ह. मो. मराठे ः मनस्वी माणूस, सृजनशील साहित्यिक

0
155
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

दुःख-संवेदना माणसाला जेवढे शिकवते, प्रगल्भ बनविते तेवढी सुखसंवेदना बनवू शकत नाही. घर्षणातून चंदनाच्या सुगंधाला गहिरेपणा यावा, गोडी वाढावी तसेच ह. मो. मराठे यांच्या हृदयापासून आलेल्या हाकेतून वाटत राहायचे.

ह. मो. मराठे गेल्यावर त्यांच्या व्यक्तित्वाविषयी आणि साहित्याविषयी यापूर्वी थोडेफार लिहिले. त्यांच्या बहुचर्चित ‘बालकाण्ड’विषयीही लिहिले तरीही त्यांच्यासंबंधी आणखीही सांगणे बाकी राहतेच. कारण माणूस म्हणून आणि सृजनशील कलावंत म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैस चिमटीत मावणारा नाही. दरवेळेला एकेक वेगळाच पैलू दिसायला लागतो. ‘बालकाण्ड’ जरी पुन्हा वाचले तरी हिमनगाच्या बुडालेल्या दुःखाचा भाग दिसला नाही तरी तीव्रतेने जाणवायला लागतो. आणि आजकाल मुर्दाड झालेल्या तसेच बधिर झालेल्या संवेदनांना तो तीव्रतेने पुन्हा जाग आणतो. आपले दुःख चारचौघांत उगाळावे का हा मूलभूत प्रश्‍न उद्भवतो खरा. पण तो आपले खाजगी आयुष्य जंत्रीच्या स्वरूपात ठेवतो तेव्हा; पण हेच दुःख, याच यातना कलात्मकतेच्या पातळीवर सहजगत्या पोचल्या तर… चार्लस डिकन्सने म्हटले होते ः जितके तुम्ही जीवनचित्रणाच्या बाबतीत विवक्षिताकडे जाल; तितके तुम्ही विश्‍वात्मक व्हाल. ‘बालकाण्ड’मधील हनूचे दुःख आता हनूपर्यंतच राहिले नाही; त्याची ‘आत्मकहाणी’ आता त्याप्रकारच्या यातना सहन केलेल्यांची काळीजकहाणी झालेली आहे. पी. बी. शेले याने म्हटल्याप्रमाणे- जी तीव्रतम दुःखाचे विचार सांगतात ती आमची मधुरतम गाणी होतात. श्रेष्ठ शोकात्मिकेचा निकषच त्याने या वचनात मांडलेला आहे. ‘बालकाण्ड’चा अंतःसूर परिणामी मानवी करुणेच्या अंतर्यामाला हात घालणारा आहे.

असा हा सृजनशील कलावंत माणूस म्हणूनही अनेकदा भेटला. अत्यंत दारिद्य्रातून गेलेला, अभावग्रस्ततेच्या अन् अवहेलनेच्या दलदलीतून वर आलेला, खडतर परिस्थितीच्या खडकाला टक्कर देत पत्रकारितेच्या तसेच साहित्याच्या क्षेत्रात उंच उंच गेलेला हा भला माणूस सतत पायथ्याकडे पाहात राहिला. सहा फूट उंचीच्या या माणसाचा ताठ कणा अखेरपर्यंत कायम राहिला. पण त्यांच्या आवाजात दुसर्‍यांशी बोलताना एकप्रकारची अदब होती. आयुष्यभर भोगलेल्या, सोसलेल्या दुःखाची अबोध पातळीवरची ‘दर्द’ त्यांच्या स्वरात होती. एकदा भेटल्यावर दुसर्‍यांच्या मनाला कायमचं बांधून ठेवण्याची शक्ती त्यांच्यात होती. हे अंतःसामर्थ्य त्यांनी आयुष्यात भोगलेल्या दुःखांनी दिले असेल कदाचित… कारण दुःख-संवेदना माणसाला जेवढे शिकवते, प्रगल्भ बनविते तेवढी सुखसंवेदना बनवू शकत नाही. घर्षणातून चंदनाच्या सुगंधाला गहिरेपणा यावा, गोडी वाढावी तसेच ह. मो. मराठे यांच्या हृदयापासून आलेल्या हाकेतून वाटत राहायचे. अशा त्यांच्या कित्येक गाठीभेटी आठवतात… दूरध्वनीवरचे संभाषण आठवते.

