हॉकी सीरिज फायनल्सचा टप्पा भारतात

0
87

लुसान
एफआयएच हॉकी सीरिज फायनल्सचा ६ ते १६ जून या कालावधीत होणार्‍या टप्प्याचे यजमानपद भारताला मिळाले आहे. २०२० टोकियो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी या स्पर्धेद्वारे दोन संघ पात्र ठरणार आहेत. प्रत्येक हॉकी सीरिज फायनल्समधून दोन संघ पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी स्थान मिळविणार आहेत. यजमान भारतासह आशियाई क्रीडा स्पर्धा विजेता जपान, मेक्सिको, पोलंड, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका व अजून एक संघ या स्पर्धेेत खेळणार आहे. हॉकी सीरिज फायनल्सच्या भारतीय टप्प्याचे ठिकाण मात्र अजून निश्‍चित झालेले नाही. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर व फ्रान्समधील ली टॉकेट येथे उर्वरित दोन टप्पे होणार आहेत. मलेशियातील टप्पा २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत होईल. यामध्ये मलेशिया, ऑस्ट्रिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, इटली, वानुआटू व वेल्स तर १५ ते २४ जून या कालावधीत फ्रान्समध्ये होणार्‍या टप्प्यात चिली, फ्रान्स, आयर्लंड, कोरिया, स्कॉटलंड, सिंगापूर व अजून दोन संघ सहभागी होतील. महिलांसाठी आयर्लंड (८ ते १६ जून), जपान (१५ ते २३ जून) व वेलन्सिया (१९ ते २७ जून) येथे टप्पे होतील. भारतीय महिला जपान टप्प्याचा भाग असून यात चिली, फिजी, यजमान जपान, मेक्सिको, पोलंड, रशिया व उरुग्वे यांचा समावेश आहे.