५१९ विदेशी पर्यटकांसह पहिले चार्टर विमान दाखल

0
108

यंदाच्या पर्यटन मोसमातील पहिले चार्टर विमान काल सकाळी ८.३० वाजता ५१९ पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर दाखल झाले. रशिया एअरलाईन्सचे ‘बोईंग ७४७’ हे विमान मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरताच पर्यटन खात्यातर्फे ब्रास बँड वादनाने व गुलाब पुष्प देऊन भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यटकांना मिठाईही देण्यात आली. दरम्यान, काल गोव्यात पहिले चार्टर विमान आल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोव्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांची संख्या ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता पर्यटन खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी पहिले चार्टर विमान गोव्यात २ ऑक्टोबर रोजी आले होते. आर्थिक मंदीमुळे गेल्या पर्यटन मोसमात जगभरात चार्टर विमानांची संख्या कमी झाली होती. मात्र, गोवा त्याला अपवाद ठरले होते. चार्टर ऑपरेट्‌र्सनी गोवा सरकार व पर्यटन खात्याकडे यंदाच्या मोसमासाठी चार्टर विमानांना दाबोळी विमानतळावर ‘स्लॉट्‌स’ वाढवून देण्याची मागणी केली होती. सरकारने ती मान्य केलेली असल्याने या मोसमात गोव्यात १ हजार चार्टर विमाने येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, नौदलाने शनिवार व रविवार या दिवशी चार्टर विमाने उतरवण्यासाठीची वेळ यंदा बंद केल्याने गेल्या वर्षापेक्षाही यंदा चार्टर विमाने ५० टक्क्यांनी घटणार असल्याची भीती ट्रॅव्हल अँड टूरिझम असोसिएशनचे अध्यक्ष सावियो मसाईस यांनी व्यक्त केली आहे. दाबोळी विमानतळावर चार्टर विमाने उतरविण्यासाठी शनिवार व रविवारी देण्यात येत असलेला ‘स्लॉट’ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या दरम्यान होता. यंदा नौदलाने तो बंद केल्याने विदेशी चार्टर विमाने हाताळणार्‍या कंपन्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

चांगली सुरूवात : पर्यटनमंत्री
राज्यात रविवारी पहिले चार्टर विमान आल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ही चांगली सुरवात आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल दिली. पर्यटकांनी गोव्यात खूप मौज-मजा करावी. पण ती करताना स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही आजगावकर यांनी केले आहे. गेल्या वर्षी गोव्यात ९८८ विदेशी चार्टर विमाने दाखल झाली होती. त्यांतून २,३२,६९७ विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती.