॥ सर्वही होते…॥ ॥ आनंदाचा निधी ः मानवाची बुद्धी॥

0
194

– प्रा. रमेश सप्रे

असं आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात अधिक उपयोगी पडते ती बुद्धी. आपली बुद्धीच प्रत्येक घटनेचा सकारात्मक भावार्थ समजावून देते. आपली बुद्धीच आपल्या आनंदाची शिल्पकार असते. म्हणूनच तर म्हटलं… बुद्धीने सर्वही होते.’

महाभारताच्या मुख्य कथेचा प्रवाह तसा छोटाच आहे. व्यासांनी आरंभी कौरव-पांडव यांच्यातील युद्ध नि त्याच्याशी संबंधित काही गोष्टी यांचा ‘जय’ नावाचा इतिहास ग्रंथ लिहिला. त्याची श्‍लोकसंख्या अवघी चोवीस हजार एवढीच होती. नंतर त्यांचे शिष्य आणि ठिकठिकाणी पुराणकथन करणारे सूत (पुराणिक) यांना श्रोत्यांनी अनेक जीवन, निसर्ग, धर्म, तत्त्वज्ञान, परमार्थ याविषयी प्रश्‍न विचारले. त्यांची उत्तरं देताना अनेक उपकथानकं तयार झाली. ती मूळ कथेइतकीच किंवा कधीकधी अधिक रंजक नि उद्बोधक आहेत. असे शेकडो कथाप्रसंग आहेत. मुळात प्रश्‍नोत्तर रूपात हे प्रसंग आल्यामुळे त्यात चिंतनाची आवश्यकता असलेला किंवा चिंतनासाठी प्रेरणा देणारा भाग अधिक असतो. विशेष मुख्य कथाप्रवाहाशी असे प्रसंग छान जोडलेले किंवा विणलेले असतात. अशा शैलीमुळेच रामायण – महाभारत ही अमर अद्वितीय अशी महाकाव्यं बनली. पाश्‍चात्य (ग्रीक – रोमन) संस्कृतीतही प्राचीन काळी इलियड, ओडेसी यासारखी दीर्घकाव्यं लिहिली गेली. त्यांच्यातील विषयांनाही जीवनाचा संदर्भ होता. ती दीर्घकाव्यं लिहिली गेली. त्यांच्यातील विषयांनाही जीवनाचा संदर्भ होता. ती दीर्घकाव्यंही कथारूप होती. त्यातील काही कथा ‘हेलन ऑफ ट्रॉय’, ‘स्पार्टाकस’ अशी लोकप्रिय झाली.

पण काळाच्या ओघात त्यांचा लोकांच्या मनावरील प्रभाव आणि त्यांची मोहिनी कमी झाली. तसं आपल्या रामायण-महाभारताविषयी झालं नाही. आजही ती प्रसन्न नि टवटवीत वाटतात. उगीच नाही जगातील सर्व देशातील दूरचित्रवाणी (टी.व्ही.) वाहिन्या तसेच इतर माध्यमातून या महाकाव्यातील कथा खूप लोकप्रिय आहेत. सर्व वयोगटातील व्यक्तींना त्या कथा आकर्षून घेतात.
हे सांगण्याचं कारण एकच की महाभारतात अशा समांतर उपकथा पावलो पावली येतात. त्यात वक्ता – श्रोता यांच्यातील प्रश्‍नोत्तरांचा भाग असतोच. पण त्या कथांतल्या पात्रांमध्येसुद्धा मनोरंजक संवाद, प्रश्‍नोत्तरं असतात. ती आपल्या आजच्या जीवन संघर्षातही मार्गदर्शक ठरतात. त्यावर मनन – चिंतन मात्र केलं पाहिजे. केवळ श्रवण वाचन नको.

