१९७१ च्या युद्धातील ‘आभासी भूत!’

0
200
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

पाकिस्तानवरील देदीप्यमान विजयाला नुकतीच ४७ वर्षे पूर्ण झाली. या प्रदिप्त विजय गाथेमध्ये भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सनी (एसएसएफ) मोलाची भूमिका निभावली होती. त्याचाच एक भाग असलेल्या कर्नल अभय पटवर्धनांकडून ऐका त्या विजयाची कहाणी…

१९७० मध्ये झालेल्या पाकिस्तान सिनेटच्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवलेल्या वंग बंधू मुजिबुर रहमान यांच्या पंतप्रधानपदाची मागणी राष्ट्रपती जनरल याह्याखान यांनी परराष्ट्र मंत्री झुल्फिकार अली भुट्टोच्या सल्ल्यानुसार फेटाळून लावली. त्यानंतर पूर्व पाकिस्तानात (सांप्रत बांगला देश) असंतोष धुमसायला सुरवात झाली. ‘रा’चे तत्कालीन प्रमुख रामनाथ काव आणि इंदिरा गांधींनी या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरवले. त्यानुसार इन्डियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून (आयएमए) आणि ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, मद्रास (ओटीएस) येथील नवीन रक्ताच्या काही निवडक, शारीरिकदृष्ट्या सक्षम अशा प्रशिक्षणार्थी युवक अधिकार्‍यांना एसएफएफमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तुत लेखक त्यापैकी एक होता.

२५ मार्च १९७१ला स्वतंत्र बांगला देशची घोषणा केल्यानंतर मुजिबुर रहमान यांना अटक झाली आणि त्याच रात्रीपासून पूर्व पाकिस्तान ‘ऑपरेशन सर्च लाईट’ अंतर्गत भीषण दडपशाहीच्या वरवंट्याखाली अमानुषपणे भरडला जाऊ लागला. ’इस्ट बंगाल रायफल्स’ च्या मेजर झिया उर रहमान यांनी २७ मार्चला चितागॉंग रेडियोवर स्वातंत्र्याची घोषणा केल्यावर २५०० हून अधिक बंगाली अधिकारी आणि जवानांनी चितगॉंग कँटोन्मेंटवर हल्ला करून तेथील शस्त्रास्त्रे व गोळाबारुद लुटून भारतात आश्रय घेतला. त्यानंतरच्या ३६ तासांमध्ये पाकिस्तानी सेनेने लेफ्टनंट जनरल टिक्काखानच्या नेतृत्वात २० हजार विचारवंतांसह सात लाख बंगाली मुसलमान व हिंदूंना मारुन टाकले आणि अगणित स्त्रियांना बलात्काराच्या रौरवात झोकले. त्या नंतरच्या काही दिवसांमध्येच पूर्व पाकिस्तानचे अनेक सेनाधिकारी, जवान, पोलिस आणि लाखांेंच्या संख्येत नागरिकांनी भारतात शरण घेतली. या आश्रयघेत्या शरणार्थ्यांमधूनच पाकिस्तानी सेना व बिहारी रझाकारांविरुद्ध गनिमी युद्ध आणि इन्टेलिजन्स गोळा करण्यासाठी ‘मुक्ती वाहिनी’ची निर्मिती करण्यात आली.
मुक्तीवाहिनीच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे आणि त्यांनी पाकिस्तानी सेनेवर केलेल्या हल्ल्यांच्या समन्वयात त्यांचे नेतृत्व करण ही आम्हा जेमतेम मिसरुड फुटलेल्या तरुण भारतीय सैनिकी अधिकार्‍यांची जबाबदारी होती. भारताच्या ज्या जॉंबाज गनिमी योद्ध्यांकडे मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण देऊन पाकिस्तानी सेनेविरुद्ध गनिमी युद्ध छेडण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्या ब्रिगेडियर शाबेग सिंगनुसार ‘‘द आयडिया वॉज टू क्रिएट ए प्रिएम्टिव्ह स्ट्राईक फोर्स बिफोर इन्डियन आर्मी मुव्हज् इन आफ्टर रेनी सिझन वॉज ओव्हर‘‘.

