२६ लाखांचे सोने जप्त

0
113

दाबोळी विमानतळावर काल सुमारे २६ लाख रुपये किंमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर सोने दोन लहान एअर बॅग पॅकेटमध्ये एका सीटवर सापडले.

कस्टम खात्याच्या गोवा विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी केलेल्या कारवाईत एअर इंडिया (एआय-९९४) विमानाने आलेले हे सोने ९२८ ग्रॅम वजनाचे असून एका सिटवर दोन लहान एअर बॅग पॅकेट मध्ये आठ सोन्याच्या बिस्कीट रुपात एकूण दहा तोळे सोने सापडले. दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या पथकाने तस्करीच्या तपासणीसाठी धावपट्टीवरील विमानाकडे आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार एअर इंडिया फ्लाईट एआय-९९४ या विमानात त्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली असता त्यांना विमानाच्या आसनावर सदर सोन्याच्या बिस्कीट सापडल्या. कस्टम अधिकार्‍यांनी याची अधिक चौकशी केली असता या आसनावरील प्रवासी दुसर्‍या आसनावर बसलेला आढळला व त्यांनी त्या प्रवाशांकडे विचारे असता त्याने आपण या सोने तस्करीत गुंतलेला असल्याचा गुन्हा कबुल केला. त्यानुसार कस्टम अधिकार्‍यांनी त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे २६ लाख ४० हजार रुपये आहे.

गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त गजलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली व सहआयुक्त जी. बी. सांतिमानो यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमच्या पथकाने ही कारवाई केली. गोवा कस्टम विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.