हैदराबादसमोर चेन्नईची शरणागती

0
125

>> वॉर्नर-बॅअरस्टोवची तडाखेबंद फलंदाजी

>> राशिद खानचा प्रभावी मारा

डेव्हिड वॉर्नर व जॉनी बॅअरस्टोव यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ‘ऑरेंज आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सनरायझर्स हैदराबादने काल बुधवारी चेन्नई सुपरकिंग्सचा १९ चेंडू व ६ गडी राखून दारुण पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ३३वा सामना राजीव गांधी स्टेडियमवर खेळविण्यात आला. वॉर्नर-बॅअरस्टोव जोडीने केवळ ५.४ षटकांत दिलेल्या ६६ धावांच्या घणाघाती सलामीमुळे हैदराबादने विजयासाठीचे १३३ धावांचे लक्ष्य १६.५ षटकांत गाठले.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना वॉर्नरने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा अवलंबला. केवळ २४ चेंडूंत १० चौकारांसह त्याने अर्धशतक ठोकले. बॅअरस्टोवने दुसर्‍या टोकाने संयमी खेळ दाखवला. वॉर्नरच्या पतनानंतर मात्र बॅअरस्टोवने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेताना चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. केवळ ४४ चेंडू खेळताना त्याने ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६१ धावा जमविल्या. कर्ण शर्माच्या चेंडूवर षटकार ठोकून बॅअरस्टोवने संघाचा विजय साकार केला. चेन्नईकडून ताहीरने दोन बळी घेत प्रभावी मारा केला. परंतु, धावांचे पाठबळ नसल्याने त्याची मेहनत कमी पडली.

तत्पूर्वी, फिरकीपटू राशिद खानची प्रभावी फिरकी व इतर गोलंदाजांच्या अचूक मार्‍याच्या जोरावर हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्सचा डाव २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखला
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार्‍या चेन्नईने डावाला धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर वॉटसन आणि ड्युप्लेसिस यांनी चेन्नईला सातव्या षटकात अर्धशतकी सलामी मिळवून दिली. ९.५ षटकांत या द्वयीने ७९ धावा फलकावर लगावल्या. शाहबाज नदीमने वॉटसनचा वैयक्तिक ३१ धावांवर त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. या भक्कम सलामीनंतर चेन्नईच्या संघाकडून मोठी धावसंख्या उभारणे अपेक्षित होते. परंतु, हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या ड्युप्लेसीला विजय शंकरच्या उसळत्या चेंडूने चकविले. पुढे सरसावून ऑफ साईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात चेंडूने त्याच्या बॅटची कड् घेतली. यष्टिरक्षक बॅअरस्टोवने यानंतर चूक न करता सोपा झेल घेतला. ड्युप्लेसीने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत ४५ धावा केल्या. या दोन बळींनंतर चेन्नईच्या डावाला उतरती कळा लागली. त्यानंतर धोनीच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद भूषवणारा सुरेश रैना मैदानावर आला. तो खेळपट्टीवर जम बसवणार इतक्याच तो पायचीत झाला. त्याने १३ चेंडूत १३ धावा केल्या. पाठोपाठ केदार जाधवदेखील पायचीत झाला. त्याला केवळ १ धाव जमवता आली. राशिद खानने डावातील चौदाव्या षटकांत या दोन महत्त्वाच्या खेळाडूंची विकेट काढत संघाला मजबूत स्थितीत आणले. विशेष म्हणजे या दोनही विकेटच्या वेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले. त्यामुळे उभयांना डीआरएसची मदत घेतली, पण दोनही वेळा रिव्ह्यूमध्ये त्यांना मैदानावरील पंचांचा निर्णय मान्य करावा लागला. त्यानंतर परदेशी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आलेला सॅम बिलिंग्स आपली छाप उमटवू शकला नाही. तो भोपळाही न फोडता माघारी परतला. जडेजाने कुर्मगती फलंदाजी करत २० चेंडू खेळून केवळ १० धावा केल्या. २१ चेंडूंत नाबाद २५ धावा करून रायडू नाबाद राहिला.

धावफलक
चेन्नई सुपरकिंग्सः शेन वॉटसन त्रि. गो. नदीम ३१, फाफ ड्युप्लेसी झे. बॅअरस्टोव गो. शंकर ४५, सुरेश रैना पायचीत गो. राशिद १३, अंबाती रायडू नाबाद २५, केदार जाधव पायचीत गो. राशिद १, सॅम बिलिंग्स झे. शंकर गो. खलिल ०, रवींद्र जडेजा नाबाद १०, अवांतर ७, एकूण २० षटकांत ५ बाद १३२
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-२१-१, खलिल अहमद ४-०-२२-१, संदीप शर्मा ४-०-३३-०, शहाबाज नदीम २-०-२४-१, राशिद खान ४-०-१७-२, विजय शंकर २-०-११-१
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. ड्युप्लेसी गो. चहर ५०, जॉनी बॅअरस्टोव नाबाद ६१, केन विल्यमसन झे. व गो. ताहीर ३, विजय शंकर झे. बिलिंग्स गो. ताहीर ७, दीपक हुडा झे. ड्युप्लेसी गो. कर्ण १३, युसूफ पठाण नाबाद ०, अवांतर ३, एकूण १६.५ षटकांत ४ बाद १३७
गोलंदाजी ः दीपक चहर ३-०-३१-१, शार्दुल ठाकूर ३-०-३१-०, इम्रान ताहीर ४-०-२०-२, रवींद्र जडेजा ४-०-२२-०, कर्ण शर्मा २.५-०-३३-१

धोनीविना उतरली सुपरकिंग्स
पाठदुखीमुळे चेन्नई सुपरकिंग्स संघाला काल हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीविना उतरावे लागले. धोनीच्या अनुपस्थितीत सुरेश रैनाने कर्णधारपद सांभाळले.

याआधी केवळ तीन वेळाच धोनीशिवाय सुपरकिंग्स संघ आयपीएल सामना खेळला होता. त्यातील दोन सामन्यांत चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०१० मध्ये आयपीएल स्पर्धेतील तीन सामन्यांना धोनी मुकला होता. १९, २१ आणि २३ मार्च २०१० रोजी झालेले सामने सुपरकिंग्स संघ धोनीशिवाय खेळला होता. त्यात अनुक्रमे दिल्लीविरुद्ध विजय तर पंजाब आणि बंगलोरविरुद्ध चेन्नईचा पराभव झाला होता.