शाबेग सिंगचा पूर्व पाकिस्तानी सेनेत इतका दबदबा होता की, शरणागती घेतल्यानंतर तत्कालीन पूर्व पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल एएके नियाझींनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. कालांतराने काही अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे शाबेग सिंग यांना फौज सोडावी लागली आणि वाट चुकल्यामुळे अखेरीस सुवर्णमंदिराच्या कारवाईत जनरल सिंग भिन्द्रानवालेंना मदत करताना ते मारले गेले. त्यांच्या मृत्यूच्या एकच दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अपीलवर निर्णय देताना त्यांना दोषमुक्त केले होते. ह्यालाच म्हणतात प्रारब्ध. असो.
सेनाध्यक्ष, तत्कालीन जनरल आणि युद्धानंतर फिल्ड मार्शल पदाने गौरवण्यात आलेल्या सॅम माणेकशा यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानवर आक्रमणासाठी डिसेंबर ७१ चा महिना निश्‍चित केला. रॉ च्या श्री आर. एन. काव यांच्यावर ‘‘टू प्रिपेयर ऑल पॉसिबल ग्राऊंडस् फॉर द आर्मी फॉर इटस् फायनल ऍसॉल्ट’ ही कामगिरी सोपवण्यात आली. रॉ मधील पाकिस्तान डेस्क प्रमुख के. शंकरन नायर, हेड ऑफ बांगलादेश ऑपरेशन्स पी एन बॅनर्जी आणि हेड ऑफ टेक्निकल डिव्हिजन एमबीके नायर या त्रिकुटाच्या मदतीने पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर आणि सीमेच्या आत सर्वदूर मुक्ती वाहिनी गनिमी योद्ध्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली.

कलकत्याच्या थिएटर रोडवरील मुजीबनगरमध्ये १४ एप्रिल १९७१ रोजी बांगला देशच्या हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. तेथे सुरु झालेल्या फ्री बेंगाल बेताल केंद्र या हंगामी बांगला देश रेडियो स्टेशनद्वारे ‘बांगला देश गव्हर्नमेन्ट इन एक्झाइल’ आणि भारतीय इस्टर्न कमांडच्या सूचना व आदेश प्रशिक्षण देणार्‍या भारतीय अधिकारी आणि मुक्ती वाहिनी गनिमी लढवय्यांंपर्यंत पोचवले जात असत. १९० बांगला इर्रेग्युलर्स’ची सर्वात पहिली बॅच १२ मे १९७१ रोजी पाकिस्तानच्या मदारीपूर क्षेत्रातून आत घुसवून ढाका, कोमिल्ला आणि चितगॉंग क्षेत्रात हैदोस घालण्यासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर जुलै ७१ पर्यंत किमान ३५,०००वर बंगाली ’मोक्ती जोद्धा’(मुक्ती योद्धा) पूर्व पाकिस्तान मध्ये पाठवण्यात आले.
‘फेज वन’ मधील रॉ, एसएफएफ आणि मुक्ती वाहिनीच्या गुरिल्ला ऑपरेशन्स आणि ‘फेज टू’ मधील भारतीय सेनेच्या जबर्‍या फायनल ऍसॉल्टमुळे पूर्व पाकिस्तानमधील ९३,००० सैनिकांची शरणागती साध्य झाली यात शंकाच नाही. मार्च १९७१ नंतरचे आठ महिने पाकिस्तान्यांची ‘हालत पतली’ करणार्‍या दीड लाखांवर बंगाली तरुणांना गनिमी युद्धाचे प्रशिक्षण देणारे रॉ आणि एसएफएफचे अधिकारी पूर्व पाकिस्तानमधील फेज वनच्या यशाचे शिल्पकार होते. अर्थात सेनाध्यक्ष, जनरल सॅम माणेकशॉनी, कलकत्ता स्थित इस्टर्न कमांड जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनन्ट जनरल जगजित सिंग अरोडांना ‘‘असिस्ट द प्रोव्हिजनल गव्हर्नमेन्ट ऑफ बांगला देश टू रॅली पिपल ऑफ इस्ट बेंगाल इन सपोर्ट ऑफ लिबरेशन मुव्हमेन्ट अँड टू रेझ, इक्विप अँड ट्रेन इस्ट बेंगाल कॅडर फॉर गुरिल्ला ऑपरेशन्स इन देअर ओन लँड’’ असा आदेश दिला होता.

