हैदराबादमध्ये बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर

0
130

>> तेलंगण सरकारची परवानगी आवश्यक

तेलंगण राज्य सरकारने परवानगी दिल्यास भारतीय बॅडमिंटन असोसिएशने १ जुलैपासून हैदराबाद येथे खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सरावासाठीचे नियम काहीसे शिथिल केल्यानंतर देशातील काही मोजक्या बॅडमिंटनपटूंनी बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये मागील आठवड्यात सुरुवात केली आहे.

हैदराबादस्थित आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना मात्र अजून कोर्टवर उतरता आलेले नाही. ‘हैदराबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तेलंगण सरकारने लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावाची संधी मिळालेली नाही.

सरकारने परवानगी दिल्यास खेळाडू शिबिर घेणे शक्य होईल, असे असोसिएशनचे सचिव अजय सिंघानिया यांनी म्हटले आहे. ‘मार्च महिन्यात असोसिएशनने घोषणा करत २७ एप्रिल ते ३ मे या कालावधीतील वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुढे ढकलली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सप्टेंबरपर्यंत देशातील स्पर्धा न घेण्याचा निर्णयही असोसिएशनने यानंतर घेतला होता. सप्टेंबरमध्ये परिस्थितीचे पुन्हा आकलन करून निर्णय घेतला जाईल, असे सिंघानिया म्हणाले.

महासंघाने फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत स्पर्धांमधील रचनेत आमूलाग्र बदल केला होता. अंदाजे २ कोटी रुपयांची एकूण बक्षीस रक्कम त्यांनी नियोजित केली होती. तसेच स्पर्धांची गटवारी तीन विभागात करण्यात आली होती. परंतु, दुर्देवाने कोरोनामुळे हे बदल अमलात आणणे शक्य झाले नाही.