आपल्या मुलांना, संबंधितांना, आप्तांना येणार्‍या कठीण प्रसंगासाठी तयार करणं हे वडील मंडळीचं सदैव महत्त्वाचं असलेलं कर्तव्य असतं. असं करताना विविध शक्ती-युक्ती-कलाकौशल्यं शिकवून सर्वप्रथम त्यांची बुद्धी ताजी, तेजस्वी करण आवश्यक असतं. उदाहरणार्थ – ‘आजगर पर्व’ नावाचा एक छोटासा पण उद्बोधक प्रसंग पाहू या. आजगर म्हणजे अजगरासंबंधी किंवा अजगराचं. त्याची पूर्वकथा फार प्रेरक आहे.

नहुष नावाचा चंद्रवंशातील पराक्रमी राजा. हा प्रसिद्ध राजा ययातीचा पिता. इंद्रानं वृन्नासुर मारलं. हा वृन्नासुर आधी विद्याधर नावाचा यक्षांच्या पातळीवरचा विद्वान होता. एकदा शिवाची निंदा केल्यामुळे पार्वतीनं त्याला असुर बनण्याचा शाप दिला. तो झाला वृन्नासुर. आपल्या कृतीमुळे शापित झाला, तरी पूर्वी विद्वान असल्याने इंद्राला त्याचा वध केल्यामुळे ब्रह्महत्येचं पाप लागलं. त्याचं प्रायश्चित्त म्हणून इंद्र, सरोवरात लपून तपश्‍चर्या करू लागला. त्या अवधीत (काळात) इंद्राच्या सिंहासनावर नहुष राजाची स्थापना केली. आपण इंद्र झालो तेव्हा इंद्रपत्नी शची किंवा इंद्राणी आपल्याला मिळाली पाहिजे. या वासनेनं नहुष झपाटला गेला. इंद्राणीनं एक अट घातली की तिला नेण्यासाठी नहुषानं आत्तापर्यंत वापरल्या नं गेलेल्या वाहनातून यावं. खूप चर्चा – विचार करून नहुषानं एक पालखी बनवली अन् ती ऋषींच्या खांद्यांवर ठेवून इंद्राणीकडे निघाला. त्याला तिला भेटण्याची एवढी तीव्र ओढ लागली की ऋषी वाहून नेत असलेल्या पालखीचा वेग त्याला खूप मंदसंथ वाटू लागला. पुन्हा पुन्हा तो ऋषींना ‘सर्प – सर्प’ म्हणजे वेगात चला, वेग वाढवा. त्यांचं असं वारंवार सांगणं असह्य झाल्यानं ऋषींनी पालखी खाली उतरवली नि अगस्त्य ऋषींनी नहुष राजाला शाप दिला. ‘अजगर बन. आम्ही वेगात पालखी न्यावी असं तुला वाटतंय ना मग तूच रहा पडून सुस्त अजगरासारखा!’

प्रश्चात्तापाच्या आगीत जळत असलेया नहुषानं आपली चूक कबूल करून उःशाप मागितला तेव्हा अगस्त्यांनी सांगितलं, ‘एके ठिकाणी पडून राहिल्यामुळे तू चिंतन करू शकशील. बुद्धी वापरून सतत विचार करत रहा. तुझ्या मनात जीवनाबद्दल अनेक प्रश्‍न निर्माण होतील. त्या प्रश्‍नांचं समाधान (उत्तरं) जेव्हा होईल तेव्हा तू अजगर योनीतून (रुपातून) मुक्त होशील.’
अजगर अवस्थेतला नहुष राजा सुस्त पडून राहू लागला. त्याच्या मनात खरंच अनेक प्रश्‍न निर्माण झाले. तो येणार्‍या – जाणार्‍याला ते प्रश्‍न विचारून पाही. पण कोणीही समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही.

