॥ बुद्धीने सर्वही होते ॥ आस्तिक … नास्तिक

0
380
  • प्रा. रमेश सप्रे

उगीचच उथळ विचार करून इतरांविषयी मतं बनवून त्यावरून आपलीच मनं कलुषित नि बुद्धी प्रदूषित करून घेऊन जगणं हे सर्वांच्याच दृष्टीनं घातक असतं. आज सर्वत्र असाच आचार दिसून येतो. हा खरा भ्रष्टाचार आहे, जो सारं जीवन पोखरून टाकतो आणि अनुभव देतो असमाधानाचा, असंतोषाचा, अशांतीचा.

स्वामी विवेकानंदांसारख्या सेवाव्रती तत्त्वज्ञांनी अनेकदा हा प्रश्‍न विचारलाय – ‘जगात संपूर्णतः (शंभर टक्के) नास्तिक कोण आहे? त्यांना असंही विचारायचं असतं की असा संपूर्ण अंतर्बाह्य नास्तिक कोणी असू शकेल का?
– देवावर, धर्मावर, धार्मिक विधी किंवा कर्मकांडांवर विश्‍वास नसलेले अनेकजण असतात. गरज नसताना आपल्या नास्तिकतेचा डंका ते सदासर्वदा सर्वत्र पिटत असतात. पण केवळ अशा बाहेरच्या प्रतीकात्मक गोष्टींवर किंवा कृतींवर आस्तिक-नास्तिक असणं अवलंबून नसतं.

ज्याचा स्वतःवर विश्‍वास आहे असा आत्मविश्‍वासपूर्ण माणूसही आस्तिक असतोच. अस्ति-अस्तित्व म्हणजे असणे. कुणावर तरी विश्‍वास आहे ना मग तो आस्तिकच असतो. कुणावरही यत्किंचितही विश्‍वास नाही, अगदी स्वतःवरही नाही. असली व्यक्ती माणूस म्हणून घ्यायला अपात्र आहे. कुठंतरी, कुणावर तरी विश्‍वास हा असलाच पाहिजे.

पुराणात एक कथा (प्रसंग) आहे आस्तिक नावाच्या ऋषींची. एका दृष्टीनं हे जगातले पहिले प्रभावी सर्पमित्र मानले जावेत. प्रसंग आहे जनमेजय राजाच्या सर्पसत्राच्या वेळचा. आपले पिताश्री राजा परीक्षित यांचा मृत्यू सर्पदंशानं – तोही सर्पांचा राजा तक्षक याच्या दंशानं – झाला म्हणून सूडानं पेटून ऋषींच्या मदतीनं जनमेजयानं यज्ञ केला ज्यात एकामागून एक अशा सर्व सर्पांची आहुती पडू लागली. अगदी तक्षक स्वतः आत्मरक्षणासाठी इंद्राच्यामागे दडल्यावर ऋषींनी ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ अशी थेट इंद्राचं नाव घेऊन आहुती मागितली. हा सृष्टीचक्राच्या दृष्टीनं महाअनर्थ होता. कारण निसर्गात जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. अगदी ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा नियम असला तरी तो निसर्गतः पार पाडला जातो. मानवानं यात ढवळाढवळ करायला प्रारंभ केला तर भयंकर प्रसंग उभा राहतो. अशा मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्यामुळे निसर्गानं माजवलेल्या कहराचा अनुभव आपण आजही घेत आहोत. जीवघेण्या नैसर्गिक आपत्ती, मानवजातीवर ऋतुचक्राच्या संदर्भात कोसळणारी अरिष्टं (संकटं) ही या हस्तक्षेपाची जिवंत उदाहरणं आहेत. ज्यावेळी आस्तिक नावाचे ऋषी प्रवेश करून जनमेजयाला ते सर्पसत्र थांबवण्याचा आदेश देतात तेव्हाच तो सर्वसर्पनाशक यज्ञ थांबतो. आजही अनेकजण साप दिसला तर ‘आस्तिक आस्तिक’ म्हणतात. यामुळे तो साप निघून जातो अशी त्यांची श्रद्धा (की अंधश्रद्धा?) असते. असो.
हे सांगण्याचं कारण एकच की आज आपला कुणावरही उत्स्फूर्त विश्‍वास उरलेला नाहीये. आपल्या श्रद्धा या भीतिपोटी असलेल्या अंधश्रद्धा मात्र उरल्याहेत. खर्‍या आस्तिकतेचा अभाव या सर्वांच्या मुळाशी आहे.
पिताश्री यमधर्मानं यक्षरूपात युधिष्ठिराला विचारलेल्या प्रश्‍नमालिकेत या संदर्भात दोन प्रश्‍न येतात. युधिष्ठिरानं त्याची उत्तरं व्यावहारिक पातळीवरच दिलीयत.
* नास्तिक कोण? …
या प्रश्‍नाचं सरळ उत्तर दिलंय- मूर्ख व्यक्ती नास्तिक असते. एरवी खूप शहाणी असलेली माणसं कोणत्यातरी शक्तीवर विश्‍वास ठेवण्याचा प्रश्‍न आला की अशी कोणतीही सर्वोच्च, अमूर्त शक्ती सार्‍या विश्‍वातले सर्व व्यवहार – चालवत असते यावर विश्‍वास ठेवत नाहीत. शक्तीवर विश्‍वास नाही मग कोणा व्यक्तीवर पूर्ण विश्‍वास ठेवण्याचा प्रश्‍नच येत नाही. प्रत्यक्ष, स्पष्ट जरी म्हटलं नाही तरी अशा ‘नास्तिक’ व्यक्तींच्या अंतर्मनात एक गोष्ट असते ती म्हणजे – जगात जर कोणती व्यक्ती महत्त्वाची, प्रभावी असेल तर ती आपणच म्हणजे मी स्वतः!
अशा व्यक्तीला नव्हे तर वृत्तीला युधिष्ठिर ‘मूर्ख’ म्हणतो, यालाच नास्तिकता किंवा नास्तिक व्यक्ती (तशीच वृत्तीही) समजतो.
राजसूय यज्ञाच्या वेळची अग्रपूजेच्या प्रसंगीची ती घटना अशाच वृत्तीचं प्रतीक आहे. अग्रपूजा म्हणजे सर्वप्रथम करावयाची पूजा (सत्कार) करण्यासाठी उपस्थित क्षत्रिय राजातली कोणतीही व्यक्ती योग्य नाही – सोडून मी स्वतः! ही दृष्टी आहे दुर्योधनाची. याउलट युधिष्ठिराला सर्वच व्यक्ती अग्रपूजा करण्यासाठी योग्य वाटतात – सोडून तो स्वतः!
व्यावहारिक दृष्टीनं विचार केला तर दुर्योधनाचं उत्तर मूर्खपणाचं आहे. अशाच अहंकारी वृत्तीमुळे याच प्रसंगी शिशुपालाचा कृष्णानं वध केला हे सर्वांना माहीत आहेच. केवळ स्वार्थापोटी स्वतःला मोठं, शक्तिमान मानणं ही नास्तिकताच आहे. दुसर्‍या कुणावरही विश्‍वास न ठेवणारी अशी व्यक्ती सार्‍या मानवतेला मोठा धोका असते. हिटलरसारखी अशाच वृत्तीची माणसं सार्‍या जगाला महायुद्धाच्या खाईत (दरीत) लोटतात. अशी माणसं नास्तिकच असतात. देव, धर्म सोडाच साध्या मानवी मूल्यांवरही यांचा विश्‍वास नसतो. यालाच जोडून दुसरा प्रश्‍न विचारला गेलाय.
* मूर्ख कोण? …
– युधिष्ठिरानं त्वरित उत्तर दिलं – नास्तिक. म्हणजे नास्तिक व्यक्तीच मूर्ख असतात कारण त्या स्वतःचं हित वा दुसर्‍याचं कल्याण साधत नाहीत. ज्यांना व्यावहारिक बुद्धी नसते, जे सतत चुकीचे निर्णय घेत राहतात, अशांना आपण ‘मूर्ख’ म्हणतो. ‘बुद्धीने सर्वही होते’ असं म्हणताना योग्य निर्णय घेण्याचं, त्यांची कार्यवाही करण्याचं महत्त्वाचं काम बुद्धी करते असं म्हणायचं असतं. असं वागणं हे सर्वांच्या दृष्टीनं हितकारक असतं.

