हे विघ्नहर्ता, हे गणेशा!

0
117

– सौ. ममता खानोलकर

आमच्या गोमंतभूमीचा ‘गोमंत गौरव’ विशेषांक तू वाचला असशीलच. जागतिक कलाकारांची भूमी गोवा – तिच्यावर असाच वरदहस्त ठेव! चांगलं असतं तिथे थोडं वाईटही असतंच. ते सोडा!
तुझ्या आगमनासाठी उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे, तर पावसाने त्यावर विरजण घालायला नको. निदान तुझ्या येण्याच्या दिवशी तरी त्याला थोपवून धरता येतं तर बघ. 

‘विघ्नहर्ता’ तुझ्या आगमनाची तयारी आता जवळ जवळ पूर्णच झाली आहे. म्हापशाला ‘लक्ष्मी-नारायणा’च्या भेटीस गेले असता त्याच परिसरात जवळपासच्या चार-पाच चित्रशाळेत शोभिवंत, काही ठिकाणी एकाच आकारातल्या तर काही ठिकाणी विविधरंगी मूर्त्या तयार होऊन घरा-घरांत जाण्याची वाट बघतात. म्हापसा बाजारपेठेत शकुंतला ठाण मांडून आहे. दरवर्षी फळांपासून तुझ्या तयारीला लागणारं सर्व सामान एकत्रच मिळत असे. दुसर्‍या बाजूला कपडे वगैरे मिळत, ते तिथंच आहेत. पण यावर्षी फळ विक्रेत्यांना हटवून दुसर्‍या ठिकाणी नेल्याने ती प्रशस्त जागा मोकळीच होती. पण दुचाकी हजेरी लावून असतात, ते सोडा!
बघुया म्हणून तिथं फेरफटका मारला तर तिथं दुकानं थाटण्याची तयारी चालू आहे. पावसाने अजून विश्रांती घेतली नाही ना! म्हणून मागे-पुढे होतात. सार्वजनिक गणपती पूजन त्याच भागात असल्याने त्याचं साहित्यही येऊन तयार आहे. एकंदरित काय… तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहणं चालू आहे.
यंदा तुझ्यासोबत ‘शिक्षक दिन’, ‘मदर तेरेसांचा स्मृतिदिन’ आला आहे. शिक्षक दिन मागे किंवा पुढे साजरा केला जाईल. तो कसा करतात ते तुला माहीतच आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे मूलगामी विचार लक्षात घेतले जातच नाहीत. आजच्या चंगळवादी व अराजकतावादी सामाजिक परिस्थितीचे नैतिक अधिष्ठान उंचावण्यासाठी शिक्षणातून संस्कारांचे रोपण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. पण आज आमच्याकडे प्राथमिक शिक्षणातच माध्यमप्रश्‍न, अनुदानप्रश्‍न, मराठी राजभाषा व्हावी म्हणून काय गोंधळ चाललाय, ते तू बघतच असणार! असो.
तर यंदाच्या तिहेरी संगमात तुझा मान मोठा. तू सुखकर्ता, दुःखहर्ता, जगत्‌पालक अशा अनेक उपाधी तुला मानवाने दिल्या आहेत. तुझ्याकडे चौसष्ट विद्या आणि अडुसष्ट कला आहेत, असं म्हणतात. त्या आधारेच तू मानवी बुद्धीचा वापर करून घेतोस. म्हणून आजचा उत्सव सोडला तरी सर्व कार्यात तुझा मान मोठा! तुझं रूप पाहून मन शांत होतं. श्रद्धेने हात जोडले जातात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ही युवापिढीही तुला मानते, बरं का? दरवर्षी तू तुझा उत्सव पाहण्याकरता कुठं कुठं फेरी मारतोस? एखाद्याला दर्शनही देतो असं वाचलं आहे. तेव्हा यंदा आमच्या गोमंतभूमीत येऊन बघ. खास करून म्हापसा परिसरात येऊन गेला तरी चालेल. म्हापशाला ‘चिंतामणी दान’ देणार. म्हणजे तुझंच दान करणार. तुला दान देणार नाहीत बरं का? तुझ्या उत्सवाला थिवीचे आमदार डाळ, साखर, रवा, मैदा, असं पाच-सहा किलो सामान प्रत्येक घराघरातून कार्यकर्त्यांमार्फत पोहचतं करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच गोव्यात लाडली लक्ष्मी, गृहलक्ष्मी वगैरे आहेतच. यंदा तिहेरी संगमात तुझा उत्सव नव्हे हे तिहेरी आव्हान तुझ्यापुढे आहे असं वाटतंय. तू तुझे भरभराटीचे आशीर्वाद कोणाला देणार. मूर्तिकाराला, तुझी पूजा करणार्‍याला की दान देणार्‍याला? दीड दिवसापासून तो कुठं कुठं एकवीस दिवसांपर्यंत तुझं वास्तव्य या पृथ्वीतलावर असतेच. तेव्हा तू आमच्या गोमंतभूमीत येऊन सार्वजनिक उत्सवातील युवा कलाकारांचा उत्साह पाहून घे. खरोखरंच तुला कुठे धांगडधिंगा दिसत असेल तर त्यांना क्षमा कर आणि त्यांच्याकडून चांगलं कार्य करवून घे. बुद्धी ही सर्वांनाच असते, पण त्याचा योग्य वापर करण्याकरता तुझा हातभार असावा. गोमंतभूमीचा ‘सुशेगादपणा’ आता संपलाय. उठसूठ संप नि उपोषणाने आझाद मैदान त्रस्त झालेलं आहे. याचबरोबर गोमंतकाचा विकासही होत आहे. आजच्या आधुनिक युगाबरोबर जायचं असेल तर सर्वांचीच गरज आहे. पण दहशतवाद, आतंकवाद पसरवून जीवन जगण्यातील आनंद न लुटता ताण-तणावाखालीच लोक जगतात. असं का? अपघात, पूर वगैरे होऊन काही दुर्घटनेत मरण येतं ते वेगळं, पण दररोजच जिवंत मरण जगणारे का निर्माण होतात?
आमच्या गोमंतभूमीचा ‘गोमंत गौरव’ विशेषांक तू वाचला असशीलच. जागतिक कलाकारांची भूमी गोवा – तिच्यावर असाच वरदहस्त ठेव! चांगलं असतं तिथे थोडं वाईटही असतंच. ते सोडा!
तुझ्या आगमनासाठी उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे, तर पावसाने त्यावर विरजण घालायला नको. निदान तुझ्या येण्याच्या दिवशी तरी त्याला थोपवून धरता येतं तर बघ. प्रदूषण वगैरेही तूच सांभाळ. आमच्या म्हापशाला कचर्‍याचं साम्राज्य असतं. तेव्हा काय ते बघ! पण येथे सर्वांना जास्तीत जास्त सुखी ठेव. चांगलं कार्य करून घे. सर्वांत महत्त्वाचं आणि पुनःपुन्हा सांगावंसं वाटतं ते हे की अष्टपैलू विष्णू वाघ यांना लवकर बरं कर!!-