एकदा मात्र एक विचित्र प्रसंग घडला. भीम – बलाढ्य पांडव -एका कामगिरीसाठी जात असताना वाटेत हा अजगर पडलेला होता. त्याला ओलांडून जाणं योग्य नव्हतं. भीमानं अहंकारानंच त्याला म्हटलं, ‘चल, माझ्या वाटेतून दूर हो.’
यावर नहुष -तो अजगर – म्हणाला, ‘तुला हवं असेल तर तूच मला उचलून दूर हटवं.’ भीमानं रागानं त्याला उचलायचा प्रयत्न केला पण त्यालाच अजगरानं घट्ट विळखा घातला. भीमाला तो कसाच सोडवता येईना. तो कासावीस होऊन तडफडू लागला. हा प्रकार बराच वेळ चालला. भीमाला शोधण्यासाठी आलेल्या युधिष्ठिरानं ते दृश्य पाहिलं. त्याला कळलं की हा अजगर कोणी सामान्य सर्प नाहीये. कुणीतरी शापित गंधर्व असावा. म्हणून शरणपूर्वक युधिष्ठिर म्हणाला, ‘अजगरदेव, आपण कोण आहात? आपलं, मूळ स्वरुप कोणतं?’ असे नम्र स्वर ऐकून अजगर म्हणाला, ‘मी नहुष राजा. ऋषींच्या शापामुळे अजगर अवस्थेत पडून आहे. माझ्या मनात अनेक प्रश्‍न आहेत. त्यांची उत्तरं मला दे. माझं समाधान झालं तर माझी मुक्ती होईल या शापातून अन् हा तुझा बंधूही सुटेल माझ्या तावडीतून.

अजगरानं अनेक प्रश्‍न विचारले. युधिष्ठिरानं दिलेली उत्तरं त्याला समाधान देणारी ठरली. त्याची मुक्ती नि भीमाची सुटका एकाच वेळी झाली.
या कथेत अनेक पैलू आहेत. ज्यांचा विचाराशी – बुद्धीशी – विवेकाशी संबंध आहे. काही पैलूंवर सहचिंतन करू या.

नहुषाला मिळालेलं इंद्रपद ः इंद्र तपश्चर्येला गेल्यामुळे, तो कर्तव्य करत असताना घडलेल्या प्रमादामुळे (अपराधामुळे) त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागलं – यावरून एक बोध निश्‍चित होतो की अनेक वेळा योग्य कार्य करतानाही समाजातील मान्य तत्त्वं, नियम यांच्याविरुद्ध वागलं जातं. त्यावेळी तसं वर्तन आवश्यकही असतं. पण नंतर त्यासाठी शासनही (शिक्षा) स्विकारावं लागतं. व्यक्ती कोणत्याही पदावर असली तरी यातून सुटका नसते. धर्मतत्त्वांची – मूल्यांची सत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ असते. त्याचप्रमाणे समाजातील कायदेकानून सर्वांवर – अगदी सर्वांवर बंधनकारक तर असतात.

