॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ मनःशांती सुविचार चिंतनातून…

0
670

– प्रा. रमेश सप्रे

खरी संपत्ती म्हणजे मनःशांती. मनाची अस्वस्थता, बेचैनी, असमाधान ही खरी आपत्ती. रामनाम घ्यायचं, रामाला नमस्कार करायचा याचा अर्थ स्वतःला जाणीव करून द्यायची- सतत जागृत रहायचं. कशाबद्दल? तर आपल्या हक्काची मनःशांती मिळवण्याची जाणीव ठेवायची नि याचं सतत स्मरण स्वतःला करून द्यायचं- यासाठी उपयोगी पडतं सुविचार चिंतन.

संस्कृत भाषेतील वाङ्‌मयाला अनेक पैलू आहेत. सुभाषित किंवा सुविचार व्यक्त करणारे श्‍लोक हे त्यापैकी एक वैशिष्ट्य. दोन-चार ओळीत एक शाश्‍वत महान् विचार व्यक्त केलेला असतो. या विचारात जीवन आनंदात किंवा सार्थ (अर्थपूर्ण) जगण्यासाठी संदेश असतो. उपदेश असतो.
कधी देवतांचे ध्यानमंत्रसुद्धा मनःशांतीसाठी मार्गदर्शन करून जातात.
हा विष्णुमंत्रच पहा ना.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् |
विश्‍वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् |
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् |
वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥
या श्‍लोकातील प्रत्येक शब्द (पद) खूप अर्थपूर्ण आहे. याला ‘पदार्थ’ असं म्हणतात. एरवी पदार्थ म्हणजे वस्तू. पण पद, त्याचा अर्थ नि त्या अर्थावर चिंतन याला ‘पदार्थ चिंतन’ असं म्हणतात. या श्‍लोकातील काही पदांवर मनःशांतीच्या अंगानं सहचिंतन करु या.
* शांताकारं भुजगशयनं – म्हणजे शांतीचा आकार किंवा साकार शांती, मूर्तिमंत शांती, विष्णू हा देव शांत, प्रसन्न, सात्त्विक मानला जातो. या संदर्भात एक उद्बोधक प्रसंग आहे.
एकदा ऋषीतले प्रमुख भृगू ऋषींच्या मनात एक कल्पना आली. ब्रह्मदेव – विष्णू नि शंकर या तिन्ही देवात श्रेष्ठ देव कोण हे प्रत्यक्ष प्रयोग करून पहावं, जो सर्वांत शांत-धैर्यवान-क्षमाशील तो देव सर्वश्रेष्ठ. कशी परीक्षा घ्यावी याचा विचार करताना एक भन्नाट कल्पना त्यांना सुचली. त्रिदेवांपैकी प्रत्येकाला लाथ मारायची. जो कोणी ती शांतपणे, प्रतिकार न करता स्वीकारील तो श्रेष्ठ. प्रथम भृगुऋषी सत्यलोकात गेले. ब्रह्मदेवाला लाथ मारण्यासाठी पाय उचलला तेव्हा ब्रह्मदेवानं ते करीत असलेली गोष्ट कशी चुकीची, पापमय आहे हे सांगणारा युक्तिवाद केला. साहजिकच त्याचा लाथेला विरोध होता. नंतर कैलासावर जाऊन शिवशंकरावर लत्ताप्रहार करण्यासाठी पाय उचलला मात्र शंकरानं आपला त्रिशूल उचलून एकप्रकारे ऋषींना इशाराच दिला. ‘हा कसला राग येणारा देव’ असा विचार करून भृगुऋषी सागरतळाशी शेषाच्या शय्येवर शांतपणे पहुडलेल्या नारायण विष्णूला लाथ मारण्यासाठी पाय उचलला. विष्णूभगवानांनी आपणहून आपली छाती पुढे केली. ऋषींनी लाथ मारल्यावर तिचा आदरपूर्वक स्वीकार केला नि भृगुऋषींचा पाय हातात घेऊन हळुवारपणे दाबत त्यांना विचारलं, ‘ऋषीवर, आपल्या पायाला लागलं तर नाही ना? कारण माझी छाती पाषाणासारखी कठोर आहे.’ भृगुंना आपल्या कृतीची लाज वाटली. त्यांनी क्षमाप्रार्थना करून म्हटलं, ‘विष्णुदेवा, तूच सर्वश्रेष्ठ देव आहेस.’ यावर विष्णुदेव म्हणाले, ‘यापुढे आपल्या लाथेमुळे माझ्या छातीवर उठलेली ही खूण मी पवित्र मानून सतत जपून ठेवीन.’ हीच ती प्रसिद्ध ‘श्रीवत्साची’ खूण जी भगवान विष्णू कौस्तुभ मणी नि वैजयंतीमालेपेक्षा शुभमंगल मानतात. ही खरी शांती.
