॥ समुपदेशन गीतेतून ॥ यत्र योगेश्‍वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः

0
725

– प्रा. रमेश सप्रे

‘समुपदेशन गीतेतून’ या भगवंताच्या प्रेरणेनं नि सद्गुरुंच्या इच्छेनं सुरू असलेल्या लेखमालेचा, खरं तर सहचिंतन मालिकेचा हा समारोप आहे. ‘समारोप’ हा शेवट नसतो. तर ते ‘सम्यक् आरोपण’ असतं. म्हणजे आपल्या मनाजीवनात त्याचं आरोपण म्हणजे पेरणी करायची असते. पेरणी नियमित सकस असेल तर पीक सरस येईल हे सांगायला नको.

भगवद्गीतेच्या पुस्तकावर बर्‍याच वेळा चित्र असतं ते पहिल्या अध्यायावर आधारित. अर्जुन रथाच्या मागच्या भागात (किती खाली) हात जोडून उभा आहे अन् कृष्ण त्याला उपदेश करतोय. अर्जुनाला निश्चित काय करावं कळत नाहीये. ‘युद्ध करू नये (न योत्से|)’ असा आपला विचार तो कृष्णाला सांगतोय. ‘शिष्यस्तेऽहम्’ मी तुझा शिष्य म्हणून कृष्णाच्या ठिकाणी गुरूभाव ठेवून शरण जातोय (त्वां प्रपन्नं|). त्याचवेळी अशा प्रसंगी श्रेयस्कर कल्याणकारी असा मार्ग कोणता हे निश्‍चित सांगायची प्रार्थना कृष्णाला करतोय. हा खरा गीताप्रसंग. या निमित्तानं अर्जुनाच्या माध्यमातून सार्‍या मानवजातीला अनंत काळासाठी जीवनात उपयोगी पडेल असं समुपदेशन भगवंत करतात तीच भगवद्गीता! हे करताना कृष्ण एका दिव्य, योगारूढ अवस्थेत असतात म्हणून ते ‘भगवान’ बनून गीतोपदेश करतात. या दोघांच्या पार्श्‍वभूमीला चार श्‍वेत (पांढरे) घोडे असलेला रथ ज्याच्यावर फडकणारा ध्वज व ध्वजस्तंभावर स्थानापन्न झालेला हनुमान. हे चित्र आपल्याला परिचित असतं.

हनुमान कृष्णार्जुनांच्या रथाला स्थिर ठेवण्यासाठी बसलेला आहे. पण अर्जुनाच्या मोहग्रस्त, अस्थिर मनाला स्थित करण्यासाठी कृष्ण आणि भगवान् अवस्थेतील त्याचं समुपदेशन (म्हणजेच गीता) आहे. म्हणून असं म्हटलं जातं की कृष्ण हा केवळ ‘रथ सारथी’ नाहीये तर अर्जुनाच्या मनाला चालवणारा, नियंत्रणात ठेवणारा ‘पार्‌थ सारथी’सुद्धा आहे. कृष्णाच्या अनेक नावातलं ‘पार्थसारथी’ हे नाव खूप अर्थपूर्ण आहे.
गीतेच्या काही ग्रंथांवर समुपदेशनानंतरच्या ‘स्थितोऽस्मि गत संदेहः’ असं म्हणून ‘करिष्ये वचनं तव’- तुझ्या सांगण्याप्रमाणे वागेन असं वचन देणार्‍या अर्जुनाचं शंख फुंकत व कृष्णाचंही आनंदानं शंख फुंकत रथ हाकणार्‍या युद्धोत्सुक अवस्थेतलं चित्र असतं. हे चित्र अर्थातच सर्वांना स्फूर्ती देणारं, जीवनातलं ध्येय गाठण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा देणारं असतं.
पण या दोन्ही चित्रांच्या मध्ये आणखी एक चित्र आवश्यक असतं. क्वचित् एखाद्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असं चित्र आढळतं… चिंतनमग्न, ध्यानस्थ, सहजसमाधीत बसलेला शांतप्रसन्न श्रीकृष्णाचं प्रतीक आहे विजय नि पराजय (लाभालाभौ जयाजयौ) याच्यामधली स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजे संजय! धृतराष्ट्राच्या ‘मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय?’- या प्रश्‍नात गीतेचं मूळ आहे. तो आमच्या – आपल्याही म्हणायला तयार नाहीये. ‘माझ्या’ आणि ‘पांडू’च्या पुत्रांनी युद्धभूमी कुरुक्षेत्रावर काय केलं?… म्हणजे तिथं काय काय, कसं कसं घडलं हे संजयानं सांगावं अशी अधीरता त्यांच्या प्रश्‍नात आहे. त्यावेळी युद्धाचे दहा दिवस संपले होते. पितामह भीष्मांना बाणांनी घायाळ करून रथातून खाली पाडलं होतं. नंतर त्याच शरपंजरी अवस्थेत शिबिरात हलवण्यात आलं होतं. दोन्ही सैन्यातले सारे वीर भीष्माचार्यांच्या समाचारासाठी जमले. त्या वेळेपर्यंत संजयही रणभूमीवर होता. युद्धातील भीष्मपतनाच्या या महत्त्वाच्या प्रसंगानंतर तो धृतराष्ट्राकडे त्याचं सांत्वन करण्यासाठी नि त्यावेळेपर्यंत झालेल्या युद्धाचा समाचार सांगण्यासाठी पोचला तेव्हा अत्यंत अधीरतेनं धृतराष्ट्रानं तो प्रश्‍न विचारला- जो परंपरेनं श्रीमद्भगवद्गीतेचा आरंभाचा श्लोक समजला जातो.
इतर घटनांबद्दलही धृतराष्ट्राला उत्सुकता होतीच. पण आता दुर्योधनाचं काय? या युद्धाचा शेवट कसा होणार? माझ्या मुलांना जय मिळणार का?… असे अनेक भाव त्याच्या या प्रश्‍नात होते. आपल्या शंभर पुत्रातही सर्वांत मोठ्या दुर्योधनावर त्याचा जीव (मोह) अधिक होता. यामुळेच तर युद्ध अटळ झालं होतं. ज्ञानोबा माऊलीनं प्रत्ययकारी शब्दात धृतराष्ट्राच्या या मनोवस्थेचं – त्याच्या स्वभावाचं – वर्णन केलंय. ‘पुत्रस्नेहे मोहितु| अंतर्बाह्य अंधु॥ पुत्रमोहामुळे धृतराष्ट्र हा आतून – बाहेरून आंधळाच होता. त्याचा आपला सारथी (सूत) संजयावर विश्‍वास होता. संजयही धृतराष्ट्राच्या रथाप्रमाणे त्याचं मनही चालवत होता. (मनोवृत्तीचं सारथ्य करत होता) पण एका मर्यादेपलीकडे धृतराष्ट्र त्याचं ऐकत नव्हता. आपला हा सेवक आहे नि आपण याचे स्वामी आहोत हा भाव सतत जागा असायचा. म्हणून संजयाचा सल्ला त्यानं कधी मानला नाही. खरंतर त्याला मानवला नाही. या संजयाचा अधिकार व्यासांनाही मान्य होता म्हणून धृतराष्ट्राला (आपल्या पुत्राला) देऊ केलेली दिव्यदृष्टी व्यासांनी त्याच्या विनंतीवरून संजयाला दिली. उगीच कुणालाही व्यासांनी ती दिली नसती.
तर असा हा संजय धृतराष्ट्राला युद्धाचं जिवंत, प्रत्ययकारी वर्णन सांगत होता. दुर्योधनाची पिछेहाट, पांडवांची सरशी हे सारं ऐकून धृतराष्ट्र व्यथित होत होता. खरंच आहे – सत्य हे कटू व कठोर असतं. तसं पाहिलं तर युद्ध सुरू होण्यापूर्वीच राजसभेत सर्वांसमोर कृष्णानं एक नित्यसिद्धांत सांगितला होता-
यतो धर्मो ततो कृष्णः; यतो कृष्णः ततो जयः|
म्हणजे जिकडे धर्म-न्याय-नीती आहे तिकडे कृष्ण असतो अन् जिकडे कृष्ण असतो तिथं जय असतो.’
पुढील सर्व घटना अशाच घडल्या हा इतिहास आपल्याला माहीत असतो. ‘युद्धस्य कथा रम्या’ म्हणून आपण युद्धातील घटना ऐकलेल्या – वाचलेल्या असतात. आता तर दूरदर्शनवरील अनेक मालिकांतून त्या युद्धघटना अनुभवलेल्याही असतात. पण युद्धापूर्वी सांगितलेल्या गीतेचं – त्यातील समुपदेशनाचं – मननचिंतन फारच थोडेजण करतात. त्यातही अगदी थोडे गीतेचा उपक्रम (आरंभ) नि उपसंहार (शेवट) यावर विचार करतात. धृतराष्ट्राचा तो आसक्तीनं युक्त असा प्रश्‍न नि अर्जुनाची गोंधळलेली मनःस्थिती (किंकर्तव्यविमूढ अवस्था) यामुळे गीतोपदेश सर्वांच्या जीवनासाठी खूप प्रभावी नि उपयोगी झालाय.
आपली अवस्था धृतराष्ट्र व अर्जुनासारखी अनेकदा होते. पण भगवंताचं सांगणं नि संजयाचं विचार करून त्याचा अर्थ नि वृतांत कथन करणं इकडे हवं तसं व तितकं लक्ष आपण देत नाही. गीतेचा समारोप संजयाच्या शब्दात झालाय. स्वतः व्यासमहर्षींनी गीताप्रसंग महाभारतात घालताना शब्दबद्ध केलाय. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा नि प्रतिभेचा स्पर्शही गीतेतील समुपदेशनाला झालाय. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण ही ज्ञानाची सरस्वती; व्यासमहर्षी ही कर्मांची गंगा अन् स्थितप्रज्ञ संजय ही भक्तीची यमुना यांची पावन त्रिवेणी म्हणजे भगवद्गीता!
संजयाच्या भक्तीचं दर्शन त्याच्या अखेरच्या अनुभवपूर्ण शब्दात गीतेत आपल्याला होतं. तो भावविभोर, भावनायुक्त अंतःकरणानं उद्गारतो-
व्यासप्रसादात् श्रुतवान् एतत् गुह्यम् अहम् परम्‌|
योगं योगेश्‍वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयम्‌॥
– म्हणजे श्रीव्यासांच्या कृपेनं दिव्यदृष्टी मिळाल्यामुळे मी हा परमगुह्य (रहस्य)युक्त योग (ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे) – गीतायोग किंवा (भगवंत) प्रसाद योग साक्षात् योगेश्‍वर श्रीकृष्ण भगवंताकडून (तो अर्जुनाला सांगत असताना) ऐकला आहे. या सार्‍या श्रीकृष्णार्जुन संवादाचा – म्हणजेच गुरुशिष्य उपदेशाचा – प्रभाव आपल्यावर कसा पडलाय हे सांगताना संजयाचे अष्टसात्त्विक भाव जागे होतात. अन् भावभरल्या शब्दात सद्गदित होऊन तो धृतराष्ट्राला म्हणतो-
राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादं इमं अद्भुतम्‌|
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः॥
म्हणजे – हे राजा धृतराष्ट्र, भगवान् श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या या रहस्ययुक्त कल्याणकारी व अद्भुत संवादाचं (इमं पुण्यं च अद्भुतं संवादम्) पुनःपुन्हा स्मरण होऊन (संस्मृत्य संस्मृत्य) मी वारंवार (मुहुर्मुहुः) आनंदित होत आहे. (हृष्यामि) पुढे संजय असंही म्हणतो-
तत् च संस्मृत्य संस्मृत्य रूपम् अतिअद्भुतं हरेः|
विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनःपुनः॥
म्हणजे- आणि हे राजन्, श्रीहरीचे (हरेः) ते अति अद्भूत रूप (विश्‍वरूप) वरचेवर आठवून मला महान् आश्चर्य वाटत आहे नि मी पुनःपुन्हा आनंदित, रोमांचित होत आहे. गीतोपदेश संपल्यावर त्यातील समुपदेशनाचा नि त्यानिमित्तानं दिसलेल्या दिव्य, विराट विश्‍वरूपाचा आपल्यावर कसा अद्भुत प्रभाव पडलाय हे सांगून संजयाचं समाधान होत नाही. तो एक नित्य विश्‍वसिद्धांतही सांगतो.
यत्र योगेश्‍वरः कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धरः|
तत्र श्रीः-विजयो-भूतिः-ध्रुवानीतिः मतिःमम॥
म्हणजे – जेथे योगेश्‍वर (ज्ञानी, भगवान् अवस्थेतील, योगारूढ) कृष्ण अन् गांडीव धनुर्धारी वीर अर्जुन तेथे सर्व प्रकारची समृद्धी (श्रीः), वैभव (भूतिः), विजय आणि अढळ नीती (ध्रुवा नीतिः) असते असं माझं मत आहे.
कृष्ण जर ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार (न धरी शस्त्र करी मी)’अशा योगारूढ अवस्थेत – योगेश्‍वर भूमिकेत – असेल आणि अर्जुन जर पराक्रमी धनुर्धर असा असेल तर तिथं वैभव, समृद्धी, विजय, अढळ नीती या गोष्टी असतीलच म्हणजे धर्मराज्य, रामराज्य नांदेल. नुसतंच वैभवसंपन्नतायुक्त हस्तिनापूर नसेल तर अखंड विजयी व नीतिमान (रामाची) अयोध्याही असेल.
संजयानं काढलेलं गीतेचं हे सार आहे. कृष्ण आहे पण अर्जुन नाही अशी द्वारका समुद्रात बुडते तर नुसता अर्जुन आहे पण कृष्ण नाही असं हस्तिनापूर अनाथ होतं नि पांडवांना हिमालयगमन स्वर्गारोहण करावं लागतं. हे ध्यानात ठेवायला हवं.
… इथं गीताप्रवाह थांबला. पण तसा तो थांबलाही नाही. आपल्यासारख्या गीतेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या साधकांच्या मनात तो वाहत राहिला पाहिजे. आपल्या सतत वाहणार्‍या जीवनाचा हा गीतोपदेश प्राण बनला पाहिजे- श्‍वास-ध्यास बनला पाहिजे यासाठी त्याचा नित्य अभ्यास करत राहिलं पाहिजे.
‘समुपदेशन गीतेतून’ या भगवंताच्या प्रेरणेनं नि सद्गुरुंच्या इच्छेनं सुरू असलेल्या लेखमालेचा, खरं तर सहचिंतन मालिकेचा हा समारोप आहे. ‘समारोप’ हा शेवट नसतो. तर ते ‘सम्यक् आरोपण’ असतं. म्हणजे आपल्या मनाजीवनात त्याचं आरोपण म्हणजे पेरणी करायची असते. पेरणी नियमित सकस असेल तर पीक सरस येईल हे सांगायला नको. पण तण काढणं (नडणी करणं), खत घालणं, आवश्यक तर जंतुनाशकाचा फवारा मारणं या गोष्टी कराव्या लागतातच. गुणांचा विकास करताना दुर्गुणांचा विनाशही करावा लागतो. यासाठीच गीतेचा संदेश एका शब्दात सांगताना रामकृष्ण परमहंस ‘गीता’ हा शब्द दहा वेळा म्हणायला सांगायचे. अन् आपण म्हणत असताना ते ‘ता’पासून सुरू करून ‘तागी तागी तागी’ असं म्हणत- ‘तागी’ म्हणजे ‘त्यागी’. गीतेचा सारसंदेश ‘त्याग’ हाच आहे. ‘भोग’ नव्हे. गीता ‘योग’ शब्दावर भर देते. ज्ञान-कर्म-भक्ति-योग हाच गीतामार्ग आहे. गीतायोग आहे. ‘समग्र जीवनयोग’ आहे.
स्वामी रामसुखदास म्हणायचे- गीतेचं पहिलं अन् शेवटचं अक्षर ‘धर्‌म’ आहे तर शेवटचा व पहिला शब्द आहे ‘मम धर्म’! थोडक्यात गीता धर्म-मम धर्म म्हणजेच स्वधर्म – मानवधर्म – विश्‍वधर्माचं विवेचन (समुपदेशन) करते.
पू. गोंदवलेकर महाराज सांगत – भगवंताच्या आठव्या अवतारानं सांगितलेल्या गीतेच्या आठव्या अध्यायांतला आठवा श्‍लोक आठवा! म्हणजे विसरू नका.-
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना|
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ, अनुचिंतयन्‌॥
– ‘अभ्यासयोग’ नि ‘अनुचिंतन’ करत गीता जीवनात उतरवण्याचा संकल्प करु या. त्यासाठी स्वतःलाच शुभेच्छा देऊ या.