१८६ पंचायतींसाठी ८०.३३ टक्के मतदान

0
87

>> उद्या मतमोजणी

१८६ पंचायतींच्या १४५० प्रभागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत शांततापूर्ण ८०.३३ टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात ८३.१६ तर दक्षिण गोव्यात ७७.६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागच्या वेळी झालेल्या पंचायत निवडणुकीत ८१ टक्के मतदान झाले होते, अशी माहिती काल राज्य निवडणूक आयुक्त आर्. के. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतमोजणी उद्या मंगळवार दि. १३ जून रोजी सकाळी ८ वा. पासून सुरू होणार आहे.

उत्तर गोव्यात डिचोली तालुक्यात सर्वाधिक ९०.६० टक्के तर तिसवाडी सर्वांत कमी ७७.६० टक्के इतके मतदान झाले. बार्देशात ७९.६२, पेडणे ८८.५९, व सत्तरीत ८९.६५ मतदान झाले. उत्तर गोव्यात एकूण ३०१,६७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दक्षिण गोव्यात सर्वाधिक
धारबांदोडा तालुक्यात तर सासष्टी तालुक्यात सर्वांत कमी ६९.८४ टक्के मतदान झाले. काणकोण तालुक्यात ८३.३३, मुरगाव ७९.५८, फोंडा ८२.८९,
केपे ८४.५०, सांगे ८६.३७ टक्के मतदारांनी हक्क बजावला. दक्षिण गोव्यात एकूण ३००,५५५ मतदारांनी मतदान केले. उत्तर गोव्यात संध्याकाळी ४ पर्यंत ७७.८३ तर दक्षिणेत ७४.३५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीची जय्यत तयारी १३ रोजीच्या मतमोजणीची तयारी जोरात सुरू आहे. भारतीय राखीव दलाच्या जवानांच्या तुकड्या यावेळी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. सकाळी ८ वा. मतमोजणी सुरू होणार असून मतमोजणी २१ सभागृहातून होणार आहे. प्रत्येक सभागृहात १ याप्रमाणे २१ निरीक्षक यावेळी हजर असतील. निर्वाचन अधिकारी, निरीक्षक व मतमोजणी पर्यवेक्षक हे सोडल्यास अन्य कुणालाही मतमोजणी केंद्रात मोबाइल नेता येणार नाही. दरम्यान, ११ पंचायतींतील ५५ प्रभागांतून उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर १० पंचायतींतील १५ प्रभागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या असून त्या १ जुलै रोजी होणार आहेत. तेथील मतमोजणी २ जुलै रोजी होणार आहे. ज्या १० पंचायतींतील १५ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे त्या पंचायतींतील सर्वच प्रभागांची मतमोजणी २ जुलै रोजी होणार आहे. आज ज्या प्रभागांत निवडणूक झालेली आहे त्या प्रभागांची मतमोजणीही २ जुलै रोजी होणार आहे. ती उद्या १३ जून रोजी होणार नसल्याचे श्रीवास्तव यांनी
स्पष्ट केले. १ जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीवर ह्या निकालांचा प्रभाव पडू नये यासाठी सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काल मतदान प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर खास ‘वॉटरप्रुफ’ मंडप उभारण्यात आले होते. मतदानाच्या वेळी कुठेही हिंसा झाल्याचे वृत्त नाही. तसेच निवडणूक आचार संहितेचा भंग झाल्याचीही कोणतीही तक्रार आयोगाकडे आलेली नाही.
ज्या पंचायतींतील सर्व प्रभागांत निवडणुका झालेल्या आहेत व कोणत्याही प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली नाही त्या पंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी उद्या १३ रोजी होणार आहे. मात्र, ज्या पंचायतींतील एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांची निवडणूक पुढे ढकलून १ जुलै रोजी ठेवण्यात आलेली आहे त्या पंचायतीतील सर्वच प्रभागातील निवडणुकांची मतमोजणी २ जुलै रोजी होणार आहे, असे श्रीवास्तव यांनी नमूद केले. दरम्यान, एकाही उमेदवाराने अर्ज न भरलेल्या मोर्ले, सत्तरी पंचायतीच्या प्रभागात नंतर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

उसगावात पैसे वाटताना
कारसह तिघांना अटक

उसगाव-गांजे पंचायतीच्या प्रभाग सहामध्ये
शनिवारी रात्री पैसे वाटून मतदारांना
आकर्षित करणार्‍या सर्वेश बांदेकर, संदेश
पाटील व गौरव फडते (तिघेही उसगाव) या
संशयितांना फोंडा पोलिसांनी अटक करून
वापरण्यात आलेली कार व ९५०० रुपये जप्त केले
आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग
सहामध्ये पैसे वाटत असल्याची तक्रार भरारी
पथकाला स्थानिकांनी दिली होती. त्यानुसार
भरारी पथकाने जीए ०५ डी ५९२३ क्रमांकाची
आल्टो कारची झडती घेतली असता त्यात ९५००
रुपये सापडले. निरिक्षक सुदेश नाईक यांच्या
मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन हळर्णकर
यांनी पंचनामा करून कारवाई केली. अटक
केलेल्या तिघाही संशयितांना काल संध्याकाळी
जामीनावर सोडण्यात आले.

साकोर्ड्यात मतदानावर
धनगर बांधवांचा बहिष्कार
साकोर्डा पंचायतीच्या प्रभाग २ मधील धनगर
समाजबांधवांनी मतदानावर बहिष्कार घातला.
जोपर्यंत सरकार समाजबांधवाची राहण्याची सोय
करणार नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार
घालण्याचा इशारा सामजबांधवांनी दिला.
न्यायालयाच्या आदेशानुसार ६ घरे बेकायदेशीर
ठरवून गेल्या महिन्यात पाडण्यात आली होती.
मात्र, पावसाळ्यात बेघर झालेल्या ४ धनगर समाज
बांधवांच्या कुटुंबीयांचा प्रश्‍नावर सरकार
तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी
मतदानावर बहिष्कार घातला.

केंद्रात बदल झाल्याने बेतोड्यात गोंधळ
बेतोडा – निरंकाल पंचायतीच्या प्रभाग ९ व ११
मध्ये निवडणूक मतदान केंद्रात बदल झाल्याने
मतदारांचा गोंधळ उडाला. प्रभागात बदल
केल्याने प्र्रभाग ९ (कुंभारवाडा केंद्र)
मधील मतदारांना प्रभाग ११ (कोडार) मध्ये तर
कोडार केंद्रावरील मतदारांना कुंभारवाडा
केंद्रावर जाऊन मतदान करावे लागले.
अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे ही चूक
झाल्याचा उमेदवारांनी सांगितले. कुंभारवाडा
व कोडार हे दोन्ही गाव ६ ते ८ किलोमीटर अंतरावर
आहेत. मतदान केंद्रात बदल झाल्याचे शनिवारी
रात्री १० वाजता उमेदवारांच्या लक्षात आले
होते.