॥ समुपदेशन गीतेतून ॥ … कर्ता सात्त्विक उच्यते!

0
137

– प्रा. रमेश सप्रे

 

आपले स्वातंत्र्यसेनानी असे ‘सात्त्विक कर्ता’ होते. अनेकांना स्वातंत्र्य पाहता, अनुभवता आलं नाही. पण मृत्युसमयी त्यांच्या चेहर्‍यावर समाधान होतं. जीवनाचं सार्थक झाल्याचा भाव होता. अशांसाठीच तर बाकीबाबांनी (कविवर्य बा. भ. बोरकरांनी) म्हटलंय ना, ‘अशांच्या (दहनभूमीवर), समाधीसाठी नाही चिरा, नाही पणती.’


 

कर्त्याशिवाय कोणतंही कार्य शक्य होत नाही. अगदी आध्यात्मिक दृष्टीनं विचार केला तरी ‘मी कर्ता नाही, भगवंतच कर्ता’ असं म्हणतानाही कर्त्याचा उल्लेख येतोच. असा कर्त्याचा विचारही गीतेत तामस-राजस-सात्त्विक कर्ता असा त्रिविध रीतीनं केला आहे. सात्त्विक कर्ता हा सर्वांत उत्तम, आदर्श असा कर्ता असतो, तो कसा असतो?

मुक्तसंग अनहंवादी धृति उत्साह समान्वितः|
सिद्धिः असिद्धिः निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते॥

अर्थ ः आसक्तिहीन, अहंकारयुक्त भाषा न बोलणारा, धैर्यवान व उत्साही, कार्य पूर्ण झालं किंवा अपूर्ण राहिलं (कार्यात यश मिळालं वा अपयश) तरीही शांत, हर्षशोकादी विकार न पावणारा असा कर्ता सात्त्विक म्हटला जातो.
असे कर्ते अर्थातच कमी असतात पण जे असतात ते खूप कार्य करून समाजाचं कल्याण साधू शकतात. अशा कर्त्याचे गुण नि कार्यशैली याविषयी सहचिंतन करु या.

