३० हजार शेतकर्‍यांचा महामोर्चा मुंबईत दाखल

0
106

>> आज विधानसभेला घालणार घेराव

महाराष्ट्रभरातील ३० हजारहून अधिक शेतकरी रखरखीत उन्हाची पर्वा न करता राजधानीतील महाराष्ट्राच्या विधानसभेला आज सोमवारी घेराव घालून निदर्शने करण्यासाठी काल मुंबईत दाखल झाले. राज्यातील कृषी क्षेत्रातील विद्यमान प्रतिकूल स्थितीची दखल घेण्यास अपयशी ठरल्याचा ठपका या शेतकर्‍यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारवर ठेवला आहे.

तब्बल १८० कि. मी अंतराचा खडतर प्रवास करीत हे शेतकरी काल या शहरात दाखल झाले. अखिल भारतीय किसान सभा या डाव्या पक्षांच्या झेंड्याखाली हा प्रचंड मोर्चा मुंबईवर चाल करून आला आहे. आज सोमवारी मोर्चेकरी विधानसभा संकुलाला घेराव घालणार आहे. तोपर्यंत या महामोर्चाची संख्या एक लाखावर जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शेतकर्‍यांचे कर्ज पूर्णपणे माफ करणे, कसल्या जणार्‍या वनजमिनींचे शेतकर्‍यांकडे हस्तांतरण करणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना प्रती हेक्टर ४० हजार रु.ची नुकसान भरपाई देणे अशा व अन्य काही मागण्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत.