४७ जणांच्या फसवणूक प्रकरणी अल्पवयीनाने केले आरोप मान्य

0
105

१९ लाख पूजा शंकेला दिल्याची जबानी
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४७ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्पवयीन संशयित आरोपीने आपण पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. मात्र त्याची साथीदार संशयित आरोपी पूजा शंके (३३) हिने आपण एकही पैसा घेतलेला नसून आपण फक्त नोकरी करीत असल्याचे सांगितले. तथापि तिला १९ लाख रुपये पोहोचल्याचे अल्पवयीन आरोपीने काल मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी कुडचडे पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले.गेल्या आठवड्यात बांबोळी येथे गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये फार्मासीत नोकरी देण्याचे सांगून ४७ जणांकडून २५ लाख २१ हजार रुपये उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यात माध्येगाळ काकोडा येथील एक अल्पवयीन मुलगा डॉक्टर बनून व झरीवाडा दवर्ली – मडगाव येथील पूजा शंके यांनी डॉक्टर असल्याचे भासवून अनेकांना गंडा घातला होता. उमेदवारांना दोन महिन्याचे प्रशिक्षण देण्याचे सांगून रिवण येथे त्यांनी एक प्रशिक्षण केंद्रही उघडले होते.
कुडचडेचे पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई यांनी ज्यांना गंडा पडला आहे. त्यांना व दोन्ही संशयितांना पोलीस स्थानकावर बोलावून आणून त्यांची काल समोरासमोर चौकशी केली. ४७ पैकी ३० जण यावेळी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष दोन्ही आरोपांची चौकशी करताना अल्पवयीनाने गुन्हा मान्य केला. मात्र पूजा शंके हिने गुन्हा मान्य केला नाही. त्यांनी केपे येथील प्रथम वर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्याची आज बुधवारी सुनावणी होणार आहे. मात्र कुडचडे पोलिसांनी अद्याप अनेक गोष्टीची तपासणी व काही मुद्देमालही जप्त करायचा असल्याने संशयिताला जामीन मंजूर करण्यास विरोध केल्याचे समजते. संशयित आरोपी पूजा दामोदर शंके हिने डॉ. पूजा माने या नावाने आपल्या नावाचा रबर स्टॅम्पही केलेला असून अल्पवयीन दहावी नापास असून त्यानेही आपण हाडांचा डॉक्टर असल्याचा रबर स्टॅम्प बनवून घेतला आहे. या दोघांना गंडा घातलेल्यांत काही अभियंते, काही पदवीधारक, काही सरकारी परिचारिका शिक्षण घेतलेल्या असून ते या जाळ्यात कसे अडकले याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.