२० पासून बँक खात्यातून काढता येतील ५० हजार

0
109

>> १३ मार्चपासून सर्व निर्बंध मागे घेणार

 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने बँक खात्यातून पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असून २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५० हजार रुपये काढता येतील, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल स्पष्ट केले आहे. दरम्यान, १३ मार्चपासून एटीएम व बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा मागे घेण्यात येईल अशी घोषणा आरबीआयचे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी काल केली. त्यामुळे येत्या १३ मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येणार आहे.
आरबीआयने द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील घोषणा केली. बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. सध्या बँक खात्यामधून दिवसाला २४ हजार इतकी रक्कम काढता येते. मात्र, येत्या २० फेब्रुवारीपासून ही मर्यादा काही प्रमाणात वाढविण्याचा निर्णय काल आरबीआयने घेतला. त्यामुळे ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून त्यांच्या बँक खात्यांमधून ५० हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा २० फेब्रुवारी ते १३ मार्च या काळात कायम राहणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. जुन्या नोटा डिसेेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत लोकांना देण्यात आली होती. नोटाबंदीनंतर अडीच लाखांच्यावर जुन्या नोटा जमा करणार्‍या व्यक्तींची आयकर खात्यामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला होता. या निर्णयानंतर देशभर बँका व एटीएमसमोर लोकांच्या रांगा लागल्या होत्या.