॥ आरोग्य मंथन ॥ अन्नाचं पचन आणि जीवन

0
369
  •  प्रा. रमेश सप्रे

आरोग्य टिकवण्यापेक्षा बिघडलेल्या आरोग्याला मार्गावर आणण्यासाठी अधिक प्रयत्न करावा लागतोय का? म्हणूनच एक अनुभव सर्वांना येऊ लागलाय- ‘आयुष्याची वर्षं वाढलीयत, पण वाढलेल्या वर्षातलं आयुष्य धन्य करणारं आनंददायी उरलंय का?’ आपण वेळीच सावध झालं पाहिजे असं नाही वाटत?

आहार हा सर्व इंद्रियांचा असतो. अन्नाचा आपल्या कृतींशी, आचरणाशी, स्वभावाशी जवळचा संबंध असतो. सात्विक आहार घेणार्‍याची वृत्ती सात्त्विक बनते. याउलट तामसी आहार घेणार्‍याची वृत्ती तामसी, हिंसक बनते. म्हणून गीतेत आहाराचा त्रिविध विचार करून तामस-राजस आहारापेक्षा सात्त्विक आहाराचा पुरस्कार केलाय. स्वतः गोपालकृष्ण सात्त्विक आहार घेणारेच होते. त्यांच्या मनाचा तोल गेलाय, निर्णय घेताना गोंधळून गेलेयत, विषयभोगात गुंगून गेलेयत असा एकही प्रसंग त्यांच्या चरित्रात आढळत नाही.

आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी नि चारित्र्याच्या जडणघडणीसाठी जे घटक उपकारक किंवा अनुकूल असतात त्यात आहारपद्धतीला विशेष महत्त्व आहे. इथं शाकाहार-मांसाहार याची चर्चा नसली तरी सर्वकाळी सर्व संस्कृतीत साधा आहार, उपवास, शाकाहार याला महत्त्व कायम दिलं गेलंय. असा आहार सेवन करणं (खाणं) हे जसं महत्त्वाचं तसंच तो आहार नीट पचणं नि त्याचं शरीराच्या शक्तीत रूपांतर होणं महत्त्वाचं आहे. अपचनाला अजीर्ण शब्द आपल्या परिचयाचा असतो, पण पचनाला ‘जीर्ण’ हा संस्कृत शब्द नवीन वाटतो. तसं ‘अन्न जिरणं’ असं आपण म्हणतोच. असो.

* जीर्णम् अन्नं प्रशसन्ति, भार्यां च गतयौवनम् |
रणात् अग्रत्यागतं वीरं, शस्यं च गृहमागतम् ॥

महाभारतासारख्या महान ग्रंथात एक मुद्दा, एक सूत्र स्पष्ट करण्यासाठी जी उदाहरणं दिली जातात तीही तितकीच चिंतनीय असतात. इथंच पहा ना, जे अन्न जिरते म्हणजे पचते त्याची स्तुती केली जाते – त्याचीच प्रशस्ती केली जाते (त्यालाच अनेकांच्या मान्यतेचं प्रशस्तीपत्र मिळतं.) त्याचप्रमाणे प्रौढ वयाची पत्नी (पतीसुद्धा!) ही यौवनसंपन्न पत्नीपेक्षा अधिक हितकारक असते. तरुणपणी शारीरिक सौंदर्य अधिक असेलही पण जीवनासाठी अनुभव, चिंतन, परिपक्वता या गुणांचा अधिक उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे रणांगणात विजयी होऊन परतलेल्या शूरवीराचं स्वागत होतं. इतकंच काय पण रणांगणावर युद्धात वीरगती मिळालेल्या हुतात्म्यांच्या मृतदेहाचाही सन्मान केला जातो. रजपूत स्त्रिया युद्धावर निघालेल्या पतीला (किंवा पित्याला, भावाला) निघण्यापूर्वी ओवाळताना सांगत ‘मृत्यू आला तरी चालेल पण शत्रूचा घाव छातीवर झेला. पाठीत बाण, भाला घुसून मृत्यू आला तर शत्रूला पाठ दाखवून पलायन करताना मरण आलेल्या देहाला स्पर्शही करणार नाही’. हे सांगायचं कारण एकच की संस्कृतीचे तेजस्वी धागे असे एकमेकात गुंतलेले असतात. आहार-अनुभव (परिपक्वता) – पराक्रम आणि कृषिप्रधान भारत देशातलं धान्य उत्पादन (शस्य श्यामलां मातरम्!) शस्य म्हणजे शेतात पिकलेलं धान्य. पीक जेव्हा उभं राहतं तेव्हा अंदाज बांधले जातात, पण नंतर अतिवृष्टी-अनावृष्टी (दुष्काळी पिकावरील कीड नि रोग, गारपीट किंवा टोळधाड इ.इ. घटकांमुळे ते अंदाज घटत जातात. म्हणून शेतातल्या उभ्या पिकापेक्षा घरी आलेलं, कोठारात भरून ठेवलेलं धान्य (शस्यं गृहमागतम्) अधिक मोलाचं असतं. आपण काय, किती नि कसं खातो यापेक्षा खाल्लेल्या अन्नापैकी पचलं किती नि रक्तात मिसळलं किती हे महत्त्वाचं असतं. देवाला, सद्गुरूंना नैवेद्य दाखवताना म्हटलं जातं…. ‘तूपपोळी श्रीमंताची, भाजीभाकर गरीबाची’ यात शेवटी अन्नघटक नि खाणार्‍या व्यक्तीची पचनक्षमता या गोष्टींनाच अधिक महत्त्व असतं.
आणखी एक असंच सुभाषित ‘हितोपदेश’ या ग्रंथात आलंय…

* सुजीर्णमन्नं, सुविचक्षणः सुतः,
सुशासिता स्त्री, नृपतिः सुसेवितः |
सुचिंत्य च उक्तं, सुविचार्य यत्कृतं
सुदीर्घकालेऽपि न याति विक्रियाम् ॥

चांगल्या प्रकारे पचन झालेलं अन्न अंगी लागतं म्हणजे आरोग्य राखायला मदत करतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. असं म्हणतात – विशीतला आहार चाळीशीनंतरचं आरोग्य ठरवतो नि चाळीशीतला आहार साठीनंतरच्या आरोग्यावर परिणाम करतो. खाल्लेल्या अन्नाचे दोन परिणाम – एक तात्कालिक – पोट भरणे, जेवण रुचकर लागणे, जेवून आनंद (तृष्टि) मिळणं तर दुसरा दूरगामी परिणाम म्हणजे उमेद, उत्साह वाढणे, जीवनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होणं (पुष्टि म्हणजे तनामनाचे पोषण).
चतुर पुत्र (पुत्री) आणि शिस्त असलेली पत्नी (तसाच पती) आयुष्याचा विचार करता, कुटुंबजीवनाचा विचार करता उपकारक असतात.
चांगली सेवा लाभलेला म्हणजे प्रजाजनांचा प्रिय राजा हा खरा धन्य होय. भाषण-संभाषण करताना विचार करून बोलणं ही यशदायी गोष्ट आहे आणि कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करणं ही आदर्श जीवनशैली आहे. या सार्‍या गोष्टी संपूर्ण जीवनाचा विचार केला तर भाग्यपूर्ण आहेत. अशी जीवनच खरी सफळसंपन्न बनतात –

