१४ पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

0
106

>> हमीभाव दीडपट वाढविण्यास मोदी सरकारची मंजुरी

लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विविध धान्यांच्या आधारभूत किमतीत भरीव वाढ जाहीर केली आहे. धान्यांच्या आधारभूत किंमतींमध्ये (हमी भाव) ऐतिहासिक वाढ करून सरकारने शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केले असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी काल याबाबत घोषणा केल्यानंतर ट्विटरवरून केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबत काल बैठकीत निर्णय घेतला. एकूण १४ पीकांच्या हमीभावात ही भरीव वाढ करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केल्याने आपण समाधानी आहे. शेतकर्‍यांना धान्यासाठी किमान आधारभूत किंमत उत्पादन मुल्याच्या दीडपटीने अधिक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मोदी यांनी स्पष्ट करून शेतकर्‍यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी याविषयी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या खजिन्यावर १२ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सरकारच्या या निर्णयानुसार तांदळाच्या किमान आधारभूत किमतीत १५५० रुपये प्रती क्विंटलवरून १७५० रुपये प्रती क्विंटल अशी वाढ करण्यात आली आहे.