१ फेब्रुवारीपासून सवलतीच्या दरात नारळ

0
238

>> कृषिमंत्र्यांची घोषणा

>> प्रत्येक कुटुंबाला मिळणार महिना ३० नारळ

सध्या नारळाचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीपासून सवलतीच्या दरात नारळ उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी मडगाव येथे प्रजासत्ताकदिन सोहळ्यात बोलताना केली.

राज्यात नारळाचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य जनतेला नारळ मिळणे कठीण बनले आहे. दैनंदिन जेवणात नारळ ही गोमंतकीयांची महत्त्वाची वस्तू असल्याचे जाणून सरकारने नारळ माफक दरात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगला नारळ २० रुपये दराने उपलब्ध करण्याचे ठरले आहे. एलपीजी गॅसधारक व रेशन कार्डवर दर महिन्याला एका कुटुंबाला तीस नारळ सवलतीच्या दरात देण्यात येतील असे मंत्री सरदेसाई यांनी यावेळी जाहीर केले. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात नारळाचे दर ५० टक्क्यांनी वाढले आहेत.

मध्यम आकाराचा नारळ ४० ते ५० रुपयांत विकला जात आहे. हे दर आम आदमीला परवडणारे नाहीत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी आपण त्याबाबत चर्चा केली आहे. त्यांनी सवलतीच्या दरात नारळ जनतेला उपलब्ध करण्यात मान्यता दिली आहे. राज्य फलोत्पादन मंडळाच्या विक्री केंद्रांवरून जनतेला सवलतीच्या दरात नारळ विक्री करण्यात येणार असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.