ह. मो. मराठे यांची पहिली भेट झाली ती फोंडा येथील नगरपालिका वाचनालयाच्या सभागृहात ‘प्रागतिक विचार मंच’, ‘गोमंतक साहित्य सेवक मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र परिचय केंद्र’ यांनी मिळून आयोजित केलेल्या साहित्यमेळाव्यात. प्रमुख पाहुणे या नात्याने भाषण करताना त्यांनी आपल्या जीवनाचा आलेख थोडक्यात मांडला होता. सुरुवात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून केली; पण पत्रकारितेत वेगळ्या प्रकारची झिंग अनुभवता येते. तिचे आकर्षण वाटल्यामुळे ते तिकडे वळले. व्यासपीठावर प्रा. रवींद्र घवी होते. त्यांनी उमेदवारीचा काळ पत्रकारितेत घालविला होता. पण एम.ए. मराठीला मिळालेल्या उत्तम यशामुळे ते अध्यापनाकडे वळले. एकेकाळी ‘सकाळ’मध्ये ते एकत्र होते. त्या दोघांची झालेली जुगलबंदी आनंददायी होती. त्यावेळी ‘बालकाण्ड’ प्रसिद्ध झाली नव्हती. ‘पक्षिणी’ हा त्यांचा कथासंग्रह मी वाचला होता. ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी…’, ‘काळेशार पाणी’ या कादंबर्‍या वाचल्या होत्या. साहित्यविश्‍वात त्यांच्या या साहित्यकृतींची बर्‍यापैकी चर्चा होत होती. एव्हाना त्यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकाचे रंगरूप बदलून टाकले होते. कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळून कादंबर्‍या लिहायला अजून अवधी होता. ‘ललित’मधील ‘स्वागत’ सदरात त्यांनी मांडलेला रोचक शैलीतील लेखाजोगा मी वाचला होता. ह. मो. मराठे यांच्याशी परिचय करून घ्यायला एवढे पुरेसे होते. ती भेट त्यांनी लक्षात ठेवली हे विशेष.

पुढे ते ५ मे १९८५ रोजी पुण्याला ‘संभाजी पार्क’मध्ये भेटले. राम गणेश गडकरी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर मी ते, प्रा. शंकर वि. वैद्य, डॉ. अक्षयकुमार काळे इत्यादींच्या सान्निध्यात होतो. अन्य मान्यवर कितीतरी होते. कसबापेठेत राम गणेशांच्या वास्तूसमोर आम्ही दोघांनी इतक्या गप्पागोष्टी केल्या की ते क्षण मला आजही संस्मरणीय वाटतात. आयुष्यभर अकिंचन राहिलेल्या गडकरींच्या निवासस्थानाशी महाराष्ट्र शासनाने पाठवलेली हत्तीण झुलत होती. या नियतीच्या लीलेचे रहस्य आम्हाला उलगडले नव्हते. नंतरच्या भेटीतही मी त्यांच्याशी बोलताना या स्मृती जागवत होतो. ह. मो. मराठे यांचे ‘एक माणूस एक दिवस’ हे आगळ्या-वेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या व्यक्तींच्या परिचयाचे पुस्तक आहे… मलाही सहजगत्या त्यांच्या सहवासाचा हा एक दिवस मिसळून टाकावासा वाटला.

