हॉस्पिसियू आणि संबंधितांच्या भांडणात डायलिसिस रुग्णांचे हाल

0
112

हॉस्पिसियूचे वरीष्ठ आणि सध्या डायलिसिस युनिट चालविणारे डॉक्टर यांच्यातील भांडणात मडगावच्या हॉस्पिसियुत डायलिसिसचे उपचार घेणार्‍या रुग्णांचे हाल होत आहेत. हॉस्पिसियुच्या जुन्या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावर गेल्या १५ वर्षांपासून डॉ. व्यंकटेश रेड्डी हे डायलिसिस युनिट चालवितात व शेंकडो रुग्णांनी तेथे सेवेचा लाभ घेतला. पण आताच आगीचा प्रकार, जनरेटने पुन्हा सुरू करणे व सरकारकडून पोलिस दबावाखाली बंद करणे असल्या प्रकारामुळे उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अतोनात त्रास भोगावे लागत आहेत. गेल्या शनिवारपासून या आठ दिवसात तिसर्‍यांदा सुरू केलेले युनिट संबंधित केव्हां बंद पाडतील या शंकेने ते हवालदिल झाले आहेत.

गेल्या आठवड्यात या इस्पितळांतील डायलिसि उपचार केंद्राला लागलेल्या आगीत दोन युनिट जळून खाक झाले. डॉ. रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात याआधीच प्रकरण नेले आहे. सध्या या केंद्रात ४० पेक्षा अधिक रुग्ण नियमितपणे डायलिसिस उपचार घेतात. त्यासाठी ११८० रुपये घेतले जातात. तर खाजगी हॉस्पिटलांत ३२०० रुपये घेण्यात येतात. आगीची घटना घडल्यानंतर डॉक्टर रेड्डी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी वीज पुरवठा सुरू करून केंद्र सुरू केले. रुग्णांना सुविधा उपलब्ध केली मात्र हॉस्पिसियुच्या अधिक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार वीज पुरवठा तोडला. त्यानंतरही जनरेटर आणून डॉ. रेड्डींनी उपचार सुरू केल्यानंतर पोलिसांनी दबाव आणून तोही बंद करण्यात आला.

आज उच्च न्यायालयात दाद मागणार
या सर्व प्रकरणात उद्या सोमवारी डॉ. व्यंकटेश रेड्डी यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचे जाहीर केले दक्षिण गोवा कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांनी या केंद्राचा मुद्दा उपस्थित करून सरकारने या रुग्णांना वार्‍यावर सोडल्याचा आरोप केला. तसेच डॉ. रेड्डी यांनी सरकारने सुडबुध्दी चालविल्याचा आरोप केला. डॉ. रेड्डींच्या केंद्रात सासष्टी, केपे व सावर्डे येथून रुग्ण येतात. सरकारने जाहीर केलेल्या इतर केंद्रातील फी वाढ व डॉक्टरांच्या वागणुकीमुळे हे रुग्ण तेथे जाण्यास तयार नसतात. नावेली येथे आरोग्य केंद्रात तीनच खाटा आहेत. मालभाट येथील दोन खाजगी इस्पितळात दीनदयाळ स्वास्थ योजनेखाली उपचार विनाशुल्क केले जात असले तरी तेथे वेगळे शुल्क आकारले जाते व सर्व सामान्याना परवडणारे नाही असे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. काल शनिवारी डॉक्टर रेड्डी यांनी ते पुन्हा सुरू केले व त्याचा फायदा ११ रुग्णांनी घेतला. वीज पुरवठा सुरू केला तो काल तरी तोडण्यात आला नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. रेड्डी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले आरोग्य खात्याने आपणास ७२ लाख देणे आहेत. गेल्या महिन्यातील आरोग्य संचालक व डॉक्टरामध्ये मारहाणी प्रकरणानंतर आपणास १७ लाख रु. दिल्याचे सांगितले.

घडामोडींदरम्यान एक
रुग्ण दगावला
त्याआधी या दिवसातील घटनेबद्दल उच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे. या घडामोडीत डायलेसिसच्या एका रुग्णाचा बळी केला आहे. वेळ्ळी येथील इसम उपचारासाठी गेल्या आठवड्यात आला होता. मात्र केंद्र बंद झाल्याने उपचार घेता आले नाहीत व तो मरण पावला.