* जीर्णभोजिनं व्याधिर्नोपसर्पति ॥

पहिलं (आधी केलेलं) भोजन पचल्यावरच जो दुसरं भोजन घेतो, सतत खात राहत नाही, त्याच्या आसपाससुद्धा व्याधी, रोग, आजार फिरकत नाहीत.
हल्ली भोजनाच्या वेळा, दोन भोजनांमधला अवकाश (कालावधी) नि आहारातील पदार्थ (अन्नघटक) याचा विचार, संशोधन खूप केलं जातं पण त्याप्रमाणे आचार होत नाही. सध्याची पिझ्झा-पास्ता-बर्गर संस्कृती उघड उघड आरोग्याला घातक आहे. म्हणूनच अनेक शिक्षणसंस्थांनी त्यांच्या उपाहारगृहात (कँटीनमध्ये) हे पदार्थ, तत्काळ अन्नपदार्थ (इन्स्टंट फूड) विकण्यास बंदी केलीय. हे आरोग्यासाठी महत्त्वाचं पाऊल आहे. जिभेला चटकदार, चवदार लागणारे पदार्थ येता-जाता खात राहणं हे रोगांना निश्‍चित आमंत्रण देणं आहे. याचे दोन मुख्य दुष्परिणाम म्हणजे ढासळती रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी), शरीरातील मेद (फॅट) वाढणं त्याचबरोबर मनाची सहनशक्ती घटवणं.. आज आहाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, बाहेर जाऊन खाण्यापेक्षा बाहेरचेच पदार्थ घरबसल्या मागवणे ही प्रवृत्ती वाढली असल्यानं एकूण सामाजिक आरोग्यही धोक्यात आलंय.

एक मजेदार जाहिरात आहे. पत्नी म्हणते, ‘चार दिवस माहेरी जायचं मनात आहे.’ यावर एरवी नकार देणारा, नाराज होणारा पती एकदम म्हणतो, ‘अवश्य जा. पण चार दिवस नको, चांगली महिनाभर राहून ये.’ हा संवाद संपल्यावर संगीत-चित्रमय संदेश येतो – ‘कोणत्याही हॉटेलमधील, कोणतेही पदार्थ, कोणत्याही पत्त्यावर (घरी) पदार्थांच्या मूळ किंमतीत पन्नास टक्के सवलतीनं विनामूल्य घरपोच. संपूर्ण महिनाभर!’ अशा परिस्थितीत आरोग्याची ऐशी तैशी!
सुश्रुतासारखा आयुर्वेदाचार्य म्हणतो-

* अनात्मवंतः पशुवद्भुंजते येऽप्रमाणातः |
रोगानीकस्य ते मूलम् अजीर्णं प्राप्नुवन्ति हि ॥

अर्थ – केवळ इंद्रियांच्या लालसेला (चोचल्यांना) बळी पडून एखाद्या जनावरासारखं जरूरीपेक्षा जास्त भोजन (अधाशीपणे) जे लोक करतात त्यांना अजीर्ण होते. हे वरचेवर होणारं अजीर्ण अनेक रोगांना निमंत्रण देतं. सारं आरोग्यच यामुळे धोक्यात येतं.

आपल्या पचनसंस्थेच्या म्हणून काही मर्यादा असतात. अगदी दात, दाढा, सुळे हेही जनावरांइतके मजबूत नसतात. पचनशक्ती मर्यादित असते. हल्लीच्या युवा पिढीला काहीही खाल्लं तरी पचलं पाहिजे हा अनुभवच येत नाही. लहानपणापासून आरोग्यापेक्षा जिभेची मागणी, जिभेचे लाड यांना अधिक महत्त्व मिळाल्याने आहाराकडे चांगल्यापैकी दुर्लक्ष होऊ लागलंय. यात खाऊ नये ते खाणं नि खायला हवं ते न खाणं असे दोन्ही प्रकार आहेत. शिवाय खाण्याच्या वेळा, प्रमाण, नियमित व्यायाम, खेळ यांचा अभाव यामुळे सार्‍या पिढीचंच आरोग्य धोक्यात आल्यासारखं वाटतं. औषधं, वैद्यकीय उपचार यावर वाढत चाललेला खर्च ही चिंतेची बाब आहे. मुळात साध्या, चौरस आहाराकडे हवं तेवढं लक्ष दिलं जात नाही. काही आरोग्याची जाण असलेली मंडळी जरूर आहेत. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. पण या मंडळींनी देहाकडेच पुरवलं जाणारं लक्ष मनाकडेही वळवलं पाहिजे. मनोविकार नि मनोरुग्ण यांची संख्या काळजी वाढावी एवढी वाढतेय. जीवनाच्या वाढत्या वेगात नि व्यवहारांच्या वाढत्या गुंतागुंतीत मनःस्वास्थ्याचा बळी जातोय. कुटुंब अस्थिर होऊन त्यांना तडे जाऊ लागलेयत. या परिस्थितीता एक महत्त्वाचा धागा आहार विचार हाच आहे. विकारांवर विजय विचारानंच मिळवायचा असतो. असो.