अलीकडच्या इतिहासातील एक प्रसंग यादृष्टीनं बोलका आहे. दांडीयात्रेनंतर गांधीजींनी जो मिठावर ब्रिटिश सरकारनं लादेलल्या कराविरुद्ध सत्याग्रह केला. चिमुटभर मीठ हातात घेऊन त्यांनी एकप्रकारे स्वातंत्र्याचा निर्धार व्यक्त केला. पण त्याचवेळी स्वतःला अटकही करून घेतली. गांधीजींचे या संबंधातील विचार मोठे मार्मिक आहेत. ‘आज मी ज्या सत्तेविरुद्ध संघर्ष करतोय त्यांनी केलेल्या कायद्याचं उल्लंघन करतोय तर मी त्याच कायद्यानुसार असलेली शिक्षा भोगलीच पाहिजे. नाही तर उद्या आपलं राज्य – स्वराज्य आल्यावर लोकांना कायदा मोडण्याची सूट मिळेल नि शिक्षा भोगण्याची सवय होणार नाही. फार द्रष्टे विचार होते महात्मा गांधींचे, … आज दुर्दैवानं त्यांना जी भीती वाटत होती तसं वर्तन घडोघडी प्रत्येक क्षेत्रात सर्वांकडून घडतंय. असो.
ऋषींचा अपमान ः एक तर नहुषाच्या मनात इंद्रपत्नीबद्दल – परस्त्रीबद्दल – पापवासना निर्माण झाली. ती पुरवण्यासाठी तो एवढा लाचार झाला की त्याची बुद्धी कुंठित झाली. विचारशक्ती नष्ट झाली. त्यातून ऋषींनी वाहून न्यावयाच्या वाहनाची (पालखीची) कल्पना सुचली. त्याला भान राहिलं नाही की ऋषी ही केवळ व्यक्ती नसते तर समाजातील सर्वोच्च शक्ती असते. राजाच्या मंत्री – अमात्य यांच्याहून श्रेष्ठ स्थान ऋषींचं असतं. इतकं की ऋषींचा प्रवेश झाल्यावर राजानं उठून उभं राहायचं असतं नि नतमस्तक होऊन ऋषींना उच्चासन द्यायचं असते. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ या न्यायानं अतिशय सदाचारी असलेल्या नहुष राजाची मती भ्रष्ट झाली हेच खरं.
ऋषींनी राजाला दिलेला शाप नि उःशाप – नहुषासारख्या सदाचरणी राजाच्या मनात निर्माण झालेली विकृत कामवासना हे ऋषींच्या शापाचं मूळ कारण होतं. राजाच्या विचारशक्तीवर या तीव्र वासनेमुळे पडदा पडला होता. त्याला शासन (दंड) होणं आवश्यक होतं. हे काम ऋषींनाच करावं लागणार होतं. म्हणून त्यांनी विचारपूर्वक राजाला अजगर बनण्याचा शाप दिला नि त्या अवस्थेत चिंतन करून मुक्त होण्याचा उःशापही दिला. शापातून केवळ मुक्त नाही तर उद्धार करतो तो उःशाप. यामुळे अजगरावस्थेत खूप मोलाचे जीवनविषयक प्रश्‍न राजाच्या मनात आले. त्यांची मनासारखी उत्तरं मिळाल्यावर राजाला शापमुक्ती मिळाली.

भीमांचा आडदांडपणा नि युधिष्ठिराची विनम्र वृत्ती ः सगळ्या प्रसंगात शारीरिक शक्ती उपयोगी पडत नाही. उलट कधी कधी ती नव्या समस्या समोर उभी करते. शरणागती, विनयवृत्ती हेच खर्‍या ज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे. ‘विद्या विनयेन शोभते असं म्हणतात त्याचा अर्थ हाच आहे. एकांतात राहून, मौन पाळून, नको ते व्याप कमी करून चिंतन केल्याशिवाय बुद्धीचा प्रभावी उपयोग करता येत नाही. युधिष्ठिराचं व्यक्तिमत्त्व नि जीवनशैली अशाच प्रकारची होती. महाभारतात अनेक मोक्याच्या प्रसंगी याचा अनुभव येतो. अशा विचारपद्धतीमुळे सर्वांचं कल्याणच होतं. ‘बुद्धीने सर्वही होते’ याचं अशा प्रसंगात हृद्य दर्शन होतं.

आपल्या जीवनात सतत घटना – प्रसंग घडत असतात. त्यांच्या वर-खाली होणार्‍या लाटांमुळे या संसाराला आपल्या आयुष्याला हेलकावणार्‍या सागराची उपमा देतात. कधी सुख तर कधी दुःख याचा अनुभव तर आपल्याला सदैव येत असतो. सुखामागून दुःख, दुःखा मागून सुख अशी साखळी म्हणजेच तर आपलं जीवन. संतमंडळी तर सांगतात – ‘सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले!’ खरं पाहिलं तर सुख आणि दुःख आपल्या मानण्यावर अवलंबून आहे. जगात कोणतीही एक वस्तू किंवा व्यक्ती एकाच वेळी सर्वांना सुखकारक किंवा दुःखदायक असत नाही. म्हणून सुख-दुःखाच्या मागे न लागता अखंड आनंदात राहण्यात मानवी जीवनाचं खरं सार्थक आहे.

असं आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात अधिक उपयोगी पडते ती बुद्धी. आपली बुद्धीच प्रत्येक घटनेचा सकारात्मक भावार्थ समजावून देते. आपली बुद्धीच आपल्या आनंदाची शिल्पकार असते. म्हणूनच तर म्हटलं… बुद्धीने सर्वही होते.’