हे स्नेहमंदिर व्हावे!

0
170

शरयू तीरावरील अयोध्यानगरी भव्य श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी सिद्ध झाली आहे. शतकानुशतकांच्या संघर्षानंतर हा क्षण अवतरलेला असल्याने सच्च्या रामभक्तांसाठी त्याचे महत्त्व फार मोठे आहे. त्याच बरोबर केंद्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासाठीही हा वचनपूर्तीचा क्षण असल्याने त्यांच्यासाठी त्याचे राजकीय महत्त्व देखील मोठे आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या शिरपेचातील स्वप्नपूर्तीचा हा मोठा मानाचा तुरा ठरला आहे. त्यामुळे स्वतः पंतप्रधान जातीने आज या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि चाळीस किलोंची चांदीची वीट अर्पून या मंदिराच्या उभारणीचा शुभारंभ करणार आहेत. कालपासून रामार्चन पूजेने या तीन दिवशीय सोहळ्यास प्रारंभही झाला आहे.
भारतीय जनता पक्ष आणि अयोध्या विवाद यांचे फार जवळचे नाते आहे, किंबहुना भाजपाची देशामध्ये स्वीकारार्हता वाढली ती अयोध्या प्रश्न त्यांनी हाती घेतल्यावरच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषदादी पारिवारिक संघटनांनी अयोध्या हा राष्ट्रीय मुद्दा बनवला आणि देशभरामध्ये जनजागरण केले, त्या सुलभ मार्गावरून भाजपाची राजकीय घोडदौड देशात सुरू झाली आणि बघता बघता केंद्रामध्ये समर्थ संख्याबळानिशी स्वबळाची सत्ता त्याने हस्तगतही केली. मात्र, या विवादाने जे धार्मिक ध्रुवीकरण निर्माण झाले त्याने देशामध्ये हिंदू आणि मुसलमान समाजामध्ये उभी फूटही पाडली. जातीय दंग्यांमध्ये शेकडो लोकांचा बळी आजवर गेला, त्याच्या मुळाशी अयोध्या विवाद राहिला. आज राममंदिराची उभारणी होत असताना ही दरी मिटवण्याची आणि देशामध्ये पुन्हा धार्मिक सौहार्द आणि सलोख्याचे नवे पर्व निर्माण करण्याची संधी चालून आलेली आहे. त्या दृष्टीने या समारंभाकडे आणि मंदिर उभारणीकडे पाहिले गेले पाहिजे.
अयोध्या प्रकरणीचा सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा देशातील मुस्लीम समुदायाने समंजसपणे स्वीकारला असल्याने आणि अयोध्येतील राममंदिराच्या बदल्यात त्यांच्यासाठी अन्यत्र पाच एकर भूमी देण्यावर तडजोड झालेली असल्याने हा विवाद कायमचा मिटायला आता हरकत नसावी. श्री रामजन्मभूमी मंदिर उभारणीचे पहिले निमंत्रण अयोध्या विवादातील याचिकादार इक्बाल अन्सारी यांना पाठवून श्री रामजन्मभूमी तीर्क्षथेत्र न्यासाने सर्वसमावेशकतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. हे मंदिर हे केवळ धार्मिक मंदिर नसेल तर या देशाच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचे आणि एकात्मतेचे ते प्रतीक बनेल अशी अपेक्षा आहे.
ऐंशीच्या दशकामध्ये सोमपुरा कुटुंबियांनी या मंदिराचा जो भव्यदिव्य आराखडा बनवला, जो आजवर चित्रामधून देशात घरोघरी पोहोचला, तो लवकरच प्रत्यक्षात उभा राहणार आहे ही कल्पना मनोरम आहे. मात्र, ही उभारणी वितुष्ट आणि विसंवादाऐवजी संवाद, सौहार्द आणि सर्वसमावेशकतेच्या पायावरच व्हायला हवी.
अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहणे हा कोणाचा विजय नाही वा कोणाचा पराजय नाही. मात्र ही निश्‍चितच एक ऐतिहासिक घटना आहे. कोरोनाच्या आजच्या संकटकाळाच्या पार्श्वभूमीवर तिची भव्यता जरी कमी झालेली असली, अवघ्या १७५ जणांनाच त्या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार असले, तरी देशभरामध्ये घरोघरी त्या निमित्ताने दीपोत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आसेतू हिमाचल या देशामध्ये आगळे दीपपर्व आज साजरे होईल यात शंका नाही. सध्याच्या कोरोनाच्या काळ्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर हे दीपपर्व समाजामध्ये आशा आणि उत्साहाचे अंकुर पेरील अशी आशा आहे. आजचा सोहळा हा राष्ट्रीय सोहळा व्हावा. त्याला राजकीय श्रेय उपटण्याचे साधन बनवले जाऊ नये वा इतर समाजांना दंडातील बेटकुळ्या दाखवण्यासाठीही या सोहळ्याचा वापर होऊ नये. अयोध्येतील हे मंदिर राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक बनले पाहिजे. प्रभू श्रीरामांची ओळख भारतीय समाजमानसाला ‘मर्यादापुरुषोत्तम’ अशीच आहे. शतकानुशतकांपूर्वी त्यांनी ज्या प्रकारे राज्य केले, ते त्या काळी तर आदर्श राज्यकारभाराचा मानदंड ठरलेच, परंतु आजही चांगल्या राजनीतीचा उल्लेख भारतीय समाजमन ‘रामराज्य’ असाच करते एवढा उच्च कोटीचा आदर्श त्याने घालून दिलेला आहे. अशा या महापुरुषाचे हे मंदिर राष्ट्रीय एकात्मतेचा मानदंड ठरावे. राम आणि कृष्ण ही अक्षरे जशी या विशाल देशाला एकत्वाच्या धाग्यामध्ये जोडतात, तसेच या मंदिरानेही देशाला स्नेहाच्या, प्रेमाच्या धाग्यांनी जोडावे. हे मंदिर स्नेहमंदिर बनावे!