अशा मूर्तिमंत शांतीमुळेच भगवान विष्णू हे ‘भुजगशयनं’ म्हणजे प्रत्यक्ष नागाच्या शय्येवर झोपूनही शांत राहू शकतात.
* पद्मनाभं – म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळ उगवलंय तो विष्णू. नाभी हा आपल्या देहाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नाभीपासून नाकापर्यंत आपली वाणी नि तिचा आधार असलेला श्‍वासोच्छ्वास सुरू असतो. सतत ‘ना भी .. नाभी’ म्हणजे भिऊ नकोस, भिऊ नकोस असं स्फुरण नाभीतून सुरु असतं. मनःशांतीला आवश्यक असलेला महत्त्वाचा घटक म्हणजे भयमुक्ती. आईच्या पोटात गर्भावस्थेत असलेल्या जीवाचं पोषण, रक्षण या नाभीतूनच घडत असतं. किती शांत, निश्चिंत अवस्थेत हा गर्भ गर्भाशयात वाढत असतो. आईच्या पोटात असताना जणू त्याची मूक प्रार्थना – भावना – असते. ‘देवा हे विश्‍वचि तुझे पोट | धरु कसे मी बोट?’ म्हणजे सारं विश्‍वच जर भगवंताचं, सद्गुरु माउलीचं पोट असेल तर त्याचं बोट बाहेरून कसं धरता येईल; आतून धरणं अशक्यच. मोठी निश्चिंत, चिंता-भयमुक्त मनोवृत्ती आहे ही! पद्मनाभ स्वतः शांताकारं असतोच पण त्याच्याशी नाळ (नाम) जोडलेल्यांनाही तो शांती प्रदान करतो.
* सुरेशं – साधा अर्थ आहे सर्व देवांचा ईश्‍वर किंवा स्वामी. पण सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस. ‘असुशुः रमन्ते’ त्यांना असुर म्हणतात. ‘असुः’ शब्दाचा अर्थ आहे प्राण म्हणजे प्राण पोषण, देहरक्षण, इंद्रिय भोग यांच्यातच जे रमलेले असतात ते प्राणी. माणूस हा केवळ प्राणांचं – देहाचं रक्षण करणारा नसावा. त्यानं देहापेक्षा देव नि देवापेक्षा जीवनातलं ध्येय महत्त्वाचं मानावं. शांततृप्त समाधानी जीवन जगावं. अशांना ‘सुर’ म्हणजे देव असं म्हणतात. शांत असण्यासाठी असं ‘सुर’ असणं महत्त्वाचं असतं; अन् सुरांचा ईश (सुरेश) असा विष्णू तर परमशांत, नित्य शांत असतो.
* विश्‍वाधारं – परमेश्‍वर सार्‍या विश्‍वाचा आधार असतो. पण आपल्यापैकी प्रत्येकाचं एक छोटं विश्‍व असतंच की! कुटुंब, व्यवसाय, समाजातील इतर व्यक्ती, संस्था यांच्याशी असलेले आपले संबंध, आपले अधिकार – आपली कर्तव्यं यातून साकारतं आपलं स्वतःचं विश्‍व. या विश्‍वाला आधारभूत असं वर्तन आपलं असलं पाहिजे. इतरांकडून सेवा करून घेण्यापेक्षा त्यांची सेवा करणं, क्षमतेनुसार इतरांना साह्य करणं, आपल्या अस्तित्वाचा लोकांना आधार वाटणं या गोष्टीतून मनःशांतीचा मार्ग जातो. मुख्य म्हणजे हे करणं आपल्याला सहज जमू शकतं.
