॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ शोध शांतीचा…

0
116

– प्रा. रमेश सप्रे

मनःशांतीचे झरेही आपल्या आत असतात नि सरोवरसुद्धा. उपासना करून, श्रवण – वाचन – मनन – चिंतन करून, सत्संगतीच्या प्रभावामुळे आपल्या प्रतिक्रिया सुधारतात. असं म्हणतात – ‘क्रियेतून माणसाचं व्यक्तिमत्त्व व्यक्त होतं पण प्रतिक्रियेतून त्याचं चारित्र्य (स्वभाव) दिसून येतं.

पहाटेची वेळ. झुंजुमुंजु झालं होतं. संथ वाहणार्‍या नदीचा काठ. झाडाखाली राहणारा साधु स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याच्या तयारीत होता. शेजारी एक झोपडी. दोघंच राहात होते- एक शिकारी व त्याचा लहान मुलगा. झाडावर घरटं. त्यात एक घार आपल्या पिलासह उठण्याच्या तयारीत. झाडाच्या जवळच एक बीळ. त्यात आपल्या पिलासह राहणारी नागीण. सारी वडील माणसं नवीन दिवसाचं स्वागत करून आपापल्या कामाला जाण्यासाठी तयार. त्यांची पिलंही त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट करतात. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणारी पालक मंडळी त्यांच्या मनात भीती निर्माण करून बाहेर न येण्याबद्दल सांगतात. सगळीकडे एकाच प्रकारचा संवाद-
झोपडीत शिकारी मुलाला सांगतोय, ‘झोपडीच्या बाहेर जाऊ नकोस.’ मुलाचा प्रश्‍न, ‘का?’ ‘बाहेर शत्रू असतो.’ यावर मुलगा, ‘बाबा, शत्रू म्हणजे कोण?’
बाबा- ‘जो मित्र नाही तो शत्रू!’ मुलगा, ‘पण मित्र म्हणजे कोण?’ यावर बाबांकडे उत्तर नाही. त्याला दटावून सांगतात, ‘बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. माझ्या लाडक्यासाठी मी लवकरच लुसलुशीत ताजं मांस घेऊन परतेन हं!’
तिकडे घरट्यात घार – ‘पिला, आतच रहा हं. बाहेर नको जाऊस’.
घारीचं पिलू – ‘पण का, आई?’
घार – ‘अरे, बाहेर शत्रू असतो.’
पिलू – ‘शत्रू म्हणजे काय ग?’
घार – ‘मित्र नाही तो शत्रू!’
पिलू – ‘पण, आई, मित्र म्हणजे काय ग?’
घार – ‘चूप. किती प्रश्‍न विचारतोस. बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. येताना मी कोवळं कोवळं काहीतरी खायला आणते हं!’
शेजारच्या बिळात नागीण व तिचं पिलू यांच्यात अशीच बोलाचाली झाली. बिळाबाहेर जायचं नाही अशी आज्ञा पिलाला देऊन नागीण बाहेर पडली.
उगवणार्‍या सूर्याला अर्घ्य देऊन तो साधू छातीइतक्या नदीच्या प्रवाहात उभा होता. झालं काय, सगळी वडील मंडळी बाहेर पडली अन् बच्चेमंडळी आत राहिली. पण त्यांना कुतुहल होतंच की शत्रू म्हणजे कोण? तो कसा असतो… दिसतो हे पाहण्याचं. बाबा दृष्टिआड झालेले पाहून त्या शिकार्‍याचा छोटा मुलगा झोपडीबाहेर पडला. त्याचप्रमाणे घारीचं पिलू घरट्यातून निघून झाडाच्या फांदीवर आलं. नागिणीचं इवलं इवलं पिलूसुद्धा बिळाबाहेर आलं. सर्वांची एकच इच्छा – शत्रू कसा दिसतो हे पाहणं!
तिकडे काय घडलं ते पहा, शिकार्‍याला खुरडत खुरडत आलेलं घारीचं पिल्लू दिसलं. क्षणात बाण सोडून त्यानं त्या पिलाचा वेध घेतला. मरून खाली पडलेल्या पिलाला घेऊन झोपडीकडे परतताना आनंदात म्हणत होता, ‘आज घराशेजारीच कोवळं लुसलुशीत मांस मिळालं. पोराला शिजवून प्रेमानं खायला घालू या.’
झोपडीजवळ पोचल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. मुलगा मरून पडला होता. त्याचं अंग काळंनिळं पडलं होतं. नागिणीनं दंश केला होता ना? अत्यंत आनंदात ती बिळाकडे परतली कारण या शिकार्‍यानं गेल्या वर्षी तिच्या पिलाला ठेचून मारलं होतं. बिळाकडे पोहोचून आत जाऊन पाहते तो पिलाचा पत्ता नाही. वेड्यासारखी इकडे तिकडे शोधते पण पिल्लू काही दिसत नाही. कसं दिसणार? कारण घारीनं ते बिळाबाहेर शत्रू कसा असतो हे पाहण्यासाठी आलं असताना झडप घालून चोचीनं उचललं होतं त्याला. केव्हा एकदा हे कोवळं कोवळं पिल्लू आपल्या पिल्लाला देतेय असं झालं होतं तिला. घरट्यात आपलं पिलू नाही हे पाहून ती घार झाडावर, खाली जमीनीवर शोधू लागली पण त्या पिलाला मारून शिकारी झोपडीकडे पोचलासुद्धा होता.
शिकारी – घार – नागीण या सर्वांची पोरं मेली होती किंवा नाहीशी झाली होती. पण त्यांना मारणारा शत्रू झोेपडी – बीळ -घरटं यांच्या बाहेर नव्हता. तर ‘शत्रू बाहेर असतो’- म्हणणार्‍यांच्या आतच होता. मनात होता.
विशेष म्हणजे हे सारं नाट्य शेजारी घडत असताना तो साधू मात्र अजूनही अर्घ्य देऊन सूर्यनारायणाला प्रार्थना करतच होता- ‘जगात सर्वत्र प्रेम नांदू दे. सारी मानवजात शांतीचा अनुभव घेऊ दे!’
संपली रुपक कथा. लेखत संत प्रवृत्तीचे वि. स. खांडेकर.
मनःशांतीसाठी अप्रतिम, अमोघ मार्गदर्शन आहे या कथेत-
* ही कथा सांगून निरनिराळ्या वयोगटांना, शिक्षणाच्या निरनिराळ्या स्तरावर शिकणार्‍या मुलांना प्रश्‍न विचारला, ‘या कथेत चुकलं कुणाचं?’
बालवर्गातल्या भाबड्या, निरागस मुलांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं- मुलांचं चुकलं. त्यांनी आपापल्या वडील मंडळींचं ऐकलं असतं, आतच राहिले असते तर त्यांच्या जिवाचं बरंवाईट झालं नसतं.
* जरा माध्यमिक स्तरावरच्या मुलांचं उत्तर वेगळं होतं. पालक मंडळींचं चुकलं. त्यांनी आपल्या पिलासाठी दुसर्‍याच्या पिलाला का मारलं?
* त्याहून वरच्या स्तरावरील मुलांनी विचार करून सांगितलं –
खरं चुकलं त्या साधूचं. जगात एवढी हिंसा, अत्याचार, अन्याय माजलेले असताना शांती-प्रेम-करुणा यासाठी नुसती प्रार्थना करून काय उपयोग? आपल्या आत्मशक्तीचा उपयोग करून त्यानं सर्वांना योग्य मार्ग दाखवायला हवा. त्यांचं शिक्षण करायला हवं. – निदान शिकार्‍याला तरी शिकवता येईल की दुसर्‍या जिवाला मारून आपल्या पोराचं पोषण करणं योग्य नाही. आहाराच्या सवयीसुद्धा बदलता येतात.
यावरून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे ती ही की-
* शत्रू किंवा शत्रूत्व हे बाहेर, दुसर्‍याच्यात नसून ते आत आपल्या स्वतःमध्ये असतं. त्याचप्रमाणे –
* हिंसेमधून शांती निर्माण होत नाही. अधिक हिंसाच निर्माण होते. हिंसेला उत्तर अहिंसाच आहे. युद्धाला उत्तर युद्ध नसून शांती (पण पराभूताची नव्हे!) हेच आहे. जसा अंधारावर उतारा प्रकाश आहे, दुःखावर मात सुखच करू शकतं. युद्ध नाहीसं करायचं असेल तर त्यावर बुद्ध हाच एकमेव उपाय आहे.
बुद्धाचा एक उद्बोधक लीलाप्रसंग सांगण्यासारखा आहे.
बुद्ध झाल्यावर म्हणजे दुःखावर उत्तर सापडल्यावर, ज्ञानाचा प्रकाश (बोध) दिसल्यावर त्याचं वितरण सर्वदूर करण्याचा संकल्प त्यानं केला. अनेक राजे, सम्राट, श्रीमंत, सत्ताधीश बुद्धाचे – बुद्धतत्त्वांचे अनुयायी बनले. त्याचप्रमाणे अनेक निंदक, टिकाकार, विरोधकही निर्माण झाले. बुद्ध मात्र सर्व परिस्थितीत शांतप्रशांत असायचा. त्याला क्रोध, लोभ, मोह, काम, दंभ, मद अशा आतल्या शत्रूंचा स्पर्शही झाला नव्हता.
एकदा एका गावात मुक्काम करून दुसरीकडे जात असताना वाटेवर त्याला एक निंदक भेटला. तो बुद्धाला अर्वाच्य, अश्‍लील शिव्या देत होता. बुद्धाच्या बरोबर असलेल्या शिष्यांना त्याचा प्रचंड राग आला. ते त्याला मारायला धावले. पण बुद्धानं सर्वांना थोपवलं. दुसर्‍या गावी पोचल्यावर बुद्ध त्या शिव्यांचा वर्षाव करणार्‍या व्यक्तीला शांतपणे म्हणाला- ‘हे बघ, भल्या माणसा, हे मला वाटेत दिलेलं गुलाबाचं फूल मी प्रेमानं तुला देतो ते तू घे.’ ‘मला नको ते!’ तो माणूस रागानं म्हणाला.
यावर अधिक शांतपणे बुद्ध म्हणाला, ‘मी तुला हे फूल दिलं पण तू घेतलं नाहीस. मग ते कुणाकडे राहिलं?’ ‘अर्थाच तुमच्याकडेच’. या त्याच्या बोलण्यावर मंद हसत बुद्ध म्हणाला, ‘तशाच तू मला ज्या शिव्या दिल्यास त्या मी घेतल्याच नाहीत. मग सांग त्या कुणाकडे राहिल्या?’ त्यावर त्या माणसाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की आपल्या सार्‍या शिव्या आपल्याकडेच राहिल्या. त्या देऊन काहीही उपयोग झाला नाही.’
तो तसं म्हणाला पण त्या शिव्यांचा त्याला स्वतःलाच खूप उपयोग झाला. या निमित्तानं त्याला बुद्धानं मार्मिक बोध केला होता. त्याला उपरती झाली. त्यानं पश्चात्तापानं बुद्धाचे पाय धरले व त्याचं शिष्यत्व पत्करलं.
मनःशांतीसाठी या साध्या प्रसंगातून खूप मौलिक बोध होतो.
* मी ठरवलं की माझा कोणी अपमान करुच शकणार नाही तर खरंच माझा अपमान कोणीही करू शकणार नाही. अपमानाच्या जाणीवेमुळे ढळणारी मनःशांती कायम राहील.
* कोणी मला दुखवण्याच्या उद्देशानं आला अन् मी त्याला व मुख्य म्हणजे स्वतःला सांगितलं की त्यानं काहीही केलं तरी मनानं मी दुखावलो जाणार नाही. खरंच आहे. मीच दुसर्‍याच्या बोलण्यानं, कृतीनं स्वतःला दुखवतो. यामुळे अर्थातच माझी मनःशांती भंग पावते.
* कोणी माझ्यावर रागवला किंवा मला राग येण्यासारखे शब्द वा कर्म त्यानं केलं तरी मी ठरवलं तर न रागवता शांत राहू शकतो.
* क्रिया बर्‍याच वेळी आपल्या हातात नसते. दुसर्‍याच्या अनेक क्रिया अचानक माझ्यावर येऊन आदळतात. यापैकी काही क्रिया चांगल्या असतात, तर बर्‍याच क्रिया या वाईट, माझ्याविरुद्ध असतात. तरीही प्रयत्नपूर्वक मी माझ्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. ‘अरे’ला ‘कारे’ किंवा अपशब्दाला अपशब्द या स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत. प्रकृतीच्या पातळीवर पशुपक्ष्यांसारखं जीवन जगणार्‍याला त्या एकवेळ शोभून (?) दिसतील. पण विचारी वृत्तीचं व्यक्ती ‘अरे’ ला ‘काय हो’ म्हणू शकते. दुसर्‍याच्या शिवीला ओवी हे प्रत्युत्तर देते. ही गोष्ट अर्थातच वाटते तेवढी सोपी नाही. त्यासाठी हवेत सायास – प्रयास नि अभ्यास!
थोडक्यात मनःशांतीचे झरेही आपल्या आत असतात नि सरोवरसुद्धा. उपासना करून, श्रवण – वाचन – मनन – चिंतन करून, सत्संगतीच्या प्रभावामुळे आपल्या प्रतिक्रिया सुधारतात. असं म्हणतात – ‘क्रियेतून माणसाचं व्यक्तिमत्त्व व्यक्त होतं पण प्रतिक्रियेतून त्याचं चारित्र्य (स्वभाव) दिसून येतं.
बाहेरून आत काय जातं यापेक्षा आतून बाहेर काय जातं हे महत्त्वाचं असतं. जे दिसतं त्यापेक्षा जे अदृश्य (म्हणजे गुण, मूल्यं, तत्त्वं इ.) दृश्याचा आधार असतं. ते अधिक मोलाचं असतं. – बघा विचार करून अन् हो पटलं तर त्याप्रमाणे आचार मात्र अवश्य करा हं!