॥ स्वामी विवेकानंद ः मार्गदर्शक ध्रुवतारा॥

0
322

– रमेश सप्रे

जर्मन तत्त्वज्ञ फ्रेड्रिक नित्शेचं एक हृदय नि मस्तक यांना झिणझिण्या आणणारं वचन आहे –
म्हणजे नाचत्या तार्‍याला जन्म द्यायचा असेल तर मनाबुद्धीत अस्वस्थता हवी. इथं ‘नाचता तारा’ म्हणजे काहीतरी अभूतपूर्व, नेत्रदीपक अशी कामगिरी किंवा आपलं ध्येय स्वप्न. स्वस्थ, आत्मसंतुष्ट मनातून स्वप्नं नाही साकारता येणार. ही अंतरीची अस्वस्थता युवकांना तर हवीच हवी. अव्यवस्थेतून (केऑस) व्यवस्था असलेलं विश्‍व (कॉस्मॉस) यवकच निर्माण करू शकतात.

स्वामी विवेकानंदांचा हाच आग्रह होता. ते स्वतः असा नाचता, चमकता तारा होते. साधा प्रकाशमान तारा नव्हे तर अढळ ध्रुवतारा – सतत उत्तर दिशा (उत्तरोतर प्रगतीची – विकासाची दिशा) दाखवणारा! प्रेरणा देणारा!
१२ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. हल्ली असे जागतिक दिन पावलोपावली म्हणजे प्रत्येक सप्ताहात येतातच. ते साजरे करण्याची समाज-माध्यमातून लेख, चर्चा या सर्वांच्या जोडीला झगमगीत कार्यक्रम – तथाकथित थीम-बेस्ड म्हणजे एखाद्या विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम… हे सारं इतकं शब्दाळलेलं, पाल्हाळ नि कंठाळी असतं की बुडबुड्यांसारखं लगेच फुटून जातं. किंवा शीतपेयांच्या बाटल्या फोडल्यानंतर होणार्‍या आवाजासारखं लगेच फुटून जातं. किंवा शीतपेयांच्या बाटल्या फोडल्यानंतर होणार्‍या आवाजासारखं नि फेसासारखं फसफसून हवेत विरून जातं. याला युवादिनाचाही अपवाद नाही. दुर्दैव म्हणजे या सार्‍या गदारोळात विवेकानंदांची छबी (चित्र) मिरवली जाते. पण विवेकानंदांच्या विचार उच्चार आचारांचं दर्शन मात्र घडत नाही.

विवेकानंद ही केवळ एक प्रतिमा (चित्र) नाही तर ती सदाहरित, तेजस्वी प्रतिभा (चरित्र नि चारित्र्य) आहे. ते एक विचार-भाव-कर्म शक्तांचं धगधगतं यज्ञकुंड आहे. अग्निहोत्रासारखं सदैव ज्वलंत नि जिवंत!
विवेकानंदांच्या प्रेरणादायी व्याख्यानातून-लेखनातून असे प्रेरक विचार घेऊन त्यावर कार्यवाहीच्या दृष्टीनं सहचिंतन करू या, अर्थातच युवावर्गाला केंद्रभागी ठेवून.

* ‘तरुणांच्या ओठावरही गाणी मला सांगा मी त्या समाजाचं – राष्ट्राचं भवितव्य तुम्हाला सांगतो.’ हे स्वामीजींचे उद्गार खूप अर्थपूर्ण आहेत.
‘कदम कदम बढाये जा| खुशी के गीत गाये जा’ सारखी प्रयाणगीतं (मार्चिंग सॉंग्ज) युवक गुणगुणत असतील तर त्यांची वाटचाल सुभाषचंद्र बोसांच्या आजादी, आनंद, आत्मसन्मान, आत्मविश्‍वास यांनी युक्त असलेल्या समाजाच्या दिशेनंच असेल.
‘मेरा रंग दे बसंती चोला’ गाणार्‍या युवकांची क्रांतीची, स्वातंत्र्याची जिद्द एखाद्या भगतसिंग – चंद्रशेखर आझाद – राजगुरू या त्रिमूर्तींच्या ध्यासासारखीच असणार.
‘माणुसकीच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरू| जिंकू किंवा मरू’ अशी देशभक्तीची स्फूर्तिगीतं समर्थ राष्ट्र घडवण्याची चेतना युवावर्गाला देऊ शकतात.

आजची परिस्थिती अर्थातच बदललीय. असली प्रेरक गीतंही एक ‘इव्हेंट’ म्हणून साजरी केली जातात. इलेक्ट्रॉनिक साधनांच्या आहारी गेलेली नि संगणक महाजालात (इंटरनेट) गुंतलेली पिढी या क्षणी तरी विवेकानंद, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांचे विचार ऐकण्याच्या – गाण्याच्या नित्यानुसार झोकून देऊन कार्य करण्याच्या मनःस्थितीत नाहीये. या पिढीला राष्ट्र उभारणीचं – नवभारताचं – स्वप्न नव्हे ध्येय दाखवणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राकडे वळवणं हे खरं आव्हान आहे. कारण स्वामीजींचं कोणतंही युवकांना उद्देशून केलेलं आवाहन आजच्या युवकांच्या हेडफोन्स नि इअरप्लग्ज लावलेल्या बंद कानावर आणि वाचन-चिंतनच काय साधा अभ्याससुद्धा न केल्यामुळे बधिर झालेल्या मनावर प्रभाव कसा पाडू शकेल? ही समस्या मानून चालणार नाही तर आव्हान म्हणून स्विकारावं लागेल.
* आजचा युवावर्ग देव, धर्म, परंपरा अशा गोष्टींना महत्त्व देत नाही. स्वामीजी या वृत्तीचं स्वागत करून या शब्दांचे किंवा संकल्पनांचे नवे अर्थ सांगतात जे निश्‍चित ‘युवास्नेही’ आहेत. ते म्हणतात – नास्ति कोण? ज्याचा स्वतःवर विश्‍वास नाही तो. जुना धर्म म्हणत असे की ईश्‍वरावर विश्‍वास नाही तो नास्तिक.

याचा अर्थ स्पष्ट करताना स्वामीजी एक छान गोष्ट सुचवताहेत. ईश्वर देवळात, मूर्तीत, ग्रंथात शोधण्यापूर्वी सर्वप्रथम त्याचा शोध स्वतःच्या अंतरंगात घ्या. गीतेत भगवंत हेच अगदी स्पष्टपणे सांगतात – ईश्वरः सर्वभूतांना हृद्देशे तिष्ठित. सर्व भूतमात्रांच्या (सजीव-निर्जीव सृष्टीत) हृदयात म्हणजे अंतरंगातच असतो. ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत’ त्याच हृदयस्थ ईश्वराला सर्वभावानं – मनोभावे – शरण जा.’ शेवटी ‘सर्वधर्मात् परित्यज्य मां एकं शरणं व्रज’ असं सांगतात तेव्हा ‘मलाच शरण ये’ म्हणताना सर्वांच्या हृदयात असलेल्या मला (भगवंताला) शरण ये’ हेच सुचवायचंय.
स्वामी विवेकानंद या आतल्या ईश्वराला नारायण म्हणत असत. ‘नार’ म्हणजे सारी मानवजात (नर म्हणजे प्रत्येक मानव) आणि अयन म्हणजे घर, निवासस्थान.

प्रत्येक माणूस (जिवंत प्राणी) परमेश्वराचं मंदिर आहे. परमेश्वर स्वरुपच आहे. त्याची पूजा म्हणजे सेवा केली पाहिजे. शरण भावनेनं सेवा करायला हवी. रामकृष्ण परमहंस म्हणत ‘शिवभावे जीवसेवा तर स्वामीजी म्हणतात दरिद्र नारायणाची सेवा!
‘मानवसेवा हीज माधव सेवा – देवपूजा’ हे सूत्र तरुणाना निश्‍चित भावेल. त्यांना याची प्रेरणा मात्र वडील मंडळींनी (एल्डर्स) स्वतःच्या उदाहरणातून दिली पाहिजे. आजही हे परिणामकारक होऊ शकेल. या गोष्टीत सातत्य मात्र हवं. केवळ एका दिवसाच्या उत्सवी कार्यक्रमातून हे अर्थातच साध्य होणार नाही. सतत चालणारे उपक्रम हवेत.

* स्वामीजी कर्मालाच पूजा मानत. यंत्र हा देव नि श्रम ही लक्ष्मी हा संदेश आजच्या युवा वर्गाला आवडेल. पण प्रत्यक्ष कर्म – कार्य – कृती करायला नको का? त्यासाठी नवे अर्थपूर्ण प्रकल्प सुरू केले पाहिजेत. विवेकानंद केंद्र ही कन्याकुमारीला अनेक वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था खर्‍या अर्थानं विवेकानंदांच्या विचार प्रसाराचं नि अनेकानेक संस्था, संघटना स्थापन करण्याचं जागतिक केंद्र आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक कौशल्यं शिकवणार्‍या संस्था, योगसाधनेविषयी जीवनाला उपयोगी पडणारं शिक्षण देणारी केंद्रं असा कार्यविस्तार या विवेकानंद केंद्राचा आहे. सर्वार्थांनं हे केंद्र विवेकानंदांच्या संदेशाचं नि ऊर्जेचं जिवंत केंद्र (न्यूक्लियस) आहे. युवकांनी अशा संस्थातून चालवल्या जाणार्‍या अल्पावधी (काही आठवडे-महिने) किंवा दीर्घकाल (काही वर्षं) चालणार्‍या अभ्यासक्रमांचा (कोर्सेस) लाभ घेऊन आपलं भवितव्य (करिअर) घडवलं पाहिजे.

उगीच में में में करत जाणार्‍या मेंढ्यांसारखं प्रवाह पतित असं आर्टस् – सायन्स – कॉमर्स नंतर मेडिकल – इंजिनियरिंग किंवा अन्य व्यावसायिक (प्रोफेशनल) अभ्यासक्रमांचं शिक्षण का निवडायचं? या में में ऐवजी मैं मैं म्हणजे स्वतःला घडवणारं, माझ्या आतल्या क्षमतांना न्याय देणारं, विकासाची संधी देणारं शिक्षण का नको? यातूनच खरी पूर्ततेची किंवा साफल्याची भावना (सेन्स ऑफ कमिटमेंट अँड फुलफिलमेंट) तरुणांना लाभेल. आज युवावर्गात दिसणारी दिशाहिनता, ध्येयशून्यता नि त्यातून निर्माण होणारं वैफल्य (फ्रस्ट्रेशन) बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

या संदर्भात विवेकानंदांचा भर ‘व्होकेशन (आतून मिळणारी प्रेरणा नि चेतना)’ वर असायचा. केवळ नोकरी-धंदा-व्यवसाय (प्रोफेशन) यांच्यावर म्हणजे पैसे मिळवण्यावर नसायचा.
युवकांनी कुणीतरी आपल्याला नोकरी देईल. मुलाखतीसाठी बोलवेल (कॉल पाठवेल) असं आशाळ भूतपणे न थांबता आपल्या आतल्या प्रेरणेचा (इनर कॉल) आवाज ऐकून कार्यप्रवृत्त झालं पाहिजे.

विवेकानंदांचा शिक्षण विचार हा माणूस घडवणारं शिक्षण (मॅनमेकिंग एज्युकेशन) असा होता. आतल्या दिव्यतेला (इनर किंवा पोटेन्शल डिव्हिनिटी) व्यक्त होण्यासाठी मदत करणारं शिक्षण त्यांना हवं होतं. प्रत्येक बालक किंवा युवक यांच्या अंतरंगात अनेक शक्यता नि क्षमता असतात.

त्यांचा विकास घडला पाहिजे. सैनिकांना देण्यात येणार्‍या लेफ्ट राइट, लेफ्ट रइट अशा साचेबद्ध सूचना शिक्षणात नसाव्यात. यामुळे शिक्षणातले नवनवेउन्मेष (कल्पना), उत्स्फूर्तता, उमेद, उत्साह या सार्‍यांचा बळी दिला जातो. शिक्षणाचं बराकीकरण (रेजिमेंटेशन) होतं. युवकांनी तरी स्वतःला न्याय द्यायला हवा. स्वामीजी म्हणतात, ‘पुस्तकी शिक्षण नि पदव्या घ्यायच्या असतील तर घ्या. पण हे करतानाच एक तरी नवा खेळ, नवं वाद्य, नवं कौशल्य, नवं तंत्र शिका ना?’
आज तर खेळात – कलेत – कौशल्यात आपण करिअर (भविष्य) घडवू शकतो. अगदी आचारी (कुक् नव्हे शेफ्) गायक – वादक – नर्तक म्हणून विकास घडवायला खूप संधी आहे. जिद्द, चिकटी म्हणजेच ध्यास – अभ्यास प्रयास मात्र हवेतच आणि हे ज्यांच्याकडे उदंड आहे त्यालाच युवा म्हणायचं ना? मग केवळ नोकरी एक्के नोकरीचा हव्यास कशाला? स्वामीजींचे असे विचार हे सर्वकाळासाठी योग्य आहेत.

* हे जग एक व्यायामशाळा (जिम्) येथे आपण स्वतःचं सामर्थ्य वाढवण्यासाठीच येत असतो. बलहिनाला सत्याचा लाभ कधीच होत नसतो. तुम्ही युवा सारे अमृताचे पुत्र (अमृतस्य पुत्राः) आहात. करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे विचार तुमच्या मेंदुत शिरू द्यात. मी तोच (परमेश्वर आहे असा ‘सोडहं सोडहं’ मंत्र हृदयात घुमवत ठेवा. या विचारांची संगीतमय स्पंदनं तुमच्या हृदयात झंकारत राहू देत. सारं जग चालवण्याची – हालवण्याची शक्ती तुमच्यात आहे हे सदैव ध्यानात ठेवा.
‘अमृताचे पुत्र’ हे स्वामीजींना आवडणारं युवावर्गासाठीचं वर्णन आहे. कोणी खांदे पडलेला, पाठीत वाकलेला, नजर जमिनीकडे असलेला युवक दृष्टीला पडला तर त्यांना खूप वाईट वाटत असे. त्यांच्या दृष्टीतला युवक कसा होता? छाती पुढे-खांदे मागे – हनुवटी वर – दृष्टी क्षितिजापल्याड असा तेजस्वी युवक त्यांना अपेक्षित होता. युवकाची देहबोली (बॉडी लँग्वेज) पूर्णपणे विजिगीषू (विजयासाठी उत्सुक असलेली), होकारात्मक (पॉझिटिव्ह) काहीशी विधायक दृष्टीनं आक्रमक अशी आत्मविश्‍वासपूर्ण हवी. स्वतः स्वामीजींची शरीरयष्टी नि देहबोली अशीच होती.

सर्वधर्म परिषदेसमोर बोलताना ‘माझ्या अमेरिकेतील भगिनींनो नि बंधूंनो’ या पहिल्याच संबोधनानं सार्‍या श्रोतृवर्गाला जिंकणार्‍या स्वामी विवेकानंदांची देहबोली तरुणाला साजेल (की लाजवेल) अशीच होती. युवावर्गाला ते नेहमी सांगत, ‘स्वतःला कधीही शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक यापैकी कोणत्याही दृष्टीनं दुर्बल, दुय्यम समजू नका. पौरुषहीन, पराक्रमहीन जीवनाला काहीही अर्थ नाही. किडामुंगी कीटकांसारखं जगणं हा काही जीवनाचा आदर्श नाही. रोगट, दुर्बल, विकृत मनोवृत्तीचा पूर्णतः त्याग करा. नि कठोपतिषदातल्या आदेशाप्रमाणे उठा! जागे रहा! आपलं ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. त्यासाठी ते ध्येय प्राप्त केलेल्या अनुभवी श्रेष्ठ व्यक्तींकडे जा. उत्तिष्ठत! जाग्रत | प्राप्यवरान् जिबोधत!
कठोपनिषदातील यम आणि तेजस्वी निग्रंही बालक नचिकेता यांच्यातील संवाद स्वामीजींना खूप आवडायचा. मृत्यूचं रहस्य मागताना आनंदी, मुक्त जीवन जगण्याचं रहस्यच नचिकेता यमाकडे मागत होता. नचिकेत्याचा आदर्श युवकांनी सदैव समोर ठेवावा असं ते आग्रहानं सांगत.

* तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते आहात. म्हणूनच तुमच्या दुर्भाग्याचे कर्तेही तुम्हीच आहात. स्वामीजी युवकांना हृदयाच्या तळापासून हे सांगायचे. ‘भाग्य नावाचं एक भूत तुम्ही निर्माण केलंय. हे भाग्य राहतं कुठं? ते खरोखर असतं कसं? याचा विचारच तुम्ही करत नाही. ‘भाग्य भाग्य’ म्हणून कर्म न करता नशिबाला दोष देत राहता. स्वतःच्या जीवनाचेच काय तर संपूर्ण समाजाचे अगदी भारताचेही भाग्यविधाते तुम्हीच आहात, दुसर्‍या कुणाला तुमच्या जीवनातील परिस्थितीसाठी निंदूही नका अन् वंदूही नका.

हा स्वामीजींचा संदेश आजमितीला अत्यंत सुसंगत नि आवश्यक असाच आहे. ‘मनावरचा ताण, मनातील भीती, संशय हे मीच निर्माण केल्येत म्हणून याचा ध्वंसही मीच करणार’ असं स्वतःला सतत बजावत रहा. उगीच कशाला छाती बडवत, उसासे टाकत, कण्हत जगायचं? स्वामीजी पुढे असंही म्हणतात –
‘‘भ्याड व मूर्ख मनुष्यच ‘हे दैव आहे’ असं म्हणतो – या अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे. खरं तर ‘मी माझं दैव घडवीन’ असं म्हणायला हवं. म्हातारी होऊ लागलेली माणसंच दैवाविषयी बोलत असतात. तरुणवर्ग ज्योतिषशास्त्राकडे वळत नाही. त्याची श्रद्धा स्वतःच्या कष्टावर, प्रयत्नावर असते. तो स्वतःलाच समजत असतो आपल्या जीवननौकेचा कर्णधार! जीवनाचा शिल्पकार!

एकदा सात्विक संतापानं स्वामीजी म्हणाले, ‘बुडवून टाक तुमचे ते तेहतीस कोटी देव समुद्रात. पन्नास वर्षं फक्त भारतमातेलाच देवता मानून तिची पूजा-सेवा करा. मग बघा आपला प्रिय भारत पुन्हा जगातलं क्रमां एकच राष्ट्र बनतो की नाही?
रविंद्रनाथ टागोर शांतिनिकेतनात येणार्‍या युवकांना सांगत असत –
‘भारताला जाणून घ्यायचं असेल, तर विवेकानंद वाचा, त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करा.
तेथे सारे सकारात्मक आहे. नकारात्मक काहीही नाही.’
युवक म्हणजे जीवनातल्या सकारात्मकतेचं मूर्तिमंत प्रतीक असतात ना? मग त्यांना यापेक्षा अधिक प्रभावी संदेश राष्ट्रीय युवा दिनी दुसरा कोणता असेल? विचार करा.