२४ तासात कामावर रूजू व्हा; अन्यथा पर्यायी व्यवस्था करू

0
128

भरती-रोजगार सोसायटीचा सुरक्षा कर्मचार्‍यांना इशारा
सोसायटी कामगार नेत्यांशी चर्चा करणार नाही
गोवा भरती व रोजगार सोसायटीचे सुरक्षा रक्षक संपावर गेल्याने सध्या विविध सरकारी खात्यातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असून या पार्श्‍वभूमीवर २४ तासांच्या आत जर हे सुरक्षा रक्षक संप मागे घेऊन कामावर रुजू झाले नाहीत तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असे सोसायटीचे चेअरमन सुभाष साळकर यांनी काल पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले.२४ तासांत कामावर हजर व्हावे
सर्व सरकारी खात्यांना सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी ही आमच्या सोसायटीची आहे. ती तात्काळ पुरवली जावी. नपेक्षा काही विपरीत घटना घडली तर त्याला सोसायटीच जबाबदार राहील असा इशारा विविध खात्यांनी सोसायटीला दिलेला असून या पार्श्‍वभूमीवर आम्ही आणखी धोका पत्करू शकत नाही.
संपावरील सुरक्षारक्षकांनी २४ तासात कामावर रुजू व्हावे अशी आपली त्यांना विनंती आहे. मात्र, त्या विनंतीला मान देऊन जर ते कामावर रुजू झाले नाहीत तर आमच्याकडे पर्यायी व्यवस्था करण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे साळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘तो’ दावा खोटा
सोसायटीतर्फे भरती करण्यात आलेले १५०० सुरक्षा रक्षक सेवेत आहेत हा या सुरक्षा रक्षकांच्या कामगार संघटनेने केलेला दावाही खोटा आहे.
सोसायटीतर्फे भरती केलेले १०३७ एवढेच सुरक्षारक्षक सध्या सेवेत असल्याचे ते म्हणाले. पैकी ५१२ रक्षक हे आरोग्य खात्यात आहेत तर अन्य हे अन्य विविध खात्यात असल्याचे त्यानी स्पष्ट केले. तसेच १०३७ सुरक्षा रक्षकांपैकी केवळ २८५ जण हे अडीच वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवेत आहेत. तर अन्य त्यापेक्षा कमी काळापासून सेवेत आहेत. ही सरकारी सोसायटी नव्हे
गोवा भरती व रोजगार सोसायटी ही सरकारी सोसायटी नसल्याचा खुलासाही यावेळी साळकर यांनी केला. २००१ साली ही सोसायटी स्थापन करण्यात आली होती. तत्पुर्वी कंत्राटदारांतर्फे भरती केली जात असे. कंत्राटी पध्दतीवर घेतल्या जाणार्‍या कामगारांच्या हितासाठीच या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. नंतर सरकारने ज्या खात्यांना कंत्राटी पध्दतीवर कामगार घ्यायचे आहेत त्यांनी वरील सोसायटीखाली त्यांची भरती करावी अशी त्यांना सूचना करण्यात आली होती.
सोसायटीतील सर्वांना नोकरी मिळणार
आता या सुरक्षा रक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा अधिकारी यांची गोवा मानव संसाधन विकास महामंडळातर्फे भरती करण्यात येणार असून ती करताना सर्वांना सामावून घेता यावे यासाठी गोवा भरती व रोजगार सोसायटीखाली भरती करण्यात आलेल्या सर्वांना सामावून घेता यावे यासाठी त्यांना वयाच्या अटीत १० वर्षांची सूट व शिक्षणाच्या अटीत सातवीऐवजी सहावी अशी सूट देण्यात आली आहे. त्यासाठी नव्याने जाहिरात देण्यात आलेली आहे. त्यामुळे सोसायटीतील सगळ्यांना नोकरी मिळणार असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले.
अनेकांना काही महिन्यांपासून पगार नाही
बर्‍याच जणांना गेले काही महिने पगारच मिळालेला नाही. संबंधित खात्यांकडून त्यांच्या वेतनासाठीचे पैसे सोसायटीला मिळाले नसल्याचे त्यांचा पगार अडलेला आहे. मात्र, आता त्यांच्या पगाराचे पैसे आले नाहीत तरी येत्या ७ रोजीपर्यंत त्यांना २ हजार रु. ऍडव्हान्स देण्यात येणार असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले. मात्र, कामावर रुजू झाले तरच त्यांना हा ऍडव्हान्स मिळेल, असे ते म्हणाले. सुरक्षारक्षकांनी कधीही आपल्या मागण्या सोसायटीपुढे ठेवल्या नाहीत. उलट ते संपावर गेले, असा आरोपही साळकर यांनी यावेळी केला.
८६०७ रु. वेतन
सुरक्षा रक्षकांना सध्या ८६०७ रु. एवढा पगार आहे. मात्र, त्यांना प्रत्यक्षात ४९५० रु. एवढा पगार मिळतो. सरकार सीपीएफ्, ईएसआय्, कल्याण निधी, सेवा, शिक्षण कर आदी मिळून १४३४ रु. कापून घेतो. शिवाय त्यांच्या पगारातून आणखीही विविध कपात केली जाते. गोवा भरती व रोजगार सोसायटीला दर एका सुरक्षा रक्षकामागे ८४३ रु. एवढा निधी मिळतो.
कामगार नेत्यांकडे सोसायटी चर्चा करणार नाही
सुरक्षा रक्षकांचे वेतन वाढवून ते दहा हजार रु. एवढे करावे, असा प्रस्ताव सोसायटीने सरकारपुढे ठेवला असल्याचेही साळकर यांनी यावेळी सांगितले. आपल्या मागण्यांसाठी त्यानी सोसायटीकडे चर्चेसाठी यावे. त्यांच्या कामगार नेत्यांकडे सोसायटी चर्चा करणार नसल्याचेही साळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘त्या’ कर्मचार्‍यांना सेवेत नियमित करणे शक्य नाही
मुख्यमंत्री पार्सेकरांचे स्पष्टीकरण
गोवा भरती आणि रोजगार सोसायटीचा सरकारकडे प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सेवेत नियमित करणे शक्य नाही. त्यांच्या संघटनेचे नेते त्यांची दिशाभूल करीत असून या नेत्यामुळे त्यांना नुकसान होईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांनी काल पत्रकारांना सांगितले. माथेफीरू नेत्यांनी त्यांची दिशाभूल केल्यामुळेच ते रस्त्यावर उतरले आहेत. सरकारी सेवेतही कंत्राटी पध्दतीवर कामगार आहेत. प्रशासनातील नोकर्‍यांच्या बाबतीत जाहिराती प्रसिध्द झाल्यानंतर तेथे अर्ज करून मुलाखती देण्याचे सोसायटीच्या कर्मचार्‍यांना स्वातंत्र्य आहे.