२०१९ मध्येही केंद्रात एनडीएचेच सरकार : पंतप्रधान

0
102

आपल्या सरकारने गेल्या चार वर्षांत वित्त, सुरक्षा, सामाजिक न्याय, विदेश धोरण अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने देशाची जनता पुन्हा एकदा आपल्यावर विश्‍वास टाकणार आहे आणि २०१९ मध्ये आपलेच सरकार सत्तेवर येणार आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका नियतकालिकाला काल दिलेल्या मुलाखती त्यांनी विरोधकांच्या प्रस्तावित महाआघाडीची तसेच कॉंग्रेस पक्षाचीही खिल्ली उडवली आहे.

विरोधकांची प्रस्तावित महाआघाडी म्हणजे पंतप्रधान होण्यासाठीची महाशर्यत आहे. स्वत:चे अस्तित्व आणि सत्तेचे राजकारण यावर आधारीत ही आघाडी आहे. आणि ‘मोदी द्वेष’ ही त्यामागील एकच शक्ती आहे. मात्र जनता या आघाडीला नाकारून पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मतदान करेल असा ठाम विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेस प्रादेशिक पक्षासारखा
आपल्या सरकारच्या विरोधातील आघाडीची शक्ती बनण्याइतपतही कॉंग्रेसमध्ये आता कुवत राहिलेली नाही आणि त्यामुळे या पक्षाची अवस्था एखाद्या प्रादेशिक पक्षासारखी झालेली आहे असे मोदी म्हणाले.

कॉंग्रेस-जेडीएसने
कर्नाटकात जनादेश पळवला
आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले की ही निवडणूक ही एका बाजूने सुशासन आणि विकास, तर दुसर्‍या बाजूने सावळागोंधळ यांच्यातील पर्याय निवडण्यासाठीची निवडणूक असल्याचे प्रतिपादन केले आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारचे उदारहण त्यांनी दिले. तेथे कॉंग्रेस-जेडीएसने जनादेश पळवला, जेथे विकासाला दुय्यम स्थान दिले गेले याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोणत्याही निवडणुकीत आदर्श नसलेली व संधीसाधू युती ही पुढे गोंधळ माजवणारी ठरणार याची खात्री देणारी असते आणि पुढे काय होऊ शकेल त्याची झलक कर्नाटकमध्ये पाहायला मिळते अशी टिप्पणीही मोदी यांनी केली. कर्नाटक मंत्रिमंडळात सध्या विकासकामांच्या चर्चेऐवजी अंतर्गत धुसफूसच दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.

७७-८९च्या निवडणुकांची
आता तुलना नको
१९७७ व १९८९ मधील विरोधी आघाडीची आताच्या (प्रस्तावित) विरोधी महा आघाडीशी तुलना मोदी यांनी फेटाळली. त्यांनी सांगितले की १९७७ ची विरोधी आघाडी आधीच्या आणिबाणीनंतर लोकशाही रक्षणासाठी होती. तर १९८९ची निवडणूक बोफोर्सच्या भ्रष्टाचारविरोधात होती असे ते म्हणाले.
आजच्या विरोधी आघाड्या या देेशहीताने प्रेरीत नसून आपले अस्तित्व टिकवणे व सत्तेच्या राजकारणासाठी आहेत. राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान बनण्यास तयार असल्याचे केलेले वक्तव्य याचेच द्योतक असल्याचे मोदी म्हणाले.

ममतांचाही पंतप्रधानपदावर डोळा
दुसरीकडून ममता बॅनर्जींचाही पंतप्रधानपदावर डोळा आहे, पण डाव्यांसाठी ते अडचणीचे आहे. तर समाजवादी पक्षाला वाटते की त्यांचाच नेता पंतप्रधान होण्यास लायक आहे. अशा प्रकारे विरोधकांचा भर पूर्णपणे सत्ताप्राप्ती हाच आहे, लोकांचा विकास नव्हे असे मत त्यांनी मांडले. पक्ष व नेत्यांतील परस्परांवर असलेला अविश्‍वास आणि एकमेकांप्रती असलेली अप्रियता यामुळे हे पक्ष किती काळ एकत्र टिकतील ? प. बंगाल, केरळ यासह अन्य राज्यांमध्येही या पक्षांमध्ये थेट संघर्ष चाललेला आहे.
याआधी १९९३ साली या विरोधी पक्षांनी शेवटचे आघाडी सरकार स्थापन केले ते उत्तर प्रदेशमध्ये. मात्र ते दोन वर्षेही टिकले नाही असे ते म्हणाले.

कॉंग्रेसची अस्तित्वासाठी लढाई
आज कॉंग्रेस पक्ष लढतोय ती त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी त्यांच्या नेत्यांची या टोकापासून त्या टोकापर्यंत धावाधाव चालली आहे. या अनुषंगाने मोदी यांनी १९९८ सालचे उदाहरण दिले व युती राजकारणाबाबत कॉंग्रेसच्या धोरणाकडे लक्ष वेधले. त्यावेळी कॉंग्रेसच्या पंचमढी येथील अधिवेशनात खुद्द सोनिया गांधी यांनी युती ही बाब अल्प टप्प्याची असल्याचे सांगून एक पक्षीय सरकार हवे असल्याची इच्छा व्यक्त केली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोदी हटाव हाच
विरोधकांचा कार्यक्रम
भाजपने निवडणुका, सुशासन व विकासाच्या मुद्द्यावर लढविल्या आणि एका पाठोपाठ राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या जनादेश हा ऐतिहासिक असाच आहे. म्हणूनच जनता आमच्यावर येत्या निवडणुकांमध्ये विश्‍वास दाखवील याचा आम्हाला आत्मविश्‍वास आहे. अशा वेळी विरोधकांचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे मोदी हटाव. मोदींबद्दल द्वेष हीच विरोधकांची ताकद आहे अशी टीका त्यांनी केली.