पूर्व पाकिस्तानमध्ये बहुतांश भागात मुक्ती वाहिनीच कार्यरत होती, मात्र त्यांच्या बरोबरच भारतीय रॉ च्या अखत्यारीत ढाक्याच्या आसपास कार्यरत टायगर सिद्दिकी या टोपणनावाने विख्यात मेजर अब्दुल कादर सिद्दिकीची ‘कादर वाहिनी’ आणि चितगॉंग हिल ट्रॅक्टस्‌मध्ये मेजर जनरल एस. एस. उबानच्या अधिपत्याखालील ‘‘मुजीब वाहिनी’ या दोन संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संताजी धनाजींप्रमाणे पाकिस्तान्यांची झोप उडवत होत्या. याच मुजीब वाहिनीच्या मदतीने लेखकाने एसएफएफच्या कमांडोंसमेत, इस्ट पाकिस्तान आर्मीच्या लेफ्टनंट जनरल एएके नियाझींचा चीफ ऑफ स्टाफ (सीओएस) असलेल्या मेजर जनरल फर्मान अलीला जिवंत पकडण्यासाठी पूर्व पाकिस्तानच्या चितगांग क्षेत्रात ६५ किलोमीटर्स आत जाऊन गनिमी कारवाई केली होती. मुक्ती वाहिनी बरोबर कार्यरत असल्यामुळे आणि त्यामुळे ऑफिशियल स्टेटस’ नसल्यामुळे पकडले गेल्यास आम्हाला ’प्रिझनर ऑफ वॉर’च्या नात्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या जिनेव्हा कराराचे कवच देखील मिळणार नव्हते.

ऑक्टोबरच्या सुरवातीला ‘ऑपरेशन माऊंटन इगल’ सुरू झाले. एसएफएफच्या ७० कमांडोंना एका काळोख्या रात्री एएन ३२ विमानांद्वारे मिझो हिल्सच्या देमागिरी समोर चितगॉंगमध्ये असणार्‍या कर्णफुली नदीच्या पार ‘पॅरा ड्रॉप’ करण्यात आले. दिवसा जंगलात लपून वेळ काढत आणि रात्री सावधतेने मार्च करत आम्ही आमच्या लक्ष्याकडे निघालो. या फोर्सचे प्रशासकीय अस्तित्वच नसल्यामुळे आम्हाला प्रत्येकी केवळ एक बल्गेरियन एके-४७ सबमशिन गन्स ब २० मॅगेझीन्स आणि दहा हँड ग्रेनेड्सच देण्यात आले. त्याबरोबर हातोहाती खूनी झडपांसाठी आमचे ‘हंटिंग नाईफ’ देखील सतत आमच्याजवळ असायचे. एसएफएफचे जवान मात्र लदाखचा प्रसिद्ध ’दाह’च वापरत असत. चितगॉंग जवळच्या कपताई डॅमजवळ असलेल्या पाक पोस्टच्या इन्सपेक्शनसाठी येणार्‍या मेजर जनरल फर्मान अलीला जिवंत पकडणे किंवा त्याचा खातमा करणे हेच आमच मिशन होते.

या पोस्टच्या रक्षणार्थ चितगॉंग स्थित पाकिस्तानची ९७ वी इन्डिपेन्डन्ट ब्रिगेड आणि दुसर्‍या एसएसजी बटालियनचे सैनिक तैनात होते. मुजीब वाहिनीने त्यांना खानसेना हे टोपण नाव दिले होते. हल्ला करण्यासाठी जातांना रस्त्यात आम्ही एक पाक ऍडव्हांस पोझिशनचा खातमा केला. आम्ही पोस्टजवळ पोचलो असताना तेथे तैनात पाकिस्तान स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्या स्नायपरला (टेलिस्कोप लावलेल्या, दूर मार्‍याच्या बंदुकीद्वारे लांबून शत्रूचा वेध घेणारा) बहुधा आमची आवाजी चाहुल लागली असावी. त्या काळात दिवस अनिश्‍चित तणाव व दबावाचे तर रात्र अतिशय धोकादायक असायची. म्हणूनच त्या स्नायपरने कुठलीही संधी न घेता आपल्या बंदुकीने आमच्या दिशेने तात्काळ गोळ्या झाडायला सुरवात केली. त्याला कल्पनाही नसेल की त्याच्या फायरमुळे आमचा एक सैनिक गंभीर जखमी झाला होता. त्याला अंधारातच साधारण प्रथमोपचार देण्याशिवाय आम्ही काहीच करू शकलो नाही. नंतर त्याच्या रक्षणासाठी एक जवान सोडून बाकी सैनिकांनी अंधाराच्या आडोशात पाकिस्तानी पोस्टला चारही बाजूंनी वेढले आणि योग्य वेळ येताच कडाडत्या विजेच्या वेगाने आम्ही पोस्टवर तुटून पडलो.