आणखी एक भेट अत्यंत संस्मरणीय… ज्या परिसरात ‘बालकाण्ड’चे- करुणाष्टकाचे बव्हंशी अध्याय घडले, त्या सूर्ल गावात ह. मो. मराठे यांच्या सहवासात घालवायचा नामी संकल्प ‘कोकण मराठी परिषदे’ने केला. तो तडीस नेला. लेखकावरचे चर्चासत्र झाले… त्याची मनमोकळी मुलाखत झाली… उत्कृष्ट प्रश्‍न विचारणार्‍या डॉ. सचिन कांदोळकर यांना कोवळ्या शहाळ्यांची पेंडी देण्यात आली… एकूणच वातावरण चैतन्यमय होते… ह. मो. मराठे यांचे बालपणीचे दिवस हलाखीचे गेले… त्याला नियती कारणीभूत होती… आईचा अकाली झालेला मृत्यू… आग्यावेताळ बाप… अवतीभोवतीची छळणारी माणसे होती… पण मालवणला राहूनही मायेची चादर अंगावर टाकणारा भाऊ बाबलही होता… शापावरील हा उःशाप…
जमदग्नीचा साक्षात अवतार असलेले वडील हनूला तासलेल्या हिरांच्या जुडीने झोडपून काढतात… आतेच्या घरातील माणसे हिशेब करताना हनूला उद्देशून अवहेलनेचे फुत्कार टाकतात… बाबलने पाठवलेला नवा कोरा शर्ट हनूकडून आतेची मुले अक्षरशः ओरबाडून घेतात… असे कितीतरी प्रसंग वाचताना संवेदनशील मनाला यातना देतात… हृदयाला घरे पाडतात.

‘बालकाण्ड’ ही ‘आत्मकहाणी’ हनूच्या होरपळलेल्या अंतःकरणाची करुण कहाणी आहे हे मनाला पटत जाते.
‘पक्षिणी’ हा ह. मो. मराठे यांचा पहिला कथासंग्रह असूनही त्यात पहिलेपणाच्या खुणा दिसत नाहीत… त्यांची अनवट शैली जीवनानुभवांचा उत्कट प्रत्यय देते. ‘माधुकरी’ या कथेतील अनुभूती मनाला व्यथित करणारी आहे. ‘विरूप’ ही तर अनोखा अनुभव देणारी कथा. भाजीवाल्याचा सुशिक्षित बेकार मुलगा वशिल्याशिवाय नोकरी मिळत नाही म्हणून रिक्षावाल्याचा धंदा पत्करतो… त्याच्या उमलू पाहणार्‍या आशा-आकांक्षांचा, स्वप्नांचा चुराडा होतो… ‘‘पोटासाठी कुणी रिक्षा चालवतो, कुणी कारखाना चालवतो, मी शरीर चालवते’’- असे बिनदिक्कत सांगणार्‍या तरुणीकडून त्याची लुबाडणूक होते… नियतीकडून, परिस्थितीमुळे समाजाकडून आणि लब्धप्रतिष्ठितांकडून फसविल्या गेलेल्या तरुणाची ही कथा आहे. ‘सावित्री- १’ व ‘सावित्री- २’ या कथा संस्मरणीय स्वरूपाच्या… भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील स्पर्धा… तिच्यात स्त्रीत्वाला प्राप्त झालेले अर्थमूल्य लेखकाने समर्थ शैलीत सूचित केले आहे… तिच्यात भेदकता आहे.

‘प्रास्ताविक’ (१९८६), ‘सॉफ्टवेअर’ (१९८६), ‘ंमार्केट’ (१९८८), ‘कलियुग’ (१९९१) आणि ‘इतिवृत्त’ (१९९१) या कादंबर्‍यांतून त्यांनी आपले अनुभवक्षेत्र बदललेले आहे, याच्या खाणाखुणा दिसतात. कादंबर्‍यांतून मराठी कादंबरीला त्यांनी गतिमान समाजाची निरीक्षणे नोंदविणारी, जीवनभाष्य करणारी नवी आशयसूत्रे पुरविली.
२०१० साली ‘कोकण मराठी परिषदे’च्या ‘साहित्य-संस्कृती संमेलना’त गेल्या शतकातील ‘मराठी दिवाळी अंकांचा उज्ज्वल वारसा’ या परिसंवादाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. पाचव्या शेकोटी संमेलनाला ते येऊन गेले. केपे येथे भरलेल्या चोविसाव्या अ. गो. मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली बिनविरोध निवड ही त्यांच्या वाङ्‌मयीन यशाची खूण होय. गोमंतकाने मराठी साहित्यसृष्टीला जे महत्त्वाचे साहित्यिक दिले; त्यांपैकी ह. मो. मराठे अग्रगण्य होत.