१५ बड्या उद्योगपतींच्या लाभासाठीच पंतप्रधानांचा नोटाबंदी निर्णय ः राहुल

0
121

देशातील १५ बड्या उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. मोदी यांच्या नोटाबंदीच्या या निर्णयानंतर उद्योगपतींनी आपल्या काळ्या पैशाचे रुपांतर पांढर्‍या पैशात केले असा घणाघाती आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केला. नोटाबंदी हा देशात झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार सिद्ध झाला असल्याचा दावाही त्यांनी केला.

नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. अशा स्थितीमुळे पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय आपण का घेतला त्याचे उत्तर देशाला द्यायला हवे असे गांधी म्हणाले.
नोटाबंदीच्या या निर्णयामुळे जनतेला आणि पर्यायाने देशालाही कोणताही लाभ झाला नाही. हा निर्णय म्हणजे सरकारने जनतेवर केलेले आक्रमण होते. देश स्वतंत्र होऊन ७० वर्षात जे कोणी केले नाही ते मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय अंमलात आणून करून दाखवले असा टोला गांधी यांनी हाणला.

पंतप्रधान खोटे बोलतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रकरणी खोटे बोलत आहेत असे सांगतानाच गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. अमित शहा संचालक असलेल्या गुजरातमधील एका सहकारी बँकेत ७०० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

मोदींकडून सामान्यांची फसवणूक
लोकांच्या खिशातील पैसै काढून आपल्या उद्योगपती मित्रांचे खिसे भरण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. सर्वसामान्यांची मोदी यांनी मोठी फसवणूक केली. नोटाबंदीमुळे काहीच साध्य झाले नाही. हा जुमला नसून प्रचंड असा भ्रष्टाचार आहे असा आरोप गांधी यांनी केला.

मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या, छोट्या, मध्यम उद्योजकांना मोठे नुकसान व समस्यांचा सामना करावा लागला. तसेच बेरोजगारी वाढली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रु. जमा होतील, शेतकर्‍यांना योग्य हमी भाव, बेरोजगारी हटवणार अशी आश्‍वासने देऊन त्याची पूर्तता मोदी यांनी केली नाही याकडे गांधी यांनी लक्ष वेधले.