेडच्या खनिजावरील निर्यात शुल्क शून्य करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.

केंद्रीय वाहतूक, भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचीही मुख्यमंत्री पर्रीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्ली येथे भेट घेतली. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी अतिरिक्त २ हजार कोटींचा निधी उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मोले ते कुर्टी या राष्ट्रीय महामार्ग ४ – ए च्या रुंदीकरणाच्या कामाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात येणार्‍या अडचणी, समस्या केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर मांडण्यात आल्या आहेत.

केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची मुख्यमंत्री पर्रीकर यांनी भेट घेतली. राज्यातील पर्यावरणासंबंधीच्या सर्व मुद्यांवर या भेटीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्ली येथे भेट घेतली. गृहमंत्रालयाशी संबंधित अधिकार्‍यांच्या नियुक्त्या व इतर विषयांवर या भेटीत चर्चा करण्यात आली.