त्या रात्री किती पाक सैनिक अल्लाला प्यारे झाले हे आजही सांगता येणार नाही. कारण ती वेळच विचित्र असते. कमांडो फक्त बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करत स्वत:ला वाचवत आपल्या गंतव्याकडे जातो. मनात ऑपरेशन सफल करण्याची जिद्द, डोळ्यात बदल्याचा अंगार आणि डोक्यातील शत्रू नाशाच्या वेड्या उन्मादाच्या भरात शत्रूच्या ’कॅज्युअल्टीज मोजायला वेळ कोणाला असतो? म्हणूनच सप्टेंबर २०१६ मध्ये काश्मिरच्या उरी क्षेत्रात ज्या वेळी भारतीय कमांडोंनी सर्जिकल स्ट्राईक केला, त्या वेळी त्यांनी किती पाकिस्तानी मारले हे विचारणार्‍यांच्या बुद्धीची कींव करावीशी वाटली. आमची ‘रेड’ जरी सफलतेने पार पडली तरी आमचे मिशन मात्र ‘अनसक्सेसफूल’ झाले, कारण ज्यासाठी आम्ही केला होता हा अट्टहास तो राव फर्मान अली काही तासच आधी तेथून निघून गेला होता. हेदेखील आमचे प्रारब्धच होते.

पाकिस्तानी सीओएस चितागांग हिल ट्रॅक्टस्‌मध्ये येणार आहे या अचूक माहितीवर ही कारवाई करण्यात आली होती, पण आमची ’रेड पार्टी’ लक्ष्यावर पोचण्याच्या केवळ एक दिवस आधीच फर्मान अली ढाक्याला परत गेले, यालाच ’काळ आला पण वेळ आली नाही’ ही संज्ञा दिली जाते. मजेची गोष्ट म्हणजे ज्या जमिनी मार्गाने आम्ही परत आलो त्या रुटवरच मिझो अंडर ग्राऊंड ग्रुप आणि मिझो नॅशनल आर्मीचा सर्वेसर्वा एक्स हवालदार लाल डेंगा त्याच्या सहकार्‍यांसोबत कँप करुन होता. तोसुद्धा याच ऑपरेशनचे ऍडिशनल प्राईझ म्हणून आमच्या हाती लागू शकला असता; पण त्याला देखील नशिबानीच साथ दिली. कारण कशी कोण जाणे, पण त्या लोकांना आमच्या येण्याची चाहुल लागली आणि केवळ काही वेळ आधीच त्यांनी कँप सोडून पोबारा केला. आम्ही त्या जागी पोचलो तेंव्हा त्यांच्या कँपमध्ये पेटलेल्या चुलींची आग देखील थंड झालेली नव्हती.

१९७१ च्या भारत पाक युद्धात शत्रूच्या मागे कार्यरत असणारा एसएफएफ, पूर्व पाकिस्तानमधला सगळ्यात उत्तम ‘इंडियन आऊटफिट’ होता. दुर्दैवाने एसएफएफला ज्यासाठी त्यांची संरचना केली गेली होती, त्या चीन विरुद्ध लढण्याचे सौभाग्य कधीच मिळू शकले नाही. मात्र, एका वदंतेनुसार पूर्व पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी त्यांना महामहीम दलाई लामांचा आशीर्वाद लाभला होता. आपल्या धडाकेबाज आणि चित्त्यासारख्या चपळ ऑपरेशन्समुळे एसएफएफ ‘‘चितगॉंगची आभासी भुते : फँटम्स ऑफ चितगॉंग‘‘ या नावाने पूर्व पाकिस्तानमध्ये विख्यात झाली. तेथेे एसएफएफला ४९ सैनिकांची आहुती द्यावी लागली आणि आमचे १९० वर सैनिक गंभीर जखमी झाले. कपताई डॅमची ही ‘रेड’ झाल्यावर माझ्यासह एसएफएफच्या काही सहकार्‍यांना पश्‍चिम सीमेवरील सीमापार ऑपरेशन करता एयर लिफ्ट करण्यात आले. मगर वो कहानी फिर कभी !!