हैदराबादचा दिल्लीवर एकतर्फी विजय

0
120

मोहम्मद नबीची अष्टपैलू चमक व जॉनी बॅअरस्टोवच्या वेगवान ४८ धावांच्या जोरावर काल गुरुवारी सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी व ९ चेंडू राखून एकतर्फी विजय मिळविला. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेले १३० धावांचे तुटपुंजे लक्ष्य हैदराबादने १८.३ षटकांत गाठले. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा सामना फिरोजशाह कोटला मैदानावर खेळविण्यात आला.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानावर उतरताच इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बॅअरस्टोव दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडला. हवाई हल्ले करण्याऐवजी त्याने मैदानी फटक्यांना पसंती देताना चौकारांची बरसात केली. बॅअरस्टोव व डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा जमवल्या. यात वॉर्नरचा वाटा केवळ ७ धावांचा होता. केवळ २८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह बॅअरस्टोवने ४८ धावा चोपल्या. बॅअरस्टोव परतल्यानंतर वॉर्नरही फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही. जवळपास अर्ध्या धावांची सलामी मिळाल्यानंतर मधल्या फळीचे काम सोपे झाले. दिल्लीच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत धावगतीला लगाम घालताना ठराविक अंतराने हैदराबादचे बळीदेखील मिळविसे. परंतु, धावांचे अपेक्षित पाठबळ नसल्या कारणाने प्रभावी मारा करूनही त्यांच्या गोलंदाजांना धावांचा बचाव करता आला नाही. कगिसो रबाडाने टाकलेल्या डावातील १९व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर चौकार व तिसर्‍या चेंडूवर षटकार खेचत नबीने हैदराबादचा विजय साकार केला. युसूफ पठाण ९ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार भुवनेश्‍वर कुमारने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारले. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ फार वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला वैयक्तिक ११ धावांवर माघारी धाडले. शॉ ने ११ चेंडूत २ चौकार लगावले. दुसरा सलामीवीर शिखर धवन आपल्या अनुभवाचा वापर करू शकला नाही. मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर स्वीप करण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूंचा सामना करताना एका चौकारासह १२ धावा केल्या. दिल्लीकरांना चांगल्या कामगिरी अपेक्षा असलेला ऋषभ पंत अवघ्या ५ धावा करून माघारी परतला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. अफगाणिस्तानचा ऑफस्पिनर मोहम्मद नबी याने पंतची महत्त्वाची विकेट हैदराबादला मिळवून दिली. अष्टपैलू राहुल तेवतियाचे पुनरागमन अपयशी ठरले. ७ चेंडू खेळताना केवळ पाच धावा त्याला जमवता आल्या. तेवतिया परतला त्यावेळी दिल्लीचा संघ १०.५ षटकांत ४ बाद ६१ असा चाचपडत होता व डावाला स्थैर्य देणार्‍या फलंदाजाची त्यांना गरज होती. परंतु, असे काही घडले नाही. कॉलिन इंग्रामला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी भावली नाही. इंग्राम ८ धावांवर माघारी परतला आणि दिल्लीला पाचवा धक्का बसला. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर चौकार लागवण्याच्या प्रयत्नात असताना मनीष पांडेने त्याचा डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल टिपला.

झटपट गडी बाद होत असताना कर्णधार श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरली. पण शेवटची ४ षटके शिल्लक असताना फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात त्याचा प्रतिकार संपुष्टात आला. अय्यरने ४१ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ४३ धावा केल्या. १ चौकार आणि १ षटकार लगावणारा ख्रिस मॉरिस लवकर झेलबाद झाला. त्याने १५ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर चौकार लगावून कगिसो रबाडा याने तंबूची वाट धरली. अखेर अक्षर पटेलने केलेल्या फटकेबाजीच्या (नाबाद २३) जोरावर दिल्लीने २० षटकात ८ बाद १२९ धावांपर्यंत मजल मारली.

दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभूत झालेल्या आपल्या संघात तीन बदल करताना मध्यमगती गोलंदाज अवेश खान, फलंदाज हनुमा विहारी व मध्यमगती हर्षल पटेल यांना बाहेर बसवताना अष्टपैलू अक्षर पटेल, अष्टपैलू राहुल तेवतिया व अनुभवी वेगवान गोलदाज इशांत शर्मा यांना संधी दिली. दुसरीकडे सनरायझर्सने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे केन विल्यमसनला पुन्हा बाहेर बसावे लागले.

धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ त्रि. गो. भुवनेश्‍वर ११, शिखर धवन झे. संदीप गो. नबी १२, श्रेयस अय्यर त्रि. गो. राशिद ४३, ऋषभ पंत झे. हुडा गो. नबी ५, राहुल तेवतिया झे. नबी गो. संदीप ५, कॉलिन इंग्राम झे. पांडे गो. कौल ५, ख्रिस मॉरिस झे. नबी गो. भुवनेश्‍वर १७, अक्षर पटेल नाबाद २३, कगिसो रबाडा झे. भुवनेश्‍वर गो. कौल ३, इशांत शर्मा नाबाद ०, अवांतर ५, एकूण २० षटकांत ८ बाद १२९

गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-२७-२, मोहम्मद नबी ४-०-२१-२, सिद्धार्थ कौल ४-०-३५-२, राशिद खान ४-०-१८-१, संदीप शर्मा ४-०-२५-१
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. मॉरिस गो. रबाडा १०, जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. तेवतिया ४८, विजय शंकर झे. अय्यर गो. पटेल १६, मनीष पांडे झे. शॉ गो. इशांत १०, दीपक हुडा झे. रबाडा गो. लामिछाने १०, युसूफ पठाण नाबाद ९, मोहम्मद नबी नाबाद १७, अवांतर ११, एकूण १८.३ षटकांत ५ बाद १३१
गोलंदाजी ः संदीप लामिछाने ४-०-३२-१, अक्षर पटेल ४-०-१८-१, ख्रिस मॉरिस ३-०-२६-०, कगिसो रबाडा ३.३-०-३२-१, राहुल तेवतिया ३-०-१०-१, इशांत शर्मा १-०-५-१