१. मुक्त संगः – आसक्ती, संग हे सर्व दुःखाचे मूळ आहे असं म्हटलं जातं. एखादी वस्तू, व्यक्ती, अनुभव याबद्दल आपल्या मनात खूप आकर्षण, मोह, आसक्ती असते. सतत मनात त्याची आस लागून राहिलेली असते. पण जर काही भव्यदिव्य कार्य करायचं असेल तर निःसंग, निस्पृह असावं लागतं. स्वतः कृष्ण याचं आदर्श उदाहरण होता. किती निरनिराळ्या प्रकारची कामं त्यानं अगदी बालपणापासून केली. गोकुळातल्या असुर-वधापासून रासलीलेपर्यंतच्या सर्व कृती करताना तो कशातही चिकटून राहिला नाही. ती कामं करताना अगदी त्यात पूर्णपणे बुडून गेला, त्याच्याशी समरस झाला पण त्यावेळीही तो गुंतून पडला नाही. गोकुळ एकदा सोडल्यावर पुन्हा एकदाही तिकडे गेला नाही. आपली दिव्य बासरी त्यानं आयुष्यात पुन्हा कधीही हातात धरली नाही. जणू त्या गोकुळातल्या बाळकृष्णाचं, किशोर कृष्णाचं विसर्जन करूनच तो गोकुळातून बाहेर पडला.
विवेकानंद कलकत्त्यात असूनही क्वचितच आपल्या घरी जायचे. रामकृष्णांच्या दक्षिणेश्‍वरला किंवा नंतर बेलुड मठ इथंच त्यांचं वास्तव्य असे. आपण रामकृष्ण – सारदामातांची मुलं म्हणजेच गुरुबंधू एकमेकातसुद्धा गुंतून पडू नये म्हणून संन्यास घेतल्यावर सर्वांनी काही काळ एकमेकापासून दूर, परस्पर संपर्कात न राहता राहिलं पाहिजे म्हणून सर्व दिशांनी विखरून राहणं पसंत केलं होतं. हे अत्यंत आवश्यक होतं. पुढे केलं गेलेलं, विस्तारत गेलेलं नि आजही प्रभावी असलेलं कार्य शक्य झालं ते अशा मुक्तसंग वृत्तीमुळेच.
अलीकडच्या काळात होऊन गेलेले एक सिद्ध पुरुष ज्ञानेश्‍वरीचा अभ्यास, संशोधन करण्यासाठी एका खेड्यात अनामिक अवस्थेत राहिले. आजुबाजूच्या लोकांशी संबंध तर सोडाच पण एक शब्दही त्या दीड-दोन वर्षांच्या वास्तव्यात बोलले नाहीत. इतकं की कुणाकडे साधा कटाक्षही टाकला नाही. इतरांना ते फार शिष्ट किंवा गर्विष्ठ वाटले. त्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण व्यर्थ. अखेर त्यांचा ज्ञानेश्‍वरीचा एका वेगळ्या दृष्टीनं केलेल्या अभ्यासावरचा प्रबंध सिद्ध झाला. ज्यावेळी पुन्हा आपल्या घरी, शहरात परतायचं ठरलं तेव्हा आसपासच्या सर्व घरात जाऊन सर्वांना नमस्कार केला. आपला परिचय करून दिला. तिथं येण्याचं प्रयोजन म्हणजे कारण सांगितलं. निरोप घेताना सर्वांना म्हणाले, ‘आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद!’ ‘कोणतं सहकार्य?’ असं विचारल्यावर त्या महापुरुषाचं उत्तर होतं, ‘माझ्याकडे गप्पा, उगीच चौकशा न केल्याबद्दल. माझा वेळ न घेतल्याबद्दल. आता तुम्हाला कळलं असेल की तुमच्या एकाही प्रश्‍नाला मी का उत्तर दिलं नाही आणि मी कोणताही संबंध तुमच्याकडे का ठेवला नाही?’