एक दुष्टचक्र निर्माण झालंय. मनोविकृतीमुळे आहार नि आरोग्य यांच्यातील संबंधांना महत्त्व दिलं जात नाही आणि आहार अन् आरोग्याला योग्य महत्त्व न दिल्यामुळे मनोविकृती वाढू लागल्याहेत. या संदर्भात चरक आयुर्वेदाचार्यांचंच एक सुभाषित आहे –

* मात्रयाऽप्यभ्यवहृतं पथ्यं चान्नं न जीर्यति |
चिंता शोक भय क्रोधदुःखशय्या प्रजागरैः ॥

योग्य प्रमाणात घेतलेले पथ्यकर अन्नसुद्धा नीट पचत नाही याला मुख्यतः चिंता, शोक, भीती, क्रोध, दुःख, दिवसा घेतलेली अतिनिद्रा, रात्रीची उशीरापर्यंत जागरणं हे घटक जबाबदार आहेत.
हा विचार पाहिला तर सध्याची आपली जीवनशैली तर अशी झाली नाही ना, हा विचार मन अस्वस्थ करतो. पोटाचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे. पण या बाबतीत अतिरेक घराघरात होऊ लागलाय.

‘आपलं पोट असतं पुढे पण आयुष्यभर पाठीमागे लागलेलं असतं’ हा विचार गंमतीदार वाटला तरी खरा आहे. ‘सारं काही पोटासाठीच ना? भाई, पापी पेट का सवाल है|’ असे संवाद आपण सगळीकडे ऐकत वाचत असतो. पण पोटाच्या वरची इंद्रियं हृदय, मुख, मस्तक, डोळे, कान ही माणसाच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं कार्य करणारी आहेत. आज या इंद्रियांच्या कार्याकडे कमी ध्यान दिलं जातंय का?
एक फार महत्त्वाचा विचार मानवाला करावा लागतोय. पुढच्या दोन पायांचं हातात रूपांतर झालं नि माणूस जन्मला. त्यापूर्वी चार पायांची जनावरं सर्वत्र संचार करत होती. चतुष्पाद प्राण्यांपासून उत्क्रांत होत, क्रमाक्रमानं विकास पावत आजचा माणूस – आधुनिक, प्रगत, सुसंस्कृत मानव निर्माण झाला. आदिमानव अवस्थेत त्याच्या जगण्यात इतर प्राण्यांहून फार फरक नव्हता. म्हणजे दिसणारा फरक फक्त दोन पायांवर उभा राहून व्यवहार करू शकणारा प्राणी एवढाच सुरवाती सुरवातीला होता. पण न दिसणारा एक महत्त्वाचा फरक होता मानवाच्या विकसित झालेल्या बुद्धीत. या बुद्धीला अनेक पैलू आहेत. अजूनही या सर्व पैलूंबद्दल संशोधन झालेलं नाही. ज्या निसर्गमातेचं एक लाडकं अपत्य असलेला माणूस निसर्गनियमांचं उल्लंघन करणारा, सृष्टीचा मित्राऐवजी शत्रू कसा बनला यावर खूप विचारमंथन झालंय. चालूही आहे. पूर्वीच्या जीवनशैलीत केला जाणारा आरोग्याचा विचार आज आहारापेक्षा औषधांवर जास्त भर देणारा होतोय का? – हा खरा यक्षप्रश्‍न आहे. आरोग्य टिकवण्यापेक्षा बिघडलेल्या आरोग्याला मार्गावर आणण्यासाठी अधिक प्रयत्न करावा लागतोय का? म्हणूनच एक अनुभव सर्वांना येऊ लागलाय – ‘आयुष्याची वर्षं वाढलीयत, पण वाढलेल्या वर्षातलं आयुष्य धन्य करणारं आनंददायी उरलंय का?’ आपण वेळीच सावध झालं पाहिजे असं नाही वाटत?