पण युधिष्ठिराच्या मते केवळ व्यावहारिक जीवन महत्त्वाचं नाहीये, एकूणच मानवी जीवनाचं सार्थक कोणतीतरी श्रद्धा, कुणावर तरी डोळस विश्‍वास टाकूनच होतं हे त्याला सुचवायचंय. म्हणून दोन्ही बाजूंनी त्यानं उत्तर दिलंय –
नास्तिक कोण? तर मूर्ख व्यक्ती नि
मूर्ख कोण ? नास्तिक व्यक्ती.
रामायणात एक मार्मिक प्रसंग आहे. चित्रकूट येथील संस्मरणीय राम-भरत भेटीचा. सारे जण भरत-शत्रुघ्न, सार्‍या माता, वसिष्ठादी गुरू, ऋषीगण रामाला अयोध्येत परतायला सांगतात. भरत रामाऐवजी स्वतः चौदा वर्षं वनवासाला जाण्याच्या तयारीनंच आलेला असतो. पण श्रीराम निर्धारपूर्वक त्रिवार सत्य उच्चारतो – संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार | अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार… सत्य हे त्रिवार… सत्य हे त्रिवार ॥
सर्वजण सुन्न होऊन पाहत राहतात. अशावेळी जाबाली नावाचे ऋषी रामाला विचारतात, ‘तू कौसल्येचा पुत्र आहेस याला आम्ही सारे साक्षी आहोत. तिनंच तुला जन्माला घातलंय. पण दशरथ राजाचं तुझ्या जन्मात काय योगदान आहे? अग्नीनं दिलेला प्रसाद (पायस) त्यानं फक्त राण्यांच्या हातात दिला एवढंच काय ते महाराज दशरथांनी केलंय. तू त्यांचा शारीर पुत्र (बायॉलॉजिकल सन्) नव्हेसच. अर्थातच त्यांनी दिलेले नि कैकयीनं मागितलेले वर तुझ्यावर बंधनकारक नाहीत. तुझं वनवासात येणंच चुकीचं आहे.’ यावर जरा वरच्या स्वरात राम निग्रहानं म्हणाला, ‘ऋषीवर, हे नास्तिक मत तुम्ही सर्वांसमोर का मांडताहात? पुत्राच्या वियोगानं व्याकूळ होऊन त्याचं नाव घेत जो पुरुष आपले प्राण देतो तो पिता नव्हे काय?’ यावर रामाचा जयजयकार करत जांबाली ऋषीच म्हणतात, ‘रामा असं नास्तिक मत माझं कसं असेल? तुझी परीक्षा पाहण्यासाठी अशा मोहमयी परिस्थितीतही तुझी मनःस्थिती कशी स्थिर राहते हे सर्वांना दाखवण्यासाठीच मी ते नास्तिक मत मांडलं.’
अशा विचारसरणीलाही नास्तिकता म्हटलंय. थोडक्यात केवळ व्यावहारिक दृष्ट्या नव्हे तर नैतिक दृष्टीनंही नास्तिकतेच्या अर्थावर चिंतन करता येतं.
यानंतर विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरातही युधिष्ठिराच्या तीव्र नि तीक्ष्ण बुद्धीचं प्रतिबिंब पडलंय.

* असाधू (दुर्जन) कोणाला म्हणायचं? …
– निर्दयी, कठोर, पाषाणहृदयी माणसाला असाधू म्हणायचं.
साधू म्हणजे सज्जन, संतप्रवृत्तीची व्यक्ती. या संदर्भात तुकोबांचे विचार अंतिम ठरावेत एवढे मोलाचे आहेत.
दया करणे जे पुत्रांसी | तेचि दासा आणि दासी |
तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ॥
एक तर आपण सर्वसाधारणपणे आपल्या दास-दासींवर म्हणजे नोकर मंडळींवर खरी दया, माया करतच नाही. याहीपुढे जाऊन तुकोबा सांगतात- नुसतं प्रेम नाही तर पुत्रवत् प्रेम जो आपल्या नोकराचाकरांवर करतो, तोच खरा साधू नि दोन हात असलेला परमेश्वर!
पुढे तुकोबा म्हणतात – ज्यासी आपंगिता (आधार) नाही
त्यासी धरी जो हृदयी | तोचि साधू ओळखावा…
निराधार व्यक्तींचा जो आधार बनतो, केवळ अन्न-वस्त्र-निवारा-पैसे यांचे दान करण्याऐवजी जो भावनिक आधार, प्रेमाची ऊब देतो तोच खरा साधू. तुकाराम असंही ठामपणे सांगतात –
जे का रंजले गांजले | त्यासि म्हणे जो आपुले |
तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा |
यात महत्त्वाची आहे आपुले म्हणण्याची, त्याप्रमाणे आपुलकीनं वागवलं जाण्याची वृत्ती. युधिष्ठिराची वृत्ती अगदी अशीच आहे.
एकूण काय आपण ज्यांना मूर्ख, नास्तिक, असाधू, दुष्ट, दुर्जन समजतो नि त्यानुसार त्यांच्याशी व्यवहार करतो ती दृष्टी आणि बुद्धीनं सखोल विचार करून जीवनचिंतन करून वागण्याची दृष्टी वेगळी आहे. उगीचच उथळ विचार करून इतरांविषयी मतं बनवून त्यावरून आपलीच मनं कलुषित नि बुद्धी प्रदूषित करून घेऊन जगणं हे सर्वांच्याच दृष्टीनं घातक असतं. आज सर्वत्र असाच आचार दिसून येतो. हा खरा भ्रष्टाचार आहे. जो सारं जीवन पोखरून टाकतो आणि अनुभव देतो असमाधानाचा, असंतोषाचा, अशांतीचा. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी नि साधुसंतांनी ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु|’ अशी प्रार्थना करताना असं पसायदानही मागितलंय – सर्वे भद्राणि पश्यन्तु | सर्वे सन्तु निरामयाः|
निरामय जीवन म्हणजेच तनामनाचं आरोग्य… बुद्धीचं स्वास्थ्य! मग आपोआपच साकारेल – ॐ शांतिः शान्तिः शान्तिः॥