४४ लाखांचे परकीय चलन दाबोळी विमानतळावर जप्त

0
140

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल सीमा शुल्क हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ४३ लाख ७० हजार रुपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात आले. सीमा शुल्क संचालनालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी मुरगाव हार्बर येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली.

एक आंतरराष्ट्रीय आणि एक देशी प्रवासी दाबोळी विमानतळावरून ओमन एअरवेज विमानाने दुबईला जाण्याच्या तयारीत होते.
दरम्यान, दाबोळी विमानतळावर होणार्‍या सोने तस्करी तसेच इतर वस्तूंच्या तस्करींचा पर्दाफाश करण्यास सीमा शुल्क हवाई गुप्तहेर सतर्क असून दिवसरात्र पाळत ठेवून आहेत. त्याच अनुषंगाने विभागाचे अधिकारी सेवा बजावत असताना काल या विभागाचे सहाय्यक आयुक्त जी. बी. सांतीमानो यांच्या मार्गदर्शनाखाली हवाई गुप्तहेर प्रवाशांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती. त्यावेळी अधिकार्‍यांना दोन प्रवाशांच्या हालचालीवर संशय आला.

अधिकार्‍यांनी त्या दोन्ही प्रवाशांना अडवून त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता दोन्ही प्रवाशांकडे सुमारे ४३ लाख ७० हजार रुपयांचे परकीय चलन सापडले. विमानात चढण्यापूर्वी सदर कारवाई करण्यात आली. या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हे परकीय चलन दुबईला तस्करी मार्गाने नेत असल्याची कबुली दिली. सीमा शुल्क संचालनालयाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील चौकशी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.