॥ पंचकर्म विचार ॥ पुरुष उत्तरबस्ति

0
305
  •  वैदू भरत म. नाईक
    (कोलगाव)

आवश्यकतेनुसार १ महिन्यानंतर उत्तरबस्तिचा पुनर्विचार करावा.
एखाद्यावेळी रुग्णास अवसाद (शॉक) येण्याची शक्यता असते. वैद्याने ही शक्यता गृहित धरून त्याप्रमाणे तजवीज करावी. आधुनिक संशोधनाअंती उत्तरबस्तिचे उत्तम परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

कर्मनाम – पुरुष उत्तरबस्ति
व्याख्या – उत्तरबस्ति म्हणजे पुरुषांच्या शिस्नावाटे औषधीद्रव्य मूत्रमार्गामध्ये प्रविष्ट करणे होय.
गुदमार्गाच्या वरील मार्गाने (उत्तर) प्रविष्ट केला जातो किंवा बस्तिच्या पश्‍चात ज्याचा प्रयोग केला जातो. परंतु येथे केवळ शिस्नावाटे दिला जाणारा बस्ति असा अर्थ अभिप्रेत आहे.

सुत्रवह व शुक्रवह स्त्रोतसांच्या विविध व्याधींकरता उत्तरबस्ति देण्यात येतो.
पुरुषांमध्ये उत्तरबस्ति देण्याचा हेतू- मेद, मुत्राशय व मुत्रगर्भास्थित व्याधी व विकृती, ज्यांमध्ये स्थानिक चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे. अशा रुग्णांना उत्तरबस्ति योजना करावी. मुत्ररोग, शुक्राश्मरी, मेहनशूल, मुत्रातील अष्ठीला, अश्मरी, बस्तिशूल, शुक्रदोष, मुत्रकृच्छ, मुत्रदाह, शुक्राणुअल्पता अशा व्याधींमध्ये उत्तरबस्ति द्यावा.
अर्हता – प्रौढ पुरुष रुग्ण- विरेचन व निरुहबस्ति चिकित्सा घेतल्यानंतर उत्तरबस्ति द्यावा. रुग्ण भीरु नसावा. मूत्रविसर्जन केल्यानंतर रुग्णाला उत्तरबस्ति द्यावा.
उत्तरबस्ति अनर्हता – मूत्रमार्गातील तीव्र शोध व जंतुसंसर्ग, प्रमेही, मधुमेही रुग्ण, मूत्रमार्गातील कर्करोग व ग्रंथी, निओप्लाझम १२ सें.मी. व्यासापेक्षा मोठी व अवरुद्ध अश्मरी.

संभारसंग्रह – उपकरण-
१)सिम्पल रुबी कॅथेटर नं.३
२) डिस्पोजेबल प्लास्टिक सिरींज ५० मिलि.ची
३) निर्जंतुक कार्पास ४) पेनाइल क्लँप
ही साधने पूर्ण निर्जंतुक करूनच वापरावीत. कॅथेटर निर्जंतुक घृतामध्ये घृतलिप्त करावा.
द्रव्यनिश्‍चिती – उत्तरबस्ति स्नेह व निरुह या दोन प्रकारांपैकी असू शकतो. रुग्णांमध्ये यापैकी कोणता बस्ति द्यावयाचा आहे हे ठरविणे.
औषधी सिद्धता – व्याधीनुसार सुखोष्ण तैल, घृत, क्वाथ, सिद्ध दुग्ध इ. पूर्ण निर्जंतुक उकळून वा ऑटोक्लेव्ह करून घ्यावेत.
मात्रा- स्नेहद्रव्य मात्रा २० ते ५० मिली क्वाथ मात्रा १०० मिलीपर्यंत.
विशेष शुचिता – वैद्याने आपल्या हातांची व उपकरणासहित पीठाची पूर्ण स्वच्छता व शुचिता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हातावर निर्जंतुक ग्लोव्हज चढविणे उत्तम. रुग्णाचे अधःशरीरावर निर्जंतुक वस्त्राचे आच्छादन करणे आवश्यक आहे.
काल – सकाळी ६ ते ९ मलमूत्रविसर्जनानंतर किंवा सायंकाळी ४ ते ६ या कालावधीमध्ये मूत्रविसर्जनानंतर.
संख्या – ७ ते १४ उत्तरबस्ति सलग किंवा एक दिवसाआड द्यावेत. (सुश्रुतमते ३ ते ४)
वय – ७० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती व १६ वर्षांपर्यंतचे बाल रुग्णांना सहसा उत्तरबस्ति दिली जात नाही. ग्रीष्म ऋतूत उत्तरबस्ति देताना विशेष काळजी घ्यावी.
महत्त्वाची सूचना – रुग्ण संमतीपत्रक घेणे आवश्यक आहे.

पूर्वकर्म –
आतुरसिद्धता १) मलमूत्र विसर्जन २) स्नान व वैयक्तिक स्वच्छता ३) दुध व घृतयुक्त यवागु किंवा सुपाच्य भोजन ४) वृषण व मेदू प्रदेशी सुखोष्ण जलाने प्रक्षालन करावे. स्वेदन टाळावे. याकरिता स्वेदन करीत असताना या प्रदेशी शीतजलाची पट्टिका ठेवावी. ५) उत्तानशयन – अर्थात उताणे झोपविणे. ६) आश्‍वासन ७) रक्तभार व नाजीमापन.
प्रधानकर्म – हातामध्ये ग्लोव्हज घालून वैद्याने डाव्या हाताने मेद्राचा भाग घट्ट पकडून उजव्या हाताने घृतलिप्त कॅथेटर मेद्रावाटे आत ३ ते ६ सें.मी. प्रवेशित करावा. सिरींजमध्ये औषधी द्रव्य भरून ती कॅथेटरमध्ये ठेवून हळूवारपणे औषधीद्रव्य प्रवेशित करावे. रग्णास उत्तानशयन अवस्थेमध्ये पाय किंचित वर करून ३० ते ६० मिनिटे झोपवून ठेवावे. पेनाइल क्लॅम्पचा वापर करावा.
पश्‍चातकर्म – सुमारे एक तासापर्यंत उत्तरबस्ति द्रव्याचा प्रत्यागम होतो. सुमारे साठ ते सत्तर टक्के द्रव्य प्रत्यागमित झाल्यानंतर दोन ते तीन तासांनी रुग्णाला मुद्गयूष किंवा मांसरस द्यावा व सोयीनुसार अल्पभोजन द्यावे. शिस्नाची स्वच्छता राखण्यास सांगावी. १ तासापर्यंत मूत्रविसर्जन करू नये. उत्तरबस्ति चिकित्सा कार्यकाळामध्ये समागम करू नये. उत्तरबस्तिकर्म झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी रुग्णास बोलावून त्याचे मेदूपरिक्षण करावे.
लाभ – उपयुक्त व्याधीखेरीज मूत्रमार्गसंकोच (स्ट्रिक्चर्स) या अवस्थेमध्ये उत्तरबस्ति कर्माचा विशेष लाभ होताना दिसतो.
व्यापत् व त्यांची चिकित्सा-
१) उत्तरबस्ति त्वरित प्रत्यागमित होणे- अपेक्षित कालापेक्षा जलदरित्या बस्तिद्रव्य प्रत्यागमित झाल्यास शोधनगणातील द्रव्यांनी सिद्ध तैलाचा बस्ति गुदावाटे द्यावा किंवा शोधन द्रव्यांची गुदवर्ती ठेवावी व नाभीच्या अधोभागी मुठीने दाब द्यावा.
२) उत्तरबस्ति प्रत्यागमित न झाल्यास – अपेक्षित कालानंतरही बस्तिद्रव्य प्रत्यागमित न झाल्यास वाहवा पाने, निर्गुंडी स्वरस, गोमूत्र, सैंंधव यांच्या कल्काची मुगाएवढी वर्ती इंद्रियात ठेवावी.
३) इंद्रियांचा अतिदाह झाल्यासः- जेष्ठमधाचा काढा, मध व साखर घालून थंड करून त्याची उत्तरबस्ति द्यावी.
४) जंतुसंसर्ग – मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग टाळावा. यासाठी गंधक रसायन, सूक्ष्म त्रिफळा, गोक्षुरादि गुग्गुळ इ. औषधांची योजना करावी.
आवश्यकतेनुसार १ महिन्यानंतर उत्तरबस्तिचा पुनर्विचार करावा.
एखाद्यावेळी रुग्णास अवसाद (शॉक) येण्याची शक्यता असते. वैद्याने ही शक्यता गृहित धरून त्याप्रमाणे तजवीज करावी.
आधुनिक संशोधनाअंती उत्तरबस्तिचे उत्तम परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.