सगळ्या गावकर्‍यांना आश्चर्य वाटलं. पण त्यांना हेही कळालं की महान कार्य पूर्ण करायचं असेल तर कोणाशीही संपर्क – संबंध – संग ठेवता कामा नये. कार्यसिद्धीचा हा एका अर्थानं गुरुमंत्रच आहे. सात्त्विक कर्त्याचं हे मुख्य लक्षण आहे.

२. अनहंवादी – आपण जरा काही काम केलं की त्याची चर्चा करतो. त्याच्याबद्दल उगीच येणार्‍याजाणार्‍याकडे बोलत राहतो. फुशारकी मारतो. हा सर्वसामान्य माणसांचा स्वभाव आहे. पण सात्त्विक व्यक्ती कधीही स्वतःबद्दल गर्वानं, अतिशय अभिमानानं बोलत राहत नाही. आपलं कार्यच बोलेल, आपला खरा परिचय आपण केलेल्या कामातूनच होईल अशी त्याची श्रद्धा असते. असं म्हटलं जातं की जरी आपण स्वतः एकट्यानं एखादं काम पूर्ण केलं तरी नेहमी ‘तुमच्यामुळे हे शक्य झालं’- अशी भाषा वापरली पाहिजे. आजच्या काळात ही प्रभावी कार्यसंस्कृती (वर्क कल्चर) आहे.
देव आणि असुर; राम आणि रावण; कृष्ण आणि कंस, शिशुपाल, जरासंध इ. यांच्यात हाच महत्त्वाचा फरक आहे. राम स्वतःबद्दल, स्वतःच्या पराक्रमाबद्दल विशेष काही बोलतंच नाही. स्वतःचा परिचय करून देतानाही ‘मी एक साधा माणूस आहे. दशरथाचा पुत्र आहे’, असा अत्यंत नम्र भाषेचा वापर करतो. कृष्ण अर्जुनाला याउलट म्हणतो, ‘मला साधा माणूस समजणारे लोक मूर्ख आहेत. माझा जन्म व कर्म हे दिव्य आहे.’ पण असं बोलताना कृष्ण स्वतःबद्दल बोलत नसून आपलं ‘स्वरूप’ सांगत असतो. एरवी कंस, शिशुपाल, नरकासुर अशा बलाढ्य, उन्मत्त आसुरी वृत्तीच्या राजांचा संहार करूनही स्वतःच्या पराक्रमाबद्दल सांगत बसत नाही. स्वतःची प्रौढी न मिरवणं, आपल्या कार्याचं श्रेय इतरांना देणं यातच सात्त्विक कर्त्याचं रहस्य दडलेलं असतं. तो अनहंवादी असतो. सामान्य कर्तृत्वाची माणसं अहंवादी असतात.
इंग्रजीतले दोन शब्द या संदर्भात समुपदेशनाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. तसे स्वार्थी, स्वतःचाच विचार करणारे बहुसंख्य असतात. आपल्या अहंकाराला कुरवाळणं हा त्यांचा छंद असतो. अशांना ‘इगोइस्ट’ म्हणजे अहंकारी, स्वार्थ साधणारे असं म्हणतात. तर स्वतःचीच स्तुती करण्याला, आत्मप्रौढी मिरवणार्‍याला ‘इगोटिस्ट’ म्हणतात. सात्त्विक कर्ता या दोन्ही प्रवृत्ती कटाक्षानं टाळतो. आपण निदान अहंवादी (इगोटिस्ट) होणं तरी टाळलं पाहिजे.

३. धृतिउत्साह समन्वितः – परस्पर पूरक असे हे दोन गुण आहेत – धृती म्हणजे धैर्य आणि उत्साह म्हणजे कार्य करण्याची उमेद. सात्त्विक कर्त्याच्या अंगी हे दोन्ही विपुल प्रमाणात असतात. ‘धैर्याचा महामेरू’ म्हणजे एका पर्वताप्रमाणे धैर्य असलेला- असं शिवाजी महाराजांचं वर्णन संत रामदास करतात त्याचा अर्थ हाच आहे. अशीच व्यक्ती अखेरपर्यंत उत्साही, आशावादी राहते. आपल्याबरोबर, आपल्यासाठी काम करणार्‍यांचा उत्साह कायम राखण्यात यशस्वी होते. साध्या बावळ्या मावळ्यांतून शूर, स्वामिनिष्ठ स्वातंत्र्यवीर निर्माण करणं शिवरायांना शक्य झालं ते त्यांच्या अंगी धैर्य व उत्साहामुळेच. अनेकदा युद्धात माघार घ्यावी लागली तरी तो शिवरायांच्या युद्धनीतीचाच एक भाग होता हे नंतर लोकांच्या लक्षात यायचं. त्यांच्या गनिमी काव्याचा गाभाही हाच होता. मुठभर सैनिकांच्या मदतीनं प्रचंड शत्रुसेनेचा पराभव याच गुणांमुळे शिवराय करू शकले.
सात्त्विक कर्ता कधीही खचत नाही. एकवेळ थकतो पण उदास, हताश होत नाही. अनेकदा अपयश मिळतं. पण त्या अपयशाची पायरी बनवून तो यशाचं शिखर गाठू शकतो. याच अर्थानं ‘अपयश ही भावी यशाची पायरी आहे’ (फेल्युअर् इज अ स्टेपिंग स्टोन टु सक्सेस) असं म्हटलं जातं. सर्व क्षेत्रातल्या महामानवांच्या जीवनाचं हेच महत्त्वाचं सूत्र असतं.
वनस्पतिशास्त्रज्ञ ल्यूथर बर्‌बँक्सचं उदाहरण या बाबतीत अप्रतिम आहे. तो एका अद्भुत रोपट्याची निर्मिती करत होता ज्याला जमीनीत बटाटे लागतील नि वरती टोमॅटो. मानवजातीला हे संशोधन वरदायी ठरणार होतं. शेकडो वेळा त्यानं प्रयोग केले पण अपयश आलं, त्यानं आपलं धैर्य सोडलं नाही अन् या कामातला त्याचा उत्साह कधी कमी झाला नाही. अखेर जेव्हा यश मिळालं तेव्हा तो हुरळून गेला नाही. शांतपणे त्यानं जगासमोर आपला यशस्वी प्रयोग सादर केला. आपल्या या स्वप्नातल्या पण आता प्रत्यक्षात साकारलेल्या आश्चर्यकारक रोपट्याला त्यानं नाव दिलं होतं- ‘पोमॅटो प्लांट’. ज्यावेळी त्याची मुलाखत घ्यायला वार्ताहर आले आणि आग्रह करू लागले की ‘या अभूतपूर्व रोपाबरोबर तुमचं छायाचित्र घेऊ या.’ यावर शांतपणे ल्यूथर म्हणाला, ‘अवश्य! छायाचित्र (फोटो) घेऊ या पण या पोमॅटो रोपट्याबरोबर नको.’ असं म्हणून तो वार्ताहरांना आपल्या प्रयोगशाळेच्या गच्चीवर (टेरेस)वर घेऊन गेला. तिथं शेकडो कुंड्या होत्या. उभ्या, आडव्या, फुटलेल्या कुंड्या. अनेकात अर्धवट अवस्थेतली रोपं होती, अनेक कुंड्यांमधली रोपं सुकून गेली होती. त्यांच्यामध्ये उभा राहून आपलं छायाचित्र घ्यायला सांगितलं. विचारल्यावर शांतपणे ल्यूथर बर्‌बँक्स म्हणाला, ‘इतक्या अयशस्वी प्रयोगांनी मला यशाकडे पोचवलं. म्हणून या कुंड्या माझ्या खर्‍या शिक्षक नि प्रेरक आहेत. या त्या यशस्वी रोपट्यापेक्षा मोलाच्या आहेत.’
हा खरा सात्त्विक कर्ता. मादाम मेरी क्युरीनं रेडियमचा शोध लावताना असंच दिव्य केलं होतं. ती ज्या द्रव्यावर प्रयोग करत होती त्यामुळे कर्करोगासारखा भयंकर रोग होण्याची शक्यता होती. पण मेरीनं धैर्य व उत्साह एकत्र करून जिद्दीनं, चिकाटीनं आपलं मनोबल उंच राखत अंती यश हे मिळवलंच. तिला मिळालेलं नोबेल पारितोषिक ही या खडतर तपश्चर्येची पावती होती. खरी महत्त्वाची होती ती तपश्चर्या – साधना!
आजही पाय नसताना हिमालयाचा उत्तुंग शिखर गाठणारी मंडळी, अपंग असूनही मॅराथॉनसारखी शर्यत जिंकणारे लोक (आता यांना ‘अपंग’ नाही म्हणत तर ‘दिव्यांग’ म्हणतात.) अंगात दारूण असे असाध्य रोग असूनही सतत कार्यरत राहण्याचा संदेश स्वतःच्या कर्तृत्वातून, जीवनातून देणारे स्टीव्ह जॉब्ज किंवा रँडी पॉश यासारखी अलौकिक माणसं ही खरी ‘सात्त्विक कर्ता’ या वर्गात बसणारी असतात.
भगतसिंग, लो. टिळक यांच्यासारख्या व्यक्तींची वृत्ती अशीच होती. ‘शेवटच्या श्‍वासापर्यंत आम्ही स्वातंत्र्यासाठी (‘आजादी’साठी हा भगतसिंगचा प्राणशब्द!) संघर्ष करत राहू. जगलो तर स्वातंत्र्याचा श्‍वास घेऊ नाहीतर स्वातंत्र्याची स्वप्नं पाहत आनंदानं जीवन संपवू’. आपले स्वातंत्र्यसेनानी असे ‘सात्त्विक कर्ता’ होते. अनेकांना स्वातंत्र्य पाहता, अनुभवता आलं नाही. पण मृत्युसमयी त्यांच्या चेहर्‍यावर समाधान होतं. जीवनाचं सार्थक झाल्याचा भाव होता. अशांसाठीच तर बाकीबाबांनी (कविवर्य बा. भ. बोरकरांनी) म्हटलंय ना, ‘अशांच्या (दहनभूमीवर), समाधीसाठी नाही चिरा, नाही पणती.’ पण अशा सात्त्विक कर्त्यांना उद्देशूनच त्यांनी असंही म्हटलंय ना-
दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती.
अशा मुक्तसंग, अनहंवादी (निरहंकारी), धैर्य उत्साह यांनी युक्त असलेल्या महापुरुषांना नुसतं अभिवादन नव्हे तर त्यांचं अनुसरण करण्याचा संकल्प करू या.