या संदर्भात एक अगदी साधं, पण आजच्या काळात अपवादात्मक उदाहरण सांगण्यासारखं आहे. एका उद्योगाचा (कारखान्याचा) संचालक स्वतःच्या अगदी जरुरीच्या कामासाठी एक-दोन रजा घेणार असतो. रजेचं कारण अगदी वैयक्तिक, घरगुती असतं. तरीही काही कामगार येऊन त्याला ‘रजा घेऊ नका’ म्हणून विनंती करायला येतात. कारण काय तर त्याच्या त्यांच्यामध्ये (ऑफिसमध्ये, कामगारांमध्ये) असण्यानंच त्यांना मोठा आधार वाटतो. तो एक दिवस नसेल तर त्यांना पोरकं, अनाथ वाटतं. – हा काय प्रकार आहे? एका अर्थी हा अधिकारी आपल्या कार्यविश्‍वाचा ‘बॉस’ नाही तर ‘आधार’ आहे. ‘विश्‍वाधारं’ म्हणताना फार अंतिम, सर्वोच्च अशा परमेश्‍वराचाच विचार करण्याची आवश्यकता नाही. एखादा सामान्य शिक्षक आपल्या विद्यार्थीजगताचा आधार बनू शकतो. एखादा साधा, प्रामाणिक नेता आपल्या अनुयायांचा भावना-विचार-कृती-निर्णय-संकल्प अशा सर्व गोष्टींचा आधार (मूळ आधार – मूलाधार) बनू शकतो. तो स्वतः शांत राहून आपल्या सहवासातील इतरांना शांतीचा अनुभव देऊ शकतो. फार मोठी गोष्ट आहे ही.
* गगनसदृशं – आकाशामुळे संपूर्ण विश्‍वाचं अस्तित्व, विकास, हालचाली सारं शक्य होतं. इतकं असूनही आकाशाची स्वतःची काही अपेक्षा नाही, आग्रह नाही, आकांक्षा नाही. ते फक्त असतंच. इकडून तिकडे वारा वाहतो पण आकाश नाही हलत-चळत-ढळत. मनःशांतीचा हा महत्त्वाचा घटक आहे. आपण आपल्या इच्छा, विचार, निर्णय इतरांवर लादू लागलो की आपण पृथ्वी व पाण्यासारखे बनतो. त्यांचा प्रत्यक्ष भलाबुरा परिणाम इतरांवर होतो. आकाश मात्र अलिप्त – निर्लिप्त असतं. निःसंग, निर्मोही (मोह नसलेलं) असतं. कोणतीही स्मृती जपून ठेवत नाही. मनःशांतीसाठी हे आवश्यक असतं.
* कमलनयनं – पूर्वीच्या ग्रंथात ‘कमळ’ या प्रतीकाचा अनेक ठिकाणी उपयोग केलेला असे. कमलनेत्र, कमलहस्त, चरणकमल .. अशा वर्णनातून एक महत्त्वाची गोष्ट सुचवली जात असे. कमळ जसं पाण्यात असून, चिखलात असूनही ओलं होतं, दुर्गंधी किंवा मलीन होत नाही. तसे आपले डोळे – कान – हातपाय इ. हवेत. डोळे दृश्याला, कान शब्दाला, हात एखाद्या विशिष्ट कृतीला, पाय एका विशेष स्थळाला चिकटून राहिले की त्यातून स्मृती, चिंता, संग, आसक्ची इ. गोष्टी निर्माण होतात. ज्यातून निर्माण होणारा लोभ, मोह, क्रोध हे मनःशांतीचे मारेकरीच आहेत. सर्वांच्यात असून, त्यांच्यासारखेच अनुभव घेऊन, त्यांच्यासाठी काम करत अलिप्त आनंदी राहू शकतो. आपली शांती ढळत नाही.
अश्याप्रकारे एखादा देवाचा स्तुतिमंत्र – ध्यानमंत्र आपल्याला मनःशांतीचं रहस्य शिकवून जातो.
मनःशांतीसाठी, आनंदप्राप्तीसाठी बाहेरच्या कशाचीही गरज नसते. कोणतीही व्यक्ती, वस्तू, इतर गोष्टी उदा. स्थान, वेळ यावर मनःशांती अवलंबून नसते. ती आतूनच येते. शांत होण्यासाठी, आनंदात राहण्यासाठी आवश्यक असलेलं सारं काही आपल्या आत असतं. बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहणं म्हणजे शुद्ध आनंदाचं क्षणिक सुखात रुपांतर करणं. सुखाला जोडून दुःख येतं. कसं येतं, केव्हा येतं हे आपल्याला कळतही नाही – बाहेरची परिस्थिती बदलली की झालं सुखाचं दुःखांत रुपांतर. आनंदात राहणं आपल्या आतूनच साध्य करायचं असल्यामुळे आपण बाह्य गोष्टींवर आनंदासाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. या परिस्थितीची म्हणजे निरालंब (कशावरही अवलंबून नसलेल्या) आनंदाची कल्पना देणारा एक सोपा श्‍लोक आहे.
करारविंदेन पदारविंदं | मुखारविंदे विनिवेशयंतम् |
वटस्य पत्रस्य पुटे शयानं | बालं मुकुंदं मनसा स्मरामि ॥
म्हणजे आपल्या पायाचा अंगठा आपल्याच दोन्ही हातात धरून तो तोंडात घालून आनंदात चोखत असलेल्या वडाच्या (पिंपळाच्या) पानावर शांतपणे पहुडलेल्या बालमुकुंदाचं स्मरण!
महाजलप्रलयानंतर सृष्टीचा सर्व भाग पाण्यात बुडाल्यानंतर एकमेव जिवंत असलेल्या मार्कंडेय ऋषींना अहंकार झाला. आपल्याशिवाय कोणीही जीवित नाही तेव्हा नवसृष्टीची निर्मिती आपल्यालाच करावी लागणार या कल्पनेनं मार्कंडेय ऋषी सुखावले. पण इतक्यात त्यांना दूरवरून त्या पुरात वाहत आलेलं एक वडाचं विशाल पान दिसलं. बारीक दृष्टीनं पाहिल्यावर मार्कंडेय ऋषींना त्या पानावर हालचाल दिसली. जवळ आल्यावर त्यांना दिसलं की बालमुकुंद (बाळकृष्ण) आरामात झोपून आपला आपणच आनंदात क्रीडा करतोय.
खरंच आनंद-शांती-समाधान यांचा अनुभव घेण्यासाठी कश्शाची म्हणजे कश्शाचीही गरज नसते. आपण उगीचच एवढी साधनं, एवढा पैसा, एवढ्या भोगवस्तू जमवण्यात आयुष्य घालवतो. कबीरासारखे संत जेव्हा म्हणतात- ‘एक लंगोटी और दो रोटी’ बस! तेव्हा त्यांना गरीब, दरिद्री, किमान गरजा भागवणार्‍या जीवनशैलीचा आदर्श आपल्यासमोर ठेवायचा नसतो. तर अगदी थोड्या गोष्टीतही खूप समाधान, शांती मिळू शकते हे त्यांना सांगायचं असतं.
रामरक्षेसारख्या नित्यपाठातील स्तोत्रात म्हटलंय –
आपदां अपहर्तारं दातारं सर्व संपदाम् |
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥
म्हणजे आपत्ती (आपदा) दूर करून संपत्ती (संपदा) प्राप्त करून घेण्यासाठी सतत रामनाम घेत रामाला पुनःपुन्हा नमस्कार!
इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची – ती म्हणजे खरी संपत्ती म्हणजे मनःशांती. मनाची अस्वस्थता, बेचैनी, असमाधान ही खरी आपत्ती. रामनाम घ्यायचं, रामाला नमस्कार करायचा याचा अर्थ स्वतःला जाणीव करून द्यायची- सतत जागृत रहायचं.
कशाबद्दल? तर आपल्या हक्काची मनःशांती मिळवण्याची जाणीव ठेवायची नि याचं सतत स्मरण स्वतःला करून द्यायचं- यासाठी उपयोगी पडतं सुविचार चिंतन. बघा विचार करून.