२४ तासांत परतणार्‍यांस क्वारंटाईन नाही

0
137

>> आपत्ती व्यवस्थापनाकडून गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

परराज्यातून गणेश मूर्ती पूजन किंवा विक्रीसाठी आणणारी व्यक्ती चोवीस तासांच्या आत पुन्हा राज्यात परतल्यास त्याला क्वारंटाईन किंवा कोविड चाचणी करण्याची गरज नाही, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने श्री गणेश चतुर्थीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

राज्याबाहेर राहणार्‍या मूळ गोमंतकीय व्यक्ती सध्याच्या एसओपीचे पालन करून येऊ शकतात. प्रवेशासाठी आयसीएमआर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेचे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे किंवा कोविड चाचणी करून अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन रहावे किंवा १४ दिवस होम क्वारंटाईन राहू शकतात. राज्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र, परत येताना आवश्यक एसओपीचे पालन करावे लागणार आहे.

चित्रशाळांनी शक्य असल्यास श्रीगणेश मूर्ती घरपोच पोचविण्याची व्यवस्था करावी. मूर्ती विक्रीला २० ऑगस्टपासून सुरुवात करावी.
सार्वजनिक गणेश समित्यांनी उत्सवाचे सोशल मीडियावरून प्रसारण करून भाविकांना घरबसल्या दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करावी. आरतीला केवळ १० माणसांची उपस्थिती ठेवावी.

वैयक्तिक गणेशोत्सवामध्ये शेजारी, मित्राच्या घरी भेट देऊ नये. होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन असलेल्या व्यक्तींनी दुसर्‍या घरी बोलवू नये आणि त्यांनी दुसर्‍याकडे जाऊ नये. घरोघरी जाऊन गणेश पूजा करणार्‍या पुरोहितांनी नियमावलीचे पालन करावे अशा सूचना केलल्या आहेत.
कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना वैयक्तिक गणेश पूजन करण्यास मान्यता दिली जाणार आहे.

दहीहंडी कार्यक्रमांवर बंदी
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून जिल्ह्यात दहीहंडीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा सामाजिक, धार्मिक कार्यक्रम न करण्याची सूचना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम साजरा करणार्‍यांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.