१०२१ मद्यालये पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा

0
101

>> नूतनीकरणास सरकारचा हिरवा कंदील

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील १३३२ मद्यालयांपैकी १०२१ मद्यालये पुन्हा सुरू होण्यासाठीचा मार्ग काल मोकळा झाला. या १०२१ मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा आदेश सरकारने काल अबकारी खात्याला दिला आहे.

नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीने काल आपल्या बैठकीनंतर बंद असलेल्या १३३२ मद्यालयांपैकी १०२१ मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करून अबकारी खात्याला या मद्यालयांचे नूतनीकरण करण्याचा आदेश दिला. शहराजवळील गाव, नगरपालिका क्षेत्राच्या बाजूला असलेले गाव, तसेच बाह्य विकास आराखड्यामध्ये येणारे गाव यात असलेल्या १०२१ मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार आहे. तर उर्वरित ३११ मद्यालयांचा स्वतंत्रपणे विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मद्यालयांसंबंधी निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या समितीची काल दुसरी बैठक झाली. पहिली बैठक गेल्या आठवड्यात झाली होती. मंत्र्यांच्या समितीने शहराजवळील गाव, नगरपालिका क्षेत्राच्या बाजूला असलेले गाव व बाह्यविकास आराखड्यामध्ये येणारे गावे अशा ठिकाणी असलेल्या मद्यालयांची यादी तयार करून अहवाल सादर करण्याचा आदेश अबकारी आयुक्तांना दिला होता. हा अहवाल हाती आल्यानंतर अशा क्षेत्रात असलेल्या १०२१ मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा आदेश समितीने अबकारी खात्याला दिला.
३११ मद्यालये शिल्लक राहत असून सध्या तरी ती सुरू करणे शक्य नाही. मात्र, भविष्यात त्यांनाही सूट मिळू शकते, असे बैठकीनंतर बोलताना फ्रान्सिस